सांग... विठ्ठला

एक भक्त विठ्ठलाशी किती हक्काने बोलू शकतो, या आशयाची कावेरी गायके याचे कविता, "सांग... विठ्ठला"

सांग... विठ्ठला

विट्ठला तुझ्या वारीला पंढरपूरात जागा पुरत नाही
तु भक्ताच्या हाकेला धावून येतोस म्हणे
चमत्कार करतोस,असे मी ऐकत आले आहे
पण मी अनेकदा ऐकलेय
म्हणे, तू अठ्ठावीस युगे विटेवरच उभा आहे...

ऐकले मी इतरांनकडून तुझ्या कृपेची सावली
आता मलाही माझा डोळ्याने तुझा चमत्कार बघायचा
भक्तासाठी पाऊल पुढे टाकताना मलाही बघायचे आहे
पण मी अनेकदा ऐकलेय 
म्हणे, तू अठ्ठावीस युगे विटेवरच उभा आहे...

या जगातील अंधार मिटवायला
चांगुलपणाच्या बुरखा खालील 
राक्षसांचा नाश करायला तू येशील 
पण मी अनेकदा ऐकलेय
म्हणे, तू अठ्ठावीस युगे विटेवरच उभा आहे...

कोवळ्या जीवावर होणारे बलात्कार
अन्यायाविरुद्ध लढा द्यायला तू अवतरशील
असत्यावर सत्याचा विजय करायला तू येशील
पण मी अनेकदा ऐकलेय 
म्हणे, तू अठ्ठावीस युगे विटेवरच उभा आहे....

जगाच्या पोशिंद्याचे होणारे हाल
 नष्ट करायला आता येशील का? 
अन्याय- अत्याचार विरूद्ध चाललेले खेळ संपवायला
विठ्ठला सांग आता तुझी विट सोडशील का? 

Kaveri Gaykwad

कावेरी आबासाहेब गायके
भिवगाव, ता. वैजापूर
जि. संभाजीनगर