मी विद्रोही कविता लिहतो
मी कवितेतून विद्रोह मांडतो
बड्या बड्या बाता मारून
विवेकबुद्धी खुंटीला टांगतो
मी अन्यायाचा पाढा वाचतो
मुक भावनांना वाचा फोडतो
कुचंबनेविरुद्ध बंड पुकारून
विद्रोह्याचे सोंग पांघरतो
मी गल्लोगल्लीत नारा लावतो
मी देशभक्तीचा आव आणतो
खांद्यावर जबाबदारीचे ओझे पडताच
हातावर तुरी देऊनी पळून जातो
मी व्यथा मांडतो प्रत्येक दुःखाची
निर्जीव वस्तूंचीही हळहळ सांगतो
जखमेवरती मलम चोळूनी
सन्याशाला फाशी देतो
मी बोल बोलतो जाती पातीवर
धर्म अधर्माची ठिणगी टाकतो
मर्द मावळा वदवून स्वतःला
सडा रक्तरंजीत पाडतो
मी गळा घोटतो सत्य वचनांचा
भ्रष्टाचाराला खतपाणी घालतो
आंदोलन बिंदोलन नेटकऱ्यांसाठी
मी विनयशीलतेची बोली लावतो
होय... मी विद्रोही कविता लिहतो
मी कवितेतून विद्रोह मांडतो
दिखाव्याच्या दुनियेदारीत या
माणुसकी पायदळी तुडवितो
तेही होतेच ना विद्रोही ज्यांनी
जाणिली सामान्यांयाची हाल अपेष्टा
गुलामगिरीच्या विळख्यातून सोडवून
स्वकार्यातून दाखवून दिली निष्ठा
ते लढले अन्याय अत्याचाराविरुद्ध
कुणी झेलल्या अंगावर गोळ्या
तुक्याने उचलले शब्दशस्त्र
हाती उत्कर्षाच्या चिपळ्या
धन्य धन्य ती लेखणी
शोभे गा विद्रोही तुकाराम
माणसांत देवपण जागवून
कर्मठांशी जाहला शिरजोर
एक विद्रोही त्व बसवण्णा
ज्याने दिधला जन्म महान परिवर्तना
मांडला "कायकवे कैलास" सिद्धांत
झाला सनातन मनुवाद्यांचा अंत
केले मानवजातीच्या पिढ्यांशी मुक्त
बंद कर्मकांड नि अंधश्रद्धेची केंद्रे
नाही जाती भेदाला थारा
संगे इष्टलिंगरुपी देवेंद्रे
धन्य तो विद्रोही बुद्ध
ज्याचे अस्त्र शस्त्र सद्धम्म
पाषाणी घडविली क्रांतीची शिल्पे
कली गाडूनी नवसूर्योदय उगम
आस्तिक नास्तिक माजे कल्लोळ
ज्ञानासवे दूरदृष्टी अंतर्मुखचि एकाग्रे
स्वरक्ताचा मेरू, ताम्र कातडीचे
शिल्पातील संघर्ष नजरेत ठसठसूनी भरे
सारिका टेकाळे
डांगे चौक, पुणे