बाबासाहेब तुमच्या भेटीची ओढ लागली हो...

बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना, बाबा कोण आहेत? बाबा कसे आहेत? हे पाहणं आवश्यक आहे. या बहुरंगी व्यक्तिमत्वाबद्दल एका कवीने तर त्यांना 'महात्मा' हे विशेषण लावले, हे एक विशेषच आहे.

बाबासाहेब तुमच्या भेटीची ओढ लागली हो...

कोरोना देव तुम्हा आम्हा सगळ्यांनाच पावलाय असं म्हणायला हरकत नाही. या कोरोनाने आपल्याला घरात कोंडलं आणि मनात‌ कोंडलेली नाती ही जास्त जुळून आली. व्हॉटस् ॲपमुळे तर बाहेरील मंडळी पण आपल्या मनात घर करु लागली. आणि त्याचबरोबर या काळात बरेच व्हॉटसॲप कवी नव्याने तयार होऊ लागले. नुसते यमक जुळवून कविता तयार करणारे "यमकेश्वर कवी" अगदी भुछत्रासारखी जागोजागी उगवत होती. सुरुवातीला मला या सगळ्या कवितांबद्दल आकर्षण कमी आणि तिरस्कारच जास्त होता. कोरोनाच्या या काळात एकमेकांना न ओळखणारी माणसे एकमेकांना ओळखू लागली. एकमेकांच्या घरापर्यंत अगदी किचनपर्यंत पोहचली. महत्वाचं म्हणजे आपण एकमेकांवर कविता लिहू लागलो. कोणाचा वाढदिवस असेल किंवा कोणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल आपण विविध उपक्रमाच्या माध्यमातून आनंदाने साजरा करायला सुरुवात केली. (माझ्या मते लग्नाचा वाढदिवस हा खरं तर अपघाताचा दिवस पण तरीही आपण तो आनंदाने साजरा करु लागलो.) अनेक व्हॉटसॲप समूहावर कलगीतुराच रंगू लागला. पण मला‌ या ठिकाणी नमुद‌ करावसं वाटतं, अमर भुंगुर्डे सरांच्या समूहांविषयी या ठिकाणी नेहमीच‌ नवनवीन उपक्रम असतात. हरीश्चंद्र दळवीसारखे तरून या समूहात प्रशासक म्हणुन काम करतात. त्यांच्या सुपीक मेंदुतून दररोज नवनवीन कल्पना बाहेर पडत असतात. शिवाय‌ अमर सर असतातच.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्रजी नेमाडे

     ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्रजी नेमाडे


          
चार दिवसांपूर्वी मला‌ अमर सरांचा फोन आला. बाबासाहेब चन्ने यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे. असं मला त्यांनी सांगितलं, मी पण आनंदाने तयारी दर्शवली. बाबाजी चन्ने यांचा वाढदिवस साजरा करायचा म्हणजे उत्तमोत्तम कविता येणारच असंही त्यावेळी मी अमर सरांना सांगितलं. या सर्व कवितांवर एक आय.एस.बी.एन नंबर असलेले पुस्तक प्रकाशित करुया, त्यासाठी तुम्ही प्रस्तावना लिहाल का? अमर सरांचा हा प्रश्न नाजुक होता. कारण मी एक प्राध्यापक असल्यामुळे  काॅलेज, विश्वभान प्रतिष्ठान व इतर व्याप जास्त असल्यामुळे वेळेची चनचन होतीच. त्यामुळं माझं उत्तरही तितकच नाजुक होतं. सुरुवातीला मी एक महिना वेळ नाही असंच सांगितलं पण, पण नेहमी अमर सराबरोबर बोललो की असं वाटतं देऊया लिहुन, कारण अमर सरांची तळमळ, त्यांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ असते की, मी नेहमीच त्यापुढे झुकतो. शिवाय‌ 'बाबासाहेब चन्ने' नावातंच बघा ना असं वाटतं की तुमचे आमचे सर्वांचे बाबा, बाबा म्हणजे बाप‌, आणि सर्वच क्षेत्रात‌ मुसाफिरी करणारे छोट्या चनीचे, म्हणजे चण्यात असणारी ताकद मी नेहमीच बाबासाहेबात अनुभवतो. एक तर मुळातच बाबासाहेब ‌या नावाभोवती एक प्रचंड वलय आहे. बाबासाहेब आंबेडकर हे नाव ताबडतोब डोळ्यासमोर येतं. आणि बाबा चन्ने हे केवळ संपादकच नाहीत, तर ते बऱ्याच मुशाफिरी करतात. असं मी सुरुवातीलाच म्हटलं आहे ते अगदी खरच आहे.

प्रसिद्ध लेखिका तथा मानसकन्या कावेरी गायके 

प्रसिद्ध लेखिका तथा मानसकन्या कावेरी गायके
          

बाबासाहेबांच्या कवितेचं रसग्रहन करायचं आणि प्रस्तावना  लिहायची होती. खरं तर मला प्रस्तावना लिहायला हवच सुटली, मग मी ठरवलं सर्व कविता वाचूया कोणी काय काय लिहलंय. आणि परिणामी मला उत्तमोत्तम कविता वाचायला मिळाल्या, त्याबद्दल अमर-हरी या जोडीला मनःपुर्वक धन्यवाद.
          
आता मी मुद्याकडे वळतो, बाबासाहेबांच्या वाढदिवसानिमीत्त कविता लिहायच्या म्हणजे दोन अर्थ संभावतात. एक म्हणजे 'शुभेच्छा काव्य', आणि दुसरे 'चरित्र काव्य' यापैकी शुभेच्छापर काव्य लिहणं तसं सोपं असतं. कारण युट्यूब/गुगलवर अनेक अश्या प्रकारची काव्य‌ असतात‌. आणि अनेक काव्यचोर यातून एक दोन ओळी घेऊन आपले काव्य रचतो. पण चरित्र काव्य  लिहायचं म्हटलं की आपल्याला त्या व्यक्तिबद्दल माहिती असायला‌ हवी असते. मला सर्व लेखकांचं कवीचं कौतुकही खूप वाटतं कारण फक्त समूहप्रशासकाने दिलेल्या पुरस्कारांच्या यादी वरुन व परिचयावरुनच वेगवेगळे अलंकार वापरुन काव्य इतके सुशोभित केले  आहे की मला वाटतं, हा काव्यरुपी दागिना आपण सगळ्यांनी वाढदिवसानिमीत्त बाबासाहेबांच्या अंगावर चढविला. त्यामुळे‌ बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला विलोभनीय‌ कंगोरे प्राप्त झाले. मी या ठिकाणी काही कवितांचा उल्लेख करणारच आहे आणि तो करणं मला आवश्यक वाटतं. 
          
सर्व कवितांचे वाचन, अहो वाचन कसले पारायणच केल्यावर बाबासाहेब चन्ने यांच्यामध्ये कोणाकोणाला काय‌ काय दिसले हे पाहणे मला उचित व आवश्यक वाटते. बाबा चन्ने म्हणजे संपादक, बाबा चन्ने म्हणजे प्रकाशक, बाबा चन्ने म्हणजे विश्लेशक/लेखक, समिक्षक/उत्तम वक्ता/पत्रकार / साधक/अभ्यासक/अध्यात्मात रमणारे/प्रेरक/वारकरी इतक्या व्यक्तिविशिष्ठांनी भरलेले हे व्यक्तिमत्व म्हणजेच बाबा चन्ने. बऱ्याच‌ कवितांमध्ये बाबा चन्ने यांचा उल्लेख समाजसेवक असा केलेला दिसतो. उपमा देताना तर सारस्वतकारांनी जराही काटकसर केलेली नाही. बाबाजी चन्ने यांच्यासाठी वापरलेल्या उपमा ह्या  लक्षणीय तर आहेतच, शिवाय कोणत्याही व्यक्तिमत्वाच्या पैलुंचा ठाव घेणाऱ्या आहेत. पितृतुल्य बाबा चन्ने, महामेरु बाबा‌, प्रेमाचा झरा, इत्यादी अनेक उपमा बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व दर्शवतात. तसेच एका कवीने तर बाबांची तुलना थेट प्रभू श्रीरांमाशी केलेली आहे. तर या ठिकाणी कोणी बाबांना संत तुकाराम महाराजांचा पाईक म्हटलं आहे. म्हणजेच बाबांच व्यक्तिमत्व इतकं विलोभनीय आहेच. पण तुलनीय सुद्धा आहे. असं मला वाटतं. याशिवाय बाबांना डेरेदार खोड म्हटलं आहे, स्नेहभावाचा तरु म्हटलं आहे, तसेच मागेल ते‌ द्याल असा कल्पवृक्ष म्हटलं आहे, तर अनेक कवींना सामावून घेणारा वटवृक्ष सुद्धा म्हटलं आहे. एका कवीला तर बाबा हिऱ्याची खाणच वाटतात.


ज्युनिअर चॅर्ली चॅपलीन

ज्युनिअर चॅर्ली चॅपलीन          

बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना, बाबा कोण आहेत? बाबा कसे आहेत? हे पाहणं आवश्यक आहे. या बहुरंगी व्यक्तिमत्वाबद्दल एका कवीने तर त्यांना 'महात्मा' हे विशेषण लावले, हे एक विशेषच आहे. तसं पाहिलं तर ' लाडके' हे विशेषण साधारण आहे. पण बाबांबद्दल बोलताना मात्र 'लाडकेच' असं विशेषण वापरण्यात आलं. (या ठिकाणी अष्टाक्षरी हा नियम असल्यामुळे संशयाला जागा आहे. पण हा विनोदाचा भाग सोडा... )  बाबा चन्ने किर्तीवंत आहेत, बाबा चन्ने यशवंत आहेत, तसेच ज्ञानतारा व दयावानही त्यांना म्हटलं आहे. 
          
काही कवितेमध्ये 'येवो‌ बहर क्षणांना' या पदबंधाची पुनरावृत्ती खरंच मनाला लुभावते व कविता आधिक उठावदार करते. तसेच प्रत्येक कडव्यांच्या सुरुवातीला 'येवो बहर क्षणांना' या पदबंधामुळे त्या काव्यार्थाचे विभावण होते असं मला वाटतं.
          
मित्रांनो, खरं तर तुम्ही सगळे सारस्वतकार धन्य आहात. मी सुरूवातीला सांगितल्याप्रामाणे चरित्र काव्य  लिहताना चारित्र्याला खूप जपावे लागते. चारित्र्याला गालबोठ  लागणार नाहीत. तसेच चरित्र आधिक उठावदार करण्यासाठी वापरलेली विशेषणं हे टुकार तर नाहीत ना! किंवा अतिशयोक्ती तर नाहीत ना! याचा विचार करणं, ही खरी गरज असते. सर्वच सारस्वतकारांनी वापरलेले पदबंध हे कविता वाचताना मला स्वतःचं दिल (मन) गार्डन गार्डन करणारे होते‌. मनोदीप लावताना, शिल्प व्हावे पाषाणाचे, अध्यात्मिक प्रवासात, भावस्पर्शी नात्यातून फुलबाग फुलवावी, शब्दसुमनांची माळ, आनंदाची मांदियाळी, आनंदाच्या बासरीचे, फुलांची वाट, वेल साहित्याचा, झळकती तलवार, गंधाळला, मनमोर हा नाचला, क्षितिजाच्या कडेवरी, पुन्हा नरदेह नाही. अशा प्रकारची किती तरी पदबंध बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वालाच नाही, तर तुम्ही  लिहलेल्या काव्याला सुद्धा आधिक फुलवत होते.
     
पण, मित्रांनो खेदाने एक गोष्ट या ठिकाणी सांगाविशी वाटते. काही कविता अष्टाक्षरी या काव्यप्रकारात नव्हत्या, शिवाय‌ काही कवितेत अकलेचे तारे तोडले होते. मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे 'चरित्र्यकाव्य'  लिहतांना आपल्याला मनाला थोडा आवर घालावा  लागतो. शुभेच्छा देताना किर्तीवंत, यशवंत, यासारखी विशेषणं आपण वापरतो पण 'महात्मा ' यांसारखं विशेषण किंवा तुकाराम व रामाची तुलना एखाद्या व्यक्तिशी करणं हा अतिरेक तर नाही ना, हा विचारही करायला हवा. आपण सारस्वतकार आहोत. आपण पुढारी नाहीत. आणि पुढाऱ्यांचे कार्यकर्ते तर नाहीतच, त्यामुळे पुढच्या वेळी शुभेच्छाकाव्य किंवा चरित्रकाव्य लिहतांना हा विचार नक्कीच व्हायला हवा. महत्वाचं म्हणजे 'शुद्धलेखन' हे शुद्ध असावे. असं मी समूहावर नेहमी सांगत असतो. आणि ते शुद्ध असावे हे सांगता सांगता बेशुद्ध होण्याची‌ वेळ‌ माझ्यावर आली आहे. आपण थोडासा विचार करावा आपण 'दिन' हा शब्द 'दीन' असा जरी  लिहला तर शब्दाचा पूर्ण अर्थ बदलतो जसं की, दिन म्हणजे दिवस आणि दीन म्हणजे गरीब... 
          
काही कविता बाबासाहेब चन्ने या व्यक्तिमत्वाभोवती फिरत होत्या, तर काही कविता बाबांच्या परीघाभोवती पण नव्हत्या. येवो बहर क्षणांना या‌ पदबंधावर काहींनी कविता लिहल्या पण त्यात बाबासाहेबांचा उल्लेखही नव्हता. म्हणजेच अनेक जनांना तर विषयच समजला नाही. असंही मला यावेळी‌ जाणवलं. जेव्हा आपण  लिहायला बसतो तेव्हा आपली एक चौकट ठरलेली असते आपल्याच मनाशी आणि मग लेखणी आपल्या मेंदूचा ताबा घ्यायला सुरु करते पण लेखणीवर मेंदुच अधिराज्य व्हायला हवं तरच मेंदूतून योग्य‌ पदबंध, योग्य उपमा‌ व अलंकार व संकल्पना जन्माला येतात. कल्पनेच्या पातळीवर बऱ्याच कविता लिहलेल्या आहेत. माझ्या मते स्पर्धा ही नेहमी निकोप असावी. या  सर्व कविता वाचल्यावर एक उणीव मला जाणवली. ती म्हणजे बाबांच्या असण्याबद्दल किंवा बाबांच्या दिसण्याबद्दल एकाही सारस्वतकाराला लिहावं वाटलं नाही. तसेच बाबासाहेबांचे भालचंद्र नेमाडेसारख्या साहित्यिकांसोबत असणं हे कोणालाच दिसलं नाही. हे सुद्धा 'येवो बहर क्षणांना' मध्ये नमुद व्हायला हवं होतं. 
          
खरं म्हणजे आयोजकांनी अत्यंत सुक्ष्म निरिक्षण करुन 'येवो बहर क्षणांना' हा पदबंध तुम्हाला दिला होता. खरच बहर यायला हवा होता सगळ्यांच्या काव्याला, आणि तो अनेक जनांच्या काव्याला आलाय, अगदी स्फुरल्यासारखी कविता बाहेर आली आहे. 'विल्यीम वर्ड्सवर्थ' म्हणतो- 
"poetry is the spontaneous overflow of powerful feelings in tranquility" काही कविता वाचताना मला हे वर्ड्सवर्थचे शब्द आठवले. इतक्या उत्तम कविता  लिहिलेल्या आहेत. 
          
मित्रांनो, या ठिकाणी थांबताना मी इतकंच सांगू इच्छितो की, कविता तीन प्रकारची असते. शब्दांच्या पातळीवर बोलते ती अधम, शब्दाच्या अर्थाच्या पातळीवर बोलते ती मध्यम, आणि शब्दाच्या गर्भित अर्थांवर बोलते ती उत्तम कविता असते. मग आपणच ठरवायच असतं अधम, मध्यम की उत्तम कविता लिहायची.
          
कोरोना बाहेर फिरतोय पण तुमच्यावर कोणतेही संकट न येता तुमच्या प्रत्येक क्षणांना व कवितांना बहर येवो हीच अपेक्षा... तसेच प्रस्तावना लिहिण्याची संधी दिल्याबद्दल अमर सर, हरी सर शतशः धन्यवाद. आणि बाबासाहेब मी तुम्हाला भेटलो नसलो तरी सगळ्या कविता वाचल्यानंतर तुमच्या भेटीची ओढ लागली आहे. 
धन्यवाद...

प्रा. जगदिश अनंत संसारे, 
अध्यक्ष : विश्वभान प्रतिष्ठान, मुंबई.
आर. जे. : रेडिओ पुणेरी आवाज - १०७.८ एफ. एम. पुणे