साद... बाप्पा मराठी कविता

सौ. सारिका टेकाळे लिखित मराठी कविता साद...

साद... बाप्पा मराठी कविता

बाप्पा... तुझ्या मुरतीला
म्या दुरुनच जोडिते हात 
माझा जीव शिणलेला
द्यावी भगतास साथ

बाप्पा... ईघणहरता 
तुच करता करविता
माझ्या दारुड्या लेकास
घ्यावे पदरात आता

त्याच्या मतीचा विनाश
संगतीने केला घात
नौका तारूनि ने त्याची
माझ्या जीवनाची त्यो फुलवात

हे लंबोदरा, गजानना
द्या उजाळा त्याच्या मना
बायका पोराले इसरूनी
गेला आहारी व्यसना

लई दिस झाले बघा
"आयं" सबुद ऐकलेला
कान तरसले माझे
पान्हा छातीस फुटलेला

त्याले वाट दाखिव घराची
बाप थकलाय म्हणा
चिमुकल्याच्या डोळ्यात
त्याचा रुबाब देखणा

जळो इपरीत बुद्धी
दुरितांचा संग सुटो
माणसातला माणूस
कधीही ना विटो...

Sarika Tekae

सौ. सारिका टेकाळे,
डांगे चौक, पुणे