कवी सुभाष जैन लिखित चंद्रावर स्वारी बालकाव्यसंग्रह

बालचमुसाठी बालसाहित्यात अनेक पुस्तकांची भर पडली आहे. असेच एक बालगीतांचं पुस्तक वाचनात आले ते म्हणजे 'चंद्रावर स्वारी' हा बालकाव्यसंग्रह.

कवी सुभाष जैन  लिखित चंद्रावर स्वारी बालकाव्यसंग्रह

बालपण हा आयुष्यातील सगळ्यात सुखद काळ असतो. लहान मुलांचं विश्व निरागस, निःस्वार्थ असते.  प्रत्येक क्षणांचा भरभरून आनंद घेणे एवढाच हेतु असतो. मुले कल्पनाविश्वात जास्त रमतात. त्यांना अनेक प्रश्न सतत पड़त असतात. लहान मुलांचे शब्दभांडार वाढवण्यासाठी ज्या रचना लिहिल्या गेल्या त्याला बालगीत म्हणतात. सोप्या सोप्या रचना , गाणी म्हणण्यापासुन त्यांच्या अभ्यासाला सुरुवात होते.आजुबाजुच्या लहान मुलांना आपण अशी  बड़बड़गीते बोलताना ऐकतो तेव्हा किती प्रसन्न वाटते.मुलांवर संस्कार करण्याची पहिली पायरी तिथुन सुरु होते. छोट्या छोट्या कथा, बोलबोलगाणी यामुळे मुले आकर्षित होतात आणि त्यांमुळे त्याचे उच्चार स्पष्ट होतात. जड़  जड़ शब्द उच्चारण्यास मुलांना अवघड जाते म्हणून सहज उच्चार करता येतील अशा शब्दाची रचना गीतात केली जाते. 

 'अङ्गुलं मडगुलं' , 'ये रे ये रे पावसा' , 'नाच रे मोरा' , 'आपडी थापड़ी' , 'चांदोबा चांदोबा भागलास का ? ' अशी अनेक बड़बड़गीते आपण सर्वानी लहानपणी बोबड्या आवाजात म्हंटली आहेत. लहान मुलांना जेवताना सुद्धा अशी गाणी किंवा गोष्टी सांगून त्यांना घास भरवला जातो. गाण्यात येणारे यमक शब्द, ताल  यामुळे गाणी चालीत म्हंटली की, मुलांना ही आनंद होतो. मुलांना फूल, फळ, प्राणी, पक्षी, चंद्र, सूर्य, तारे अशा गोष्टीचे आकर्षण वाटते. चिऊ काऊची  गोष्ट, उन्दिर मामा, भोपळयाची गोष्ट अशा छोट्या आणि बोधपर गोष्टी मुलांना ऐकवल्या जातात . हल्ली ही सगळी गाणी , गोष्टी डिजिटल स्वरुपात उपलब्ध असल्यामुळे मुले मोबाइलवर चित्रफीत पाहतात. त्यामुळे पुस्तक हातात घेऊन वाचणे कमी झाले आहे. वीडियो मध्ये कार्टून स्वरुपातील, हालचाल करणारी चित्र दिसतात, विशिष्ट रंगसंगती त्यांमुळे मुलं आकर्षित होतात. 

बालचमुसाठी बालसाहित्यात अनेक पुस्तकांची भर पडली आहे. असेच एक बालगीतांचं पुस्तक वाचनात आले ते म्हणजे 'चंद्रावर स्वारी' हा बालकाव्यसंग्रह. कवी, लेखक, पत्रकार, छायाचित्रकार सुभाष जैन यांनी या बालकवितांची रचना केलेली आहे. शारदा प्रकाशन या संस्थेने हे पुस्तक प्रकाशित करून बाल साहित्यात सुरेख गीतांची भर घातली आहे. 

रात्री झोपलो मऊ बिछान्यात
 परी म्हणाली मला स्वप्नात 
 मित्रा चल जाऊ विज्ञान जगात 
 
 यानातून चंद्रावर गेलो झटक्यात
 शितल चंद्रावर वारे नव्हते वहात
 प्राणवायू साठी नळी होती नाकात
 
 चंद्रावर नव्हते मधुर संगीत 
 ससाही नव्हता चंद्राच्या चंद्रनगरीत 
 हरणाची जोडी नव्हती त्या राज्यात  
 चंद्रासाठी रुसला होता राम बालवयात
 
 आर्मस्ट्रॉंगने चंद्र गाठला होता काही पावलात 
 गोड परीने चंद्रावर नेले विज्ञान जगात  

सुभाष जैन

मुलांसाठी लिहिणे सोपे नसते. मुलांच्या भावविश्वाचा, त्यांच्या विचारपद्धतीचा, त्यांच्या आवडनिवड यांचा अभ्यास करून सहज सुंदर रचनांची निर्मिती केली जाते. कवी सुभाष जैन यांच्या स्वभावातील नम्रता, साधेपणा, संवेदनशील मन , मुलांच्या भावविश्वात रममाण  होण्याच्या त्यांच्या  कलेमुळे या सुंदर पुस्तकाची निर्मिती होऊ शकली. शेवटी कवीचं प्रतिबिंब त्यांच्या रचनेत दिसत असतं. 

या संग्रहातील कविता जितक्या मनोरंजक आहेत तितक्या बोधपर ही आहेत.'चंद्रावर स्वारी' ह्या कवितेतुन चन्द्राची शाब्दिक सफर घडवलेली आहे. चंद्र, त्यांचे रूप हे त्या त्या काळात प्रत्येकासाठी कसे वेगळे होते, ते या रचनेत समजते.  'जंगलातील मजा ' ह्या कवितेतील ओळी पाहू 


स्वप्नात पाहिली जंगलातील मजा

माकड़ खात होते मिठाई खाजा

जंगलात होती सभा संगीताची

गाढ़व गात होता गाणी आनंदाची ....


ह्या कवितेतील जंगल, त्यातले प्राणी या कल्पनेने एक जीवंतपणा कवितेत आलाय.. 'बोक्याचे दुकान' ह्या कवितेत बोक्याने दुकान उघडले आहे, बाकीचे प्राणी त्यांच्याकडे वस्तु खरेदीसाठी जात आहेत. असे दृश्य रेखाटले आहे. ह्या मूक प्राण्यांना  मानवी वृतीची जोड़ देऊन गम्मत आणली आहे. कारण मुलांचं विश्व हे निरागस असू दे, त्याला वास्वतेची ओळख कशाला ? नाही का ...

अशा कल्पनाच मुलांना भावविन्मुख करतात. 'ऐक्याचे बळ' ह्या कवितेतुन एक बोधकथा  काव्यातुन कमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

एक होते आजोबा

नाव त्यांचे दाजीबा

आजोबांना आवडे लाडू

आजीने दिला मेथीचा लाडू

 'आजोबा'  ह्या कवितेतुन आजी- आजोबा आणि लाडवांची गम्मत अनुभवायला मिळते.लहान मुले जास्त वेळ आपल्या आजी- आजोबा यांच्यासोबत घालवतात. त्यांच्यकडुन गोष्टी ऐकतात. त्यामुळे ही कविता मुलांना नक्कीच आवडेल.

'देश अमुचा सुखी होऊ दे' ह्या कवितेतुन कवीने देवाकडे मागणे मागितले आहे. ह्या देशातील समस्या दूर होऊन संपूर्ण देश सुखी होण्यासाठी प्रार्थना केली आहे. एकीकडे वास्तवतेची जाणीव या कवितेतुन कवीने करून दिली आहे.  ह्या संग्रहातील आणखी अनेक कविता सुरेख, साध्या रचना, यमक ह्यानी सजलेल्या आहेत . ही बालदुनिया म्हणजे स्वप्नांची दुनिया, स्वप्नांची नगरी.... ही स्वप्ने, कल्पना मुलांना  वास्तवतेची तीव्रता जाणवू देत नाहीत. त्या वयात बालपण भरभरुन जगणं , हेच महत्वाचं असतं. आणि या बालपणाला आणखी सुलभ, निर्मळ करण्यासाठी ह्या पुस्तकाने योगदान दिले आहे.


- अस्मिता प्रदीप येंडे