कधी कधी ठरवूनही
रुजवता येत नाही कवितेचा गर्भ
वांझ जमिनीसारखं
पडून राहवं लागतं दिवसेंदिवस
सुचत नाही एकही शब्द
जीवाची घुसमट जाते वाढत
वांझ वेणांच्या, अगतिकतेच्या,
वेदना जातात असह्य होत...
मग रुजतो कुठूनसा
छोटासा शब्दांचा कोंब ...
भावनांचा झरझरता पाऊस
अक्षरा अक्षरातून जातो ओल निर्माण करत..
देहमनाच्या फांदीवर उमलत जातात
जीवनोत्सुक क्षणांची कोवळी शब्दांची पानं...
नवसंजीवनीच बाळसं धरत
कविता जन्म घेते शाईतून प्रसवत....
कागदावर बाळबोधपणे राहते रांगत
पौगंडावस्थेच्या बावरलेपणात वावरत....
तारुण्यातील नवथर प्रेमात न्हात
मध्यमवयीन प्रगल्भता राहते सांभाळत...
उन्मनी अवस्थेत पोहचत
परिपूर्ण होत जाते एकरुपता, एकतानता साधत....
सौ. कविता चौधरी, जळगाव