मुक्त श्वासाच्या शोधात: जीवनातील अनेक पैलूंना स्पर्शून जाणारी सामाजिक जाणीव

कवियत्री रत्ना मनवरे यांच्या व्यक्तीमत्वावर महापुरुष आणि महामातांची आणि आईची छाप आहे. त्यांची पहिली सावित्रीमाई दुसरी आईवर आणि तिसरी कविता ही महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती आहे.

मुक्त श्वासाच्या शोधात: जीवनातील अनेक पैलूंना स्पर्शून जाणारी सामाजिक जाणीव

लेखणीत माझ्या आले बळ
लिहीली सावित्रीमाई तुझी गाथा
तुझ्याच चरणी झुकत राहो
इथल्या प्रत्येकाचा माथा!' 

' सावित्रीमाई ' या पहिल्याच कवितेतील शेवटच्या कडव्यात कवियत्री रत्ना मनवरे यांनी सावित्रीमाई यांना वंदन करून भारतीय महिलांचे जग फक्त चूल आणि मूल इतकेच नसून त्यांना जर योग्य वेळी योग्य संधी उपलब्ध झाली तर आकाशाला गवसणी झालेल अशी मांडणी केली आहे. सावित्रीमाईच्या उपकाराची जाणिव ठेवत कवियत्री लिहीतात की,

'हातात घेऊनी शिक्षणाची ज्योती
उज्ज्वल केले कित्येक भविष्य 
प्रथा परंपरा गाडून शिक्षणाची कास
सोनियासारखे घडविले आमचे आयुष्य! '

' आईची माया ' या अत्यंत अर्थपूर्ण आणि आईवरच्या उत्तुंग प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या अभंगातून आईविषयी मनात येणाऱ्या सर्वांगसुंदर भावना तितक्याच ताकदीने लिहील्या आहेत. आईचे मोल, आईच्या प्रेमाचे मोल कुणीही करु शकत नाही याची प्रचिती अभंगाच्या पहिल्या कडव्यात देताना कवियत्री लिहीतात, 

आईच्या मानेला। नाही कुठे मोल
आहे अनमोल। साऱ्या जगी।। 

आईविण जगणे मुश्कील आहे हे सांगताना मन हळवे होते. आईशिवाय कुणी राहू शकत नाही. आई म्हणजे सर्वस्व असल्याची भावना व्यक्त करण्यासाठी कवियत्री लिहीतात की, 

वाटते जगणे। आई विना व्यर्थ। 
जगण्याचा अर्थ। निरर्थक।। 
आईचा अभंग। लिहू मनोभावे। 
प्रेम रे जागवे। हृदयात।। 

कवियत्री रत्ना मनवरे यांच्या व्यक्तीमत्वावर महापुरुष आणि महामातांची आणि आईची छाप आहे. त्यांची पहिली सावित्रीमाई दुसरी आईवर आणि तिसरी कविता ही महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील महिलांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कसा सकारात्मक बदल केला आहे यावर 'अस्तित्व माझे' ही कविता आहे. या कवितेत कवियत्री रत्ना मनवरे लिहीतात की, 

चूल-मूल, रांधा, वाढा
स्त्रीचे आयुष्य बंदिस्त 
क्रांतीसूर्य उगवला भूवरी
रुढी परंपरेचा झाला अस्त!'
शेवटच्या कडव्यात कवियत्री लिहीतात की, 
' धन्य ते कायदेपंडित
अस्तित्वाचा केला मान
काळाच्या सुवर्ण पटलावर
माणूस म्हणून केला सन्मान

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील समस्त महिलांचा सन्मान माणूस म्हणून केला, महिलांच्या अस्तित्वाचा मान राखला या भावना व्यक्त करुन संपूर्ण भारतातील महिलांच्यावतीने बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले आहे.
'ती उपेक्षितच...!'  या भारतातील सामाजिक रचनेवर आसूढ ओढणाऱ्या कवितेत कवियत्री रत्ना मनवरे यांनी इथल्या अनिष्ट रुढी परंपरा प्रथा यावर खूप ज्वलंत भाष्य केले आहे. धर्म कोणताही असो पण त्या धर्मातील महिलांच्या वाटेस उपेक्षा येते हे सत्य आहे. कवियत्री रत्ना लिहीतात की, 

भर रस्त्यावर कित्येक नजरांचा विकार
रोजच होतो तिच्यावर सामूहिक बलात्कार 
नग्न शरीराचा नराधमाच्या डोळ्यात आजार
साडीत, बुरख्यात कुठल्याही वस्त्रात असुरक्षितच
म्हणून अजूनही ती उपेक्षितच 

उपेक्षित राहिलेल्या महिलांच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी अत्यंत साधेपणाने शब्द रचना करण्यात आली आहे तरीही कविता काळजाला भिडणारी आहे. कवियत्री भावनाप्रधान आहेत, त्यांच्या कवितेत शब्दांची मांडणी जितकी ताकदीची आहे तितकीच ती नाजूक, प्रेमळ, मनावर भुरळ घालणारी आहे. 'अलवार क्षण' या  कवितेत कवियत्री रत्ना मनवरे लिहीतात की, 

मनाच्या कुपीला हळूवार उघड
मिटवून डोळे शांत पडून रहा
आठवणी सुगंधी बागेतील
ते अलवार क्षण आठवून पहा...! 

चौथ्या कडव्यात कवियत्री लिहीतात, 

मिठीतल्या बेधुंद क्षणांचा 
क्षण क्षण साठवून पहा
गर्दीतही एकटं करणारे
ते अलवार क्षण आठवून पहा...! 


इतक्या हळुवारपणे ते मिठीतले क्षण आठवून पाहण्याची ती सुंदर याचना मनाला भावते, मनाला सुखद स्पर्श करते. प्रेमाची अनुभूती देणारी ही कविता खूपच अप्रतिम आहे.
महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात माता रमाईचे स्थान किती मोठे होते ते सांगणारी कविता म्हणजे 'रमाई'. या कवितेतून माता रमाईचे वर्णन केले आहे ते अगदी विलक्षण सुंदर आहे. बाबासाहेब आंबेडकर हे रमाईशिवाय अधुरे होते याच आशयाची ही कविता प्रत्येक सहृदयी माणसाच्या मनात घर करून राहील. अत्यंत सुंदर शब्दांचा मिलाफ या कवितेत घालून माता रमाईची महती सांगताना कवियत्री रत्ना मनवरे भावुक होताना दिसून येतात. कवितेच्या ओळीओळीतुन, शब्दाशब्दामधुन माता रमाईच्या उपकाराची जाणिव करून देण्यासाठी कवियत्रींनी सुंदर कविता लिहिली आहे. त्या कवितेत कवियत्री लिहीतात की, 

महासूर्याचं आभाळ
माता रमाई
भीमाच्या दिव्याची वात 
माता रमाई
भीम कळसाचा पाया
माता रमाई
भीम कारुण्याचा अर्थ
माता रमाई

'मुक्त मी' या कवितेतून कवियत्री सावित्रीमाई, भिमाई, रमाईची लेक असल्याचे आणि जीवनात कसलीही चुकीची तडजोड न करता आपल्या आदर्श मातांच्या आदर्श मूल्यांवर चालणारी एक बंधमुक्त स्त्री उभी केली आहे. 'परिवर्तनाचा निळा झेंडा घेतला हाती कर्मठ दास्याच्या बंधनातून मुक्त मी' या ओळी असतील किंवा   मीच पेटवली मशाल माझ्या अस्तित्वाची प्रकाश देत राहील होऊन दीप, मुक्त मी' या कवितेतून कवियत्री सांगू इच्छिते आहे की, जुन्या टाकाऊ चालीरीती, प्रथा, परंपरांना तसेच कर्मठ दास्यत्वाच्या जोखडांना तोडून पायातील मनुवादी व्यवस्थेच्या बेड्या तोडून मुक्त श्वासाच्या शोधात मी आहे. काव्यसंग्रहाचे शिर्षक 'मुक्त श्वासाच्या शोधात' असे आहे त्या शिर्षकाला साजेशी ही कविता अतिशय अर्थपूर्ण आणि मार्मिकपणे लिहीली आहे.

आशावादी आणि प्रेरणादायी विचार सांगणारी त्यांची पुढील रचना म्हणजे 'माणुसकी'.  या कवितेतून त्यांनी अगदी चिमणीपाखरांपासून ते रंजल्या गांजलेल्या लोकांना मदतीचा हात पुढे करून त्यांच्यावर झालेल्या प्रेरणादायक विचारांची वीण त्या घट्ट करताना दिसतात. 

' भुकेल्याला देऊ ताटातला घास
चला आपण माणुसकीत घेऊ श्वास! 
अथवा 
' स्वतःसाठी थोडं इतरांसाठी ही जगू
चला आपण माणुसकी आनंदाने वागू! '.

या भावविभोर ओळींमधून मानवी जीवनाकडे पाहण्याचा कवियत्री रत्ना मनवरे यांचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे हे मान्य केले पाहिजे. उर्जा, चैतन्य आणि विश्वास असेल तर सामर्थ्यवान पिढी निर्माण होईलच आणि ती पिढी महामानवांच्या मार्गावर चालत असताना देशही प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत राहिल असा आशावाद व्यक्त केला गेला आहे.

कवियत्री रत्ना मनवरे यांच्या जीवनावर महामानवांचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्या कवितेत महामानवांच्या विचारांचा फार मोठा पगडा आहे. त्यांच्या कवितेतून महामानवांच्या कृतार्थतेची जाणिव दिसून येते. महात्मा फुले, बाबासाहेब, शिवराय, शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणार्‍या अनेक कविता या काव्यसंग्रहात आहेत. जसा महामानवांचा प्रभाव आहे तसाच माता रमाई, सावित्रीमाई, जिजाऊ भिमाई यांची लेक असल्याचा सार्थ अभिमानही या काव्यसंग्रहातील अनेक कवितांमधून दिसेल. वैचारिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्याला असे दिसेल की महामानवांच्या मार्गावर चालत असलेल्या सहपथीकांना मार्गदर्शन करण्यासाठी हा काव्यसंग्रह अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक म्हणून काम करताना दिसतो. जातवास्तव , अनिष्ट रुढी परंपरा यांना छेद देत नव्या उमेदीने, विश्वास आणि पंखात बळ देण्यासाठी धडपडणाऱ्या कविता या कवितेतून कवियत्री रत्ना मनवरे यांच्या भावुक लेखणीतून उतरलेल्या आहेत.  जीवनातील प्रत्येक संकटांना धीराने, संयमाने आणि आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी या कविता नक्कीच मार्गदर्शन करत राहतील.  मानवतेच्या आगारातील महामेरू म्हणजे बाबासाहेब. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची जाणिव वारंवार या कवितांतून दिसून येते. ' उध्दारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे' या पंक्तींची आठवण या काव्यसंग्रहाचे वाचन करताना नक्कीच येते. 'प्रेम करावं' या कवितेतून कवियत्री रत्ना मनवरे कोणावर प्रेम करावे याविषयी लिहीतात की, 

'बुद्धाच्या शांतीवर
अशोकाच्या क्रांतीवर
बाबासाहेबांच्या संविधानावर
प्रेम करावं'
त्या पुढे लिहीतात की, 
' जिजाऊंच्या समर्पणावर
शिवाच्या त्यागावर
मावळ्यांच्या निष्ठेवर
प्रेम करावं'. 

सर्वच कवितांचे रसग्रहण करणे शक्य नसले तरीही या काव्यसंग्रहातील कविता जगण्याची नवी उर्मी देतात हे मान्य केले पाहिजे. 

सावित्रीचा वारसा वसा
लेखणी आहे हातात
तोडून श्रृंखला गुलामीच्या 
मुक्त श्वासाच्या शोधात...

या ओळीतुन गुलामीच्या बेड्या तोडून मुक्त विहार करण्यासाठी सज्ज झालेल्या आधुनिक भारतातील सजग, सुशिक्षित आणि निडर स्त्री दिसून येते. 

Satish Bharatvasi
सतिश भारतवासी, कोल्हापूर.