सदा विश्वास असावा
फुललेल्या प्रीतीवर
पावसात भिजलेल्या
गंधाळल्या मातीवर
जननीच्या मायेवर
सजनीच्या प्रेमावर
मनी असावा विश्वास
स्वतःच्याच हातावर
विश्वासानी जुळे बंध
फुले नात्यांची वाटिका
क्षणक्षण आनंदाचा
गोड प्रत्येक घटिका
विश्वासाच्या पायावर
नाती वसली जीवनी
भावनांची रेलचेल
असू द्यावी मनोमनी
सदा जपावा विश्वास
श्वास असे तोपर्यंत
जपलेल्या विश्वासाचा
करू नये कधी अंत
सौ.विजेता चन्नेकर(भुमर) गोंदिया