सावळा हरि Savala Hari मराठी कविता | Marathi Kavita

सौ. प्रिती सुरज भालेराव यांनी लिहलेली कविता सावळा हरि या कविता मध्ये कवियत्रीचे विठ्ठल यांच्या बदल प्रेम भाव व्यक्त केला आहे.

सावळा हरि Savala Hari मराठी कविता | Marathi Kavita

तुझं सावळं रूप पाहूनी
भुरळ मला पडली
तू माझाच आहेस
खात्री अशी पटली

कधीच नाही केलास
तुझ्या प्रेमाचा देखावा
तुझ्यावरून ओवाळून
जीव माझा टाकावा

आवडे मजला बहू
साजिरे रूप तुझे
समजून घेशील का
भाव मनातील माझे

तुझ्या माझ्या नात्याला
नाव आता काय देऊ
स्वतःलाच समजून
माझी मीच कशी घेऊ

भाव माझ्या मनीचे
तुला सांगु मी कशी
तुझ्यामुळेच रे सख्या
झाले मी वेडीपिशी

का? कोणास ठाऊक
तुझ्यात जीव गुंततो
माझ्याही नकळतपणे 
तो तुझ्यासाठी तुटतो

तुझ्या सुखासाठी
मांडला सारा खेळ
देवानेच जुळवून
आणला हा मेळ

दिवसरात्र मनात
तूच कसा असतोस
डोळे मिटताच क्षणी
तूच मला दिसतोस

स्वरूप सावळा
तु माझा हरि
प्रेम हे दाटले
माझ्याही उरी

 

सौ. प्रिती सुरज भालेराव, पुणे