एकादशी व्रताची कथा

एकादशी महत्व सांगणारी नीता भामरे यांची कविता

एकादशी व्रताची कथा

एकादशीच्या व्रताची । पोथी पुराणांत कथा ।
संत आळविती गाथा । व्रत पुण्यप्रद   ।।१।।

देवतांच्या श्वासातून । झालें शक्तीचे निर्माण ।
रूप तेजस्वी निर्गुण । माँ एकादशीचे   ।।२।।

मृदुमान्य असुराचा । केला मातेने संहार ।
देवांची तारणहार  । माता एकादशी   ।।३।।

एकादशीच्या व्रताने । इच्छित ती फलप्राप्ती  ।
परमार्थिक प्रगती  । साधती साधक ।।४।।

उपवासाचे फलित । देह चित्त शुद्ध होई ।
रोगव्याधी लया जाई ।  अल्पोपहाराने   ।।५।।

चतुर्मासें कालखंड । शेषावर विराजित ।
श्रीविष्णू योगनिद्रेत ।  अखंड राहती ।।६।।

एकादशीला श्रीहरी । निद्रेतून होती जागे ।
ओढ दर्शनाची लागे । भाबड्या भक्तांना   ।।७।।

एकादशी पुण्यकाली । चंद्रभागा तिरावरी  ।
जमे भक्त वारकरी । विठ्ठल दर्शना   ।।८।।

आषाढी नि प्रबोधिनी । एकादशी या पावन ।
घेता  विठूचे दर्शन । सार्थकी जीवन   ।।९।।

करिता निष्ठेने व्रत । नित पुण्याचा संचय ।
दुःखाचा पापाचा क्षय । होई या व्रताने   ।।१०।।

सौ. नीता यशवंत भामरे, नासिक