रातराणी उमगली असती...

कु. स्नेहा कोळगे लिखित मराठी कविता रातराणी उमगली असती...

रातराणी उमगली असती...

रातराणी उमगली असती...
साऱ्यांना,
दिवसानेही केलं असतं 
तिच्याशी सख्य...
उगाच का...
अंधाराने आधार दिला असता...

काळोखाने संभाळलेली आयुष्य
असतात अबोल...
असं नसतं. की
त्यांना बोलायचं नसतं...
पण..ऐकणारे कान...
भेटतील की, नाही...
याची त्यांना भीती असावी...

सोपं नसतं...
घडाघडा मनातलं 
बोलत जाणं...
उगाच एखाद्या 
जुन्या जखमेची खपली
निघाली तर...

होत, जावं व्यक्त...
स्वतःच स्वतःपाशी...
कलेचा आधार घेऊन...
जोवर.. ऐकणाऱ्या.. कानांवर
विश्वास बसत नाही तोपर्यंत...

कु. स्नेहा कोळगे, 
(मनोविश्लेषक) मुंबई.