तुटलं म्हणून काय झालं?

सौ. जयश्री अविनाश जगताप लिखित तुटलं हृदय कसे सावरावे हे सांगणारी मराठी कविता तुटलं म्हणून काय झालं?

तुटलं म्हणून काय झालं?

तुटलं हृदय म्हणून 
नको नाराज  होऊ 
चल रे वेड्या माणसा
हृदयाकडे  नाविन्याने पाहू... 

तुटतो तर काळा मेघही 
खाली कोसळती धारा 
जलधारा करतात 
हिरवा निसर्ग सारा... 

तुटलेली, भेगाळलेली धरणी 
खूप काही सांगून जाते 
पाणी पिऊन तृप्त होऊन 
हिरव्या नवलाईने बहरून येते 

बी तुटले, फुटले की 
अंकुर बाहेर डोकावतो 
नवनिर्मितीचा आनंद 
सगळ्यांनाच सुखावतो... 
  
वेगाने खाली येतो जेव्हा 
आकाशातील तुटता तारा 
 पाहणाऱ्याला  इच्छा पूर्तीचा, 
आनंदाचा देतो विचार न्यारा 

मूर्तिकार दगड तोडतो,फोडतो 
त्यातूनच निर्माण होते मूर्ती 
मूर्तीतील देवाला हात जोडले की 
माणसाला मिळते स्फूर्ती... 

म्हणूनच माणसा हृदय तुटलं 
तरी ठेव  स्वतःवर  विश्वास 
तुझ्याकडूनही  नवनिर्माण होऊन 
घेशील तू सुद्धा मोकळा श्वास...

Jayshree Avinash Jagtap

सौ. जयश्री अविनाश जगताप 
सातारा