थांबला श्रावण...

सौ. सारिका बद्दे लिखित मराठी कविता थांबला श्रावण...

थांबला श्रावण...

सावळ्या सावल्या
रानास भूलल्या
बांधुनी उन्हाची घरे
गर्दल्या पानात
ओढून एकांत
नजर चांदणी झरे

नदीच्या काठास
वेलींचे माहेर
बोलती गारवे गुज
झुलतो झोपाळा
हिरव्या आभाळा
डोळ्यात साखर निज
खेळल्या लाटांची 
दमली पाऊले
वाटांची चादर सरे

कोवळ्या मातीत
व्याकुळ अंकुरे
सांडती अधीर श्वास
थेंबाचे काजळ 
लावूनी आभाळ
झुलवी झाडांची आस
झिम्मड पाखरू 
फांदीशी आधारू
तहान चोचीत उरे

एकटी माऊली
डोंगर साऊली
शमवी भाबडी भूक
आंधळी लेकुरे
शोधीती आसरे
चोचीत चोचीचे सुख
पिसारा हासरा
मांडून पसारा
मोहाचा पदर धरे

धुक्याच्या वनात
थांबला श्रावण 
सरले सरींचे गाणे
विरली साखळी
मिटली पाकळी
रुसली पाचूची राने
लागली नजर
उदास अधर
पापणी जलास भरे

Sarika Baddhe

सौ. सारिका बद्दे, ढोरकीण, ता. पैठण