"ती" तिच राहीली...

जया विनायक घुगे-मुंडे लिखित मराठी कविता "ती" तिच राहीली...

पूर्वीची ती आता बदलली
तरीही ती,तिच राहीली,
आसवांच्या गावात नकळत
केव्हाची अडकलेली...

चूल आणि मूल सांभाळत
उंबऱ्याच्या बाहेर पडली,
उत्तुंग क्षितिजाशी जरा
मैत्रीही तिने केली...

पण...भ्रतार नाही बदललेला
पूर्वीसारखाच  चिडलेला,
फक्त कारणं तेव्हढी बदलली
स्वातंत्र्यात तो रमलेला...

"ती" तिच आजही तशीच
उच्चशिक्षित ठसा लागलेला,
पण...अंतरात खोलवर
ज्वालामुखी पेटलेला...

आजही तिच्या मुक्तीचे
गल्लोगल्ली नारे गाजतात,
आमची सोडून बाकीच्यांना
नियम लागू जणू होतात...

 हुंदक्यांची भाषा तशीच आहे
असमाधानी छटा अंतरी आहे,
तोंड दाबून बुक्कीचा मार
तिच्या पाचवीलाच आहे...

काही म्हणा,' ती' तिच राहीली
सबला झाली तरी पारतंत्र्यात,
कधी विचार केलाय का
ती श्वास तरी घेते का स्वातंत्र्यात

Jaya Munde
जया विनायक घुगे-मुंडे
जिल्हा परिषद शिक्षिका, गावंदरा
परळी(वै.),जि.बीड