विठ्ठला सोड ती वीट
अन् सोड ती पंढरी हो
आतुर भक्ताच्या दारी
विठ्ठला कर तू वारी हो
विठ्ठला कर तू वारी हो
अन्नाविना भुकेने व्याकूळ
झालेल्याशी तू अन्न हो
काठीविना आधारासाठी
थकलेल्याचा तू आधार हो
विठ्ठला कर तू वारी हो
बापाविना पोरका झालेल्या
अनाथाचा तू बाप हो
मायविना पान्हा हिरावलेल्या
तान्ह्याचा तू पान्हा हो
विठ्ठला कर तू वारी हो
श्रध्देविना दगड बनलेल्या
दगडाचा तू देव हो
धर्माविना दिशा चूकलेल्या
मानवाचा तू धर्म हो
विठ्ठला कर तू वारी हो
माणूसकीविना जगणाऱ्या
माणसाची माणूसकी हो
भावनाविना भावशुन्य
झालेल्यासाठी तू भाव हो
विठ्ठला कर तू वारी हो
हाताविना जो झूरतो
त्याचा तू हात हो
पायाविना चालणाऱ्या
लंगड्याचा तू पाय हो
विठ्ठला कर तू वारी हो
सौ. माधुरी डी. गेडाम,
वणी, जि. यवतमाळ