एक साहित्यिक व्यक्तिमत्व बाबा चन्ने यांच्याविषयी पुस्तकाच्या निमित्ताने लिहीण्याचा छोटासा प्रयत्न

एखादा व्यक्ती माणूस म्हणून समजायला त्या व्यक्तीच्या परिचयापेक्षाही त्या व्यक्तीने केलेले भिन्न विषयावरील लेखन पुरेसे असते.

एक साहित्यिक व्यक्तिमत्व बाबा चन्ने यांच्याविषयी पुस्तकाच्या निमित्ताने लिहीण्याचा छोटासा प्रयत्न

तसे पाहता कोणतेही साहित्यिक व्यक्तीमत्व समजून घेणे कठीण गोष्ट आहे. तरीही एक छोटासा प्रयत्न. ग्रामीण साहित्यिक आणि  पत्रकार बाबा चन्ने आणि माझा परिचय तसा अल्पसाच तोही माझ्या पहिल्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने झालेला. माझे पहिले पुस्तक अभागिनी हे प्रकाशित करतांना बाबा चन्ने यांनी एक मार्गदर्शक आणि संपादकांची भूमिका अतिशय संवेदनशीलतेने पार पाडली.

एखादा व्यक्ती माणूस म्हणून समजायला त्या व्यक्तीच्या परिचयापेक्षाही त्या व्यक्तीने केलेले भिन्न विषयावरील लेखन पुरेसे असते.

baba channe

बनसोड एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. रविंद्र बनसोड
व प्रसिद्ध कवयित्री कल्पना रविंद्र बनसोड.

खरंतर सामाजिक अडचणींची जाण असणारा पत्रकार, धारदार लेखणीचा धनी, एक उत्कृष्ट लेखक, एका प्रेयसीच्या आठवणीने सदैव व्याकुळ झाल्याने त्यांच्या अंतरात्म्यामध्ये काही प्रमाणात जन्माला आलेला क्षणिक कवी, आवडलेल्या आणि समाजाच्या दृष्टीने प्रबोधनात्मक असणाऱ्या फक्त लेखांचेच नव्हे तर पुस्तकांचे, शेकडो काव्यांचे, कवींचे, चित्रपटांचे, कथांचे, उत्कृष्ट व्यक्तिमत्वाचे, एखाद्याच्या उत्कृष्ट कार्याचे अचूक आणि अत्यंत समर्पक आणि मोजक्या शब्दात समीक्षण करणारे निस्वार्थ समीक्षक, आणि एक उत्तम विचारवंत म्हणून बाबा चन्ने यांचा परिचय माझ्यासमोर नेहमीच वेगवेगळ्या अनुभवातून होत गेला.

लेखनाला निमित्त बाबा चन्ने यांच्यावर लिहल्या गेलेल्या "मनामनातील बाबाजी" या काव्यसंग्रहाचे असेलही पण त्या निमित्ताने एक धडाडीचा धाडसी आणि वेळप्रसंगी तेवढाच हळवा व भावनिक स्वभाव असणारा लेखक त्यांच्या विविध गुणांगातून स्मरता आला हे विशेष.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 
कवीवर्य फ.मुं. शिंदे सरांसोबत एक क्षण

आपण विविध क्षेत्रांमध्ये विविध पदावर यशस्वी झालेले लोक पाहतो. परंतु ग्रामीण भागात राहून खेड्यातील लोकांना समजून, त्या लोकांचे दुःख जाणून, त्या दुःखांशी समरूप होऊन, त्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम एक पत्रकार या नात्याने बाबा चन्ने आपल्या लेखणीतून सतत करतांना दिसतात. तसेच आताच्या भरकटलेल्या तरुणाईला विविध विषयावर मार्गदर्शन करतांना ही त्यांची परखड भाषा त्यांच्या लेखणीतून आपणांस वाचावयास मिळते. तर कधी प्रेमासारख्या महत्वाच्या आणि संनवेदनशील विषयांवर बाबा युवक-युवतीची कान उघडणी करून, हलकेच एका जबाबदार पालकासारखे परावृत्त देखील करत असतात. कधी आपल्या देशाच्या युवाशक्तीला त्यांच्या कर्तव्याची जाण करून देतात तर कधी आपल्या जहाल पण योग्य विचारांना तरुणाईच्या लेखनीतून मांडण्यासाठी प्रेरित करत असतात. 

ग्रामीण किंवा शहरी भागातील आपल्या लेखणीतून काहीतरी मांडू पाहणारी एखादी भगिनी असो, सामाजिक, राजकीय घडामोडीनी संतप्त बेरोजगार तरुणाईचा शब्दात बंदिस्त होणार तिरस्कार असेल किंवा आपल्या बालमनातील भावना शब्दात टिपणारा एखादा बालकवी असो,  सर्वांनाच बाबा एक संपादक या नात्याने सतत प्रकाश झोतात आणण्याचा प्रयत्न करत असतात.

बाबा चन्ने यांचे व्यक्तिमत्व पाहता अत्यंत साध्या पोशाखातील अस्सल ग्रामीण माणूस आपणास पाहायला मिळेल. परंतु आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीची ओळख ही त्याच्या पोषाखावरून होत नसून त्या व्यक्तीच्या आचार-विचार, कल्पकता, संस्कार, शिक्षण, भाषा आणि त्या व्यक्तीच्या ज्ञानावर होत असते. त्याप्रमाणे सर्वच क्षेत्रातील ज्ञानाने, माहितीने तुडुंब भरलेला तलाव किंवा सर्व क्षेत्रातील ज्ञानाने सर्वासाठी पाझरणारा झरा अशा उपमा बाबा यांना देण्यास हरकत नाही.

baba channe

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व जेष्ठ कथाकार, कादंबरीकार 
डाॅ. नागनाथ कोतापल्ले व जेष्ठ कथाकार, समीक्षक, कादंबरीकार डाॅ. भीमराव वाघचौरे याचा सहवास

बाबांकडे पाहून असे वाटते की व्यक्तीने किती मोठे व्हावे, किंवा कोणत्या व्यक्तीने किती यशस्वी व्हावे, याला कोणतीही मर्यादा नसून, फक्त प्रत्येक व्यक्तीचे ज्ञान, त्याचे कर्तृत्व, त्याची क्षमता या सर्व गोष्टी त्या व्यक्तीला यशस्वी बनवत असतात. ना की त्या व्यक्तीला त्याचे राहणीमान, गाव, किंवा ओळख कोणत्याच मर्यादेत बांधू शकत नाही.

जोपर्यंत एखाद्या व्यक्तीने यशस्वी होणे हे त्या व्यक्तीच्या अमर्याद कष्ट, कर्तुत्व ,चिकाटी आणि  अगणित प्रयत्नांवर अवलंबून आहे. तोपर्यंत बाबा चन्ने सारखे सर्वसाधारण कुटुंबातील तरुण जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या अपार कष्टाने आकाशाला गवसणी घालत राहतील.आणि त्याच्या हक्काचं यश मिळवण्यापासून त्यांना कोणीच अडवू शकणार नाही.

जयश्री उत्तरेश्वर औताडे, 
गंगाखेड, जि. परभणी.