निस्सीम विठ्ठल भक्त व संवेदनशील मनाची कवयित्री : प्रिती भालेराव

प्रिती भालेराव साहित्य क्षेत्रात तर त्या उत्कृष्ट काव्यलेखन व स्तंभलेखन करत आहे. काव्यातील विविध प्रकार हाताळतांना त्या वाचकांना दिसतात. विठ्ठलभक्त असल्यामुळे त्या विठ्ठलावर पण खुप छान लिहितात.

निस्सीम विठ्ठल भक्त व संवेदनशील मनाची कवयित्री : प्रिती भालेराव

आपुलिया हिता, जो असे जागता।
धन्य माता पिता, तयाचिया ।।१।।
कुळी कन्या पुत्र, होती जे सात्विक।
तयाचा हरीक, वाटे देवा ।।ध्रु।।

गीता भागवत करिती श्रवण।
आणिक चिंतन विठोबाचे ।।२।।
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा।
तरी माझ्या दैवा पार नाही ।।३।।

वरील संत तुकाराम महाराजांचा अभंग माणसाला खुप काही शिकवून जातो. महाराजांच्या वरील एकाच अभंगात सुसंस्कृत देश घडविण्याची ताकद आहे. फक्त प्रत्येकाने तुकाराम महाराजांच्या अभंगाचे अनुकरण करायला पाहीजे. कारण जो देशाच्या,  धर्माच्या, समाजाच्या उन्नतीसाठी, हितासाठी नेहमी तत्पर असतो. जागे असतो. त्याचा विचार साक्षात पंढरीचा विठोबा करत असतो. अशा तत्पर असणाऱ्या साधकाच्या कुळात, कुटूंबात नक्कीच श्रेष्ठ व्यक्ती जन्म घेत असते. आणि त्या व्यक्तीचा हेवा पूर्ण देश करत असतो. तसेच त्याचा हेवा देव पण करत असतो.

फक्त आपल्याला गरज असते, आपल्या कुळात जन्म घेणाऱ्या बालकाला संस्कार देण्याची कारण संस्कारक्षम अपत्ये हीच खरी देशाची संपत्ती असते. अशी अपत्ये स्वतःचा नव्हे तर कुळाचा आणि देशाचा उद्धार नक्कीच करू शकते. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही स्वतःपासून केली जाते. तेव्हाच ते कार्य पूर्ण होत असते. त्यामुळे संत तुकाराम महाराजांनी अशा मातापित्यांचा हेवा ईश्वराला देखील वाटतो असे वरील अभंगात म्हटलेले आहे. कार्यसिद्धी आणि समाजहितापासूनच देशाचे बीज पेरले जाते. मानवी मनाला वळण लावणाऱ्या घटनांची सुरुवात 'घर' नावाच्या छोट्या विश्वापासूनच सुरू होते. आणि त्यात आई-वडीलांचा सिंहाचा वाटा असतो. कोणतेही लहान बाळ हे अनुकरणीय असते. त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटना या त्याच्या बालमनावर परिणाम करत असतात. लहान वय हे संस्कारक्षम असते. परंतु त्याच्या मनाचा कागद हा कोरा करकरीत असतो. अशा कोर्‍या कागदावर लिहिलेल्या संस्कारावरच पुढील आयुष्याची सुरूवात होते.

प्रत्येक माणसात नर आणि नारायण, देव आणि दैत्य गुणांचा वास जन्मताच असतो. परंतु सभोवतालची परिस्थिती यामध्ये असणाऱ्या काही गुणांना आकार देत असते. बालपणाचे संस्कार माणसाला राम ही बनू शकतात, तसेच अहंकारी रावणही बनवू शकतात. बालपणाच्या संस्कारात खुप मोठी ताकद असते. माता जयवंता बाईसाने महाराणा प्रतापसिंहांच्या बालमनावर देशप्रेमाचे संस्कार कोरले, त्या देशप्रेमाच्या संस्कारामुळे महाराणा प्रतापसिंह घडले, आणि आज हिंदुस्थानच्या इतिहासामधील सर्वात महापराक्रमी राजा म्हणून महाराणा प्रतापसिंहाचे नाव पूर्ण जगात घेतले जाते. राजमाता माँसाहेब जिजाऊ यांनी सुसंस्कार केले म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज घडले. 'तुझ्या पायाला घाण लागली तरी चालेल परंतु तुझ्या मनाला घाण लागता कामा नये', असे ज्या आईने सांगितले तिथे सानेगुरुजीसारखे विचारवंत घडले. संस्कार रुजवावे लागतात. आपण जसे स्वतःचे आचरण ठेवतो, तशीच अनुकरणप्रिय पिढी निर्माण होत असते. मुलगा जर सुसंस्कृत घडला तर तो एका कुळाचे नाव उज्वल करतो. अन् मुलगी जर सुसंस्कृत घडली तर ती माहेर व सासर या दोन कुळांचे तीने उज्वल करते. आणि त्यामुळे अनेक सुसंस्कृत पिढ्या निर्माण होतात. 

तसेच सोलापूर जिल्ह्यातील  पंढरपूरपासून फक्त पंचवीस किलोमीटरवर असलेलं छोटसं गाव. आणि त्या गावातील श्री. हनुमंत भागवत कुंभार व त्यांची सौभाग्यवती  आशाबाई हनुमंत कुंभार हे निस्सीम विठ्ठलभक्त. त्यांची विठ्ठल रखुमाईवर प्रचंड श्रध्दा. त्यांच्या घरात आध्यात्मिक वारसा हा फार पुर्वीपासूनच चालत आलेला होता. त्यामुळे साक्षात विठ्ठल रखुमाईचे देखील कुंभार कुटूंबावर मनापासून प्रेम होते, असेच म्हणता येईल. त्यामुळेच की काय? हनुमंतराव व आशाबाई यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आले. प्रिती नाव त्या कन्येचे. साक्षात रखुमाईचेच रूप जणू ते.

बालपणापासूनच प्रिती यांच्यावर  सुसंस्कृत व आध्यात्मिक संस्कार झाले. त्यामुळे प्रिती पण आईवडीलांप्रमाणे विठ्ठलभक्तच होत्या. पायी वारी करणे, भजन म्हणणे, हा त्यांचा आवडता छंद. तसेच प्रितींचा विवाह पुण्यातील श्री. सुरज रमेश भालेराव यांच्याशी झाला. सासरी येतांना त्यांनी विठ्ठलभक्तीचा वारसा सोबत आणला. तसेच त्यांना सासू सासऱ्यांची अनमोल साथ मिळाली. आध्यात्माबरोबर प्रिती भालेराव यांनी साहित्य, चित्रकला, गायन या क्षेत्रात देखील नाव कमविले. 

साहित्य क्षेत्रात तर त्या उत्कृष्ट काव्यलेखन व स्तंभलेखन करत आहे. काव्यातील विविध प्रकार हाताळतांना त्या वाचकांना दिसतात. विठ्ठलभक्त असल्यामुळे त्या विठ्ठलावर पण खुप छान लिहितात. यावर्षी कोरोनामुळे वारी झाली नाही. म्हणून त्या आपल्या सावळ्या विठोबाला 'आठवण वारीची' या कवितेत लिहितात.

विठुराया यंदा तुझी वारी नाही ना रे घडली
वारीची स्वप्न सारी, माझ्या मनातच विरली

तुझ्या वारीच्या आठवणींचा लागेना मज ठाव
मनामध्ये अजूनी माझ्या तोच भोळा भक्तिभाव

क्षणा क्षणाला मला तुझी वारीच आठवते
वारीच्या आठवणी साऱ्या मनात साठवते

वारीतला तो नित्यनेम असतोच ठरलेला 
उच्चनीच असा भेदभाव कधी नसतो त्याला

यंदा तुझी वारी नसणार, हे सहनच होईना
वारीची आठवण माझ्या मनातून काही जाईना

असा कसा रे तू देवा, भक्तांवर रुसलास?
कर कटेवरी ठेवुनी असा कसा बसलास?

बस झालं आता, तूच दाखव लीला तुझी
खूप झालं बाबा, दर्शनाची प्रतीक्षा संपव माझी

वारी नाही घडली तुझी, प्राण आला कंठाशी
येते न चुकता चालत, तिष्ठने तुझ्या दाराशी

होतो बहू आनंद तुझ्या भेटीची आस लागता
खूप काही देतोस तू, मी काहीच न मागता

चंद्रभागेचे दर्शन घेता होते पापातून मुक्ती
कळू दे की रे तुलाही माझी भोळी भक्ती

तुझे मुखकमल मला पुन्हा एकदा पाहायचे
तुझ्या भक्तीचे पोवाडे खूप आनंदाने गायचे

घरच्या घरी तुझी वारी मी रोजच आठवणार
वारीच्या त्या मधुर आठवणी मनात साठवणार

तुझे दर्शन लवकर होवो एवढीच मनोकामना
शब्द हे अबोल माझे आणि मुक्या आहेत भावना

वरील काव्यरचना वाचल्यानंतर प्रिती भालेराव यांची विठ्ठलाप्रती किती निस्सीम भक्तीभाव आहे हे वाचकाच्या लक्षात येते. भक्तीकाव्याप्रमाणेच त्यांनी विविध विषयांवर काव्यरचना केलेल्या आहे. मागील आठवड्यात कोकणातील तळई गावात घडलेल्या घटनांचा त्यांनी 'काळरात्र' या कवितेतून अचूकपणे वेध घेतलेला वाचकाला दिसतो. कवितेच्या काही ओळी पुढीलप्रमाणे...

हो! ती जणू एक काळरात्रच ठरली
रात्रीतून उभी पिकं नाहीशी झाली

उभी शिवारं उध्वस्त झाली
जनावरांची सुद्धा दैना झाली

काळाने अचानक कित्येकांवर घाला घातला
झोपेतच अनेकांचा श्वास असा थांबला

अचानकपणे डोंगर कसा तुटला
क्षणातच जणू श्वास असा सुटला

तळई गावात हाहाकार असा माजला
अनेकांचा संसार पाण्यात वाहून गेला

माणसांना झालेला त्रास मला तर पाहवेना
जनावरांचे हाल आता कोणी सुद्धा पुसेना

होईल सगळं पूर्ववत अशी वाटते आशा
का केली अशी देवा आम्हां सर्वांची निराशा

तळई गावातील लोकांना थोडीशी मदत करूया
धीराचे दोन शब्द बोलून थोडासा आधार देऊया

वरील काव्यरचना वाचल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की, कुठल्याही कलाकृतीची, साहित्यकृतीची निर्मिती हा त्या कलावंतांच्या प्रतिभेचा आविष्कार असतो. म्हणून तिच्या अभिव्यक्तीची तगमग त्याला सतत बैचेन करत असते. किंबहुना तिचं मुर्तरूप हीच खऱ्या अर्थाने त्याच्या मनाची परिपूर्ती असते. किंवा अंतिम तृप्ती असते. लेखक कलावंत ही त्याला फारसा अपवाद नसतो. संवेदनशील लेखक/ लेखिका, कवी/कवयित्री हा अदिम काळापासून समाजाचा भाष्यकार राहीलेला आहे. तेथील तत्कालीन समूहमनाच्या वृत्ती - प्रवृत्तीमधून निर्माण होणारे विविध विचारप्रवाह त्याच्यातून घडत, रूढ होत, बदलत जाणाऱ्या अनेक घटनांचाही कमी-अधिक प्रमाणात तो साक्षीदार राहीलेला आहे. अशाचप्रकारे तळई गावात झालेल्या भीषण वास्तवाच्या जणू काही कवयित्री प्रिती भालेराव या त्या घटनेच्या साक्षीदारच आहे. असे मला वाटते. म्हणून कवयित्री प्रिती भालेराव यांना 'मन असलेली संवेदनशील कवयित्री' असे म्हटले तरी काहीच वावगे ठरणार नाही. असे मला तरी वाटते. 

तसेच कवयित्री प्रिती भालेराव यांचे स्तंभलेखही वास्तव परिस्थितीवर भाष्य करतात. त्यांचा 'वाचनसंस्कृती अडकली मोबाईलच्या विळख्यात' हा स्तंभलेख वास्तवावर बोट ठेवतो. अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आपली वाचनसंस्कृती मोबाईलच्या अतिवापरामुळे दम तोडते की काय? अशी भिती देखील त्या वाचकासमोर व्यक्त करतात. तसेच 'शिक्षित, सुशिक्षित व सुसंस्कृत' हा त्यांचा स्तंभलेख अनेक शिक्षित व सुशिक्षित लोकांना मार्ग दाखवतो. शिक्षित म्हणजे काय? सुशिक्षित म्हणजे काय? आणि सुसंस्कृत म्हणजे काय? याचे विवेचन वरील स्तंभलेखात आपणास पाहावयास मिळते. 

तसेच अध्यात्म व साहित्याप्रमाणेच कवयित्री प्रिती भालेराव यांना चित्रकलेची देखील खुप आवड आहे. त्यांनी आतापर्यंत पेन्सिलने शेकडो चित्र काढलेले आहे. त्यात प्रामुख्याने शहाजी महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज,  बालकृष्ण, घोड्यावर बसलेला सैनिक असे अनेक चित्र काढलेले आहे. त्याचबरोबर त्यांना गायनाची पण आवड आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक भजन तसेच चित्रपटाचे गीते हुबेहूब गायलेले आहे. त्यांच्या आवाजातील संत जनाबाईचे भजन मी पण अनेक वेळा ऐकलेले आहे. अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रिती भालेराव यांनी आपल्या दोन्ही कुळाचे नाव उज्वल केलेले दिसून येते. तसेच साक्षात विठोबाला देखील त्यांच्या कार्याचा आणि दोन्ही कुळाचा हेवा वाटत असावा. असे मला मनापासून वाटते.

अध्यात्म, साहित्य, चित्रकला, गायन अशा विविध क्षेत्रात आपले नाव उंचीवर पोहचविणाऱ्या निस्सीम  विठ्ठलभक्त सौ. प्रिती सुरज भालेराव यांच्या हातून वरील सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी घडावी, तसेच त्यांचे जीवन नेहमीच सुखाने ओतपोत भरलेले असावे, दुःखाचा स्पर्श त्यांना कधीच होऊ नये. हीच त्यांच्या जन्मदिवसानिमित्त माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाकडून विठोबा रखुमाई यांच्या चरणी प्रार्थना. 

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर, जि. औरंगाबाद 
९६६५६३६३०३.