आदिवासी क्षेत्रातील संघर्षमय जीवन जगणारी नारीशक्ती : सौ. संगीता ठलाल

संगीताताईना लहानपणापासूनच गायनाची, वाचनाची, लिहिण्याची आवड होती एवढेच नाही तर. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची आवड होती.

आदिवासी क्षेत्रातील संघर्षमय  जीवन जगणारी नारीशक्ती : सौ. संगीता ठलाल

एखाद्या व्यक्तीमत्वावर ती दोन शब्द लिहिताना अभिमान वाटावा असं एक व्यक्तीमत्व‌ म्हणजेच कवयित्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या सौ. संगीताताई संतोष ठलाल. ताईंच्या जीवन प्रवासाविषयी थोडक्यात का होईना लिहिण्यास प्रयत्न करते. सर्वात प्रथम त्यांच्या बालपणाविषयी जाणून घेऊया अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी गडचिरोली जिल्ह्यातील झाडीपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील कुरखेडा तालुक्यातील छोटसं खेडं असलेलं भटेगाव येतील एका गरीब व शेतकरी कुंटूबात १३ फेब्रुवारी १९८४ ला   त्यांचा जन्म झाला. त्यांचे माहेरचे नाव कु. पिंगला केशवजी मुंगणकर आहे. त्यांच्या घराण्यात भक्तीमय वातावरण होते त्याच वातावरणातून व गरीब परिस्थितीतून त्या लहान्याच्या मोठ्या झाल्या. त्यांना लहानपणापासूनच गायनाची, वाचनाची, लिहिण्याची आवड होती एवढेच नाही तर. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची आवड होती. त्यांना लिखाणाचा छंद चवथ्या वर्गात असल्यापासून सुरु झाला तोही किराणा दुकानातील रद्दी वृतपत्र वाचून तेव्हापासून त्या लिहायला सुरुवात केली. अगदी प्रामाणिकपणे त्या लिखाणाचा छंद जोपासत आहेत.  संगीताताईचा आवडता विषय संघर्ष आहे आणि याच विषयाला धरून पुढे चालत रहाणे हेच त्यांचे खरे जीवन आहे. त्यांचे शिक्षण फक्त बारावी झाले व लगेच लग्न झाले तेव्हापासून त्यांचे सासरचे नाव सौ. संगीता संतोष ठलाल झाले. संगीताताईची आणि माझी ओळख आमच्या श्रीराम विद्यालय कुरखेडा येथे झाली. त्यांनी आपल्या मुलाचे नाव भरती करण्यासाठी आल्या होत्या, तेव्हा त्यांनी आपला परीचय खूप साध्या आणि  भोळ्या शब्दात दिला. त्यांच्याकडे बघून मला वाटलं की, त्यांच्याशी थोडं हितगुज साधावं म्हणून माझा परीचय दिला व आमच्या शाळेविषयी सांगितले, त्यांनी मोजक्याच शब्दात लिखाणाविषयी सांगितले, पण माझे लिखाण आजपर्यंत कोणत्याही वृतपत्रात प्रकाशित झालेले नाहीत मॅडम  आमच्या घरी एकदा तरी भेट द्या. असे म्हणून घरी निघून गेल्या. 
     
त्यांनी आपुलकीने बोलावले म्हणून मी वेळात, वेळ काढून त्यांच्या घरी गेली आणि बघतोय तर काय थोड्याच क्षणात त्यांच्यात मला एक प्रतिभाशक्ती दिसली त्याच भक्तीमय वातावरणाकडे बघून मला अत्यानंद झाला त्या माझ्यापेक्षा वयाने जरी मोठ्या असल्या तरी त्यांच्यात असलेली विचारसरणी आणि त्यांनी लिहिलेलं लिखाण वाचून मी प्रेरित झाली. आणि लगेच हे, लिखाण वृतपत्रात देण्यासाठी व मार्गदर्शन घेण्यासाठी दै. देशोन्नती वृतपत्राचे तालुका प्रतिनिधी प्रा. विनोद नागपुरकर यांच्याशी ओळख करून दिली. व आठ दिवसांनी आम्ही दोघीही डॉ. आरेकर सर यांच्याकडे त्यांचे लिखाण दाखवायला घेऊन गेलो. आरेकर सरांनी सुद्धा लिखाणाचे वाचन केले आणि त्यांनी सुद्धा लिखाणाची वाहवा केली. आज त्या माझ्या रक्ताच्या नात्यातील नसल्या तरी त्यांचे आणि माझे नाते आपुलकीचे, बहीणींसारखे आहेत. त्या सुद्धा मला आपली लहान बहीण मानतात. संगीताताई जशा लिहितात, तशाच जगतात म्हणून आज त्यांच्या विचारधारा, कविता ज्वलंत विषयावर लिहिलेले लेख लोकप्रिय झालेले आहेत. आजही वाचक वर्ग वाढत आहेत. त्यांच्याविषयी लिहितांना मला अभिमान वाटतो की, त्या खूप मेहनती आहेत. सोबत प्रामाणिकपणा, मनात हिंमत आणि स्वाभिमान ठेवून सत्याच्या बाजूने उभे राहतात. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे व लिखाणाचे श्रेय त्या स्वतः कधीच घेत नाही तर... त्यांच्या कार्याचे व लिखाणाचे कौतुक केले, शुभेच्छा दिल्या त्यांना आपले गुरु माणून समर्पित करत असतात. ते स्वतः म्हणतात की, मला हे नको आहे. निसर्गाने दिलेली मी फुकटची नोकरी करत आहे. समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविषयी व त्यांच्या भल्यासाठी नेहमीच विचार करत असतात. त्यांची परिस्थिती जरी नाजूक असली तरी त्या परिस्थितीवर मात करून समाधानी राहून आनंदाने जगत असतात आणि प्रत्येकांशी प्रेमाने दोन शब्द बोलतात. संगीताताई नेहमीच चारोळीच्या माध्यमातून म्हणतात की, 

   मी नाही मोठी कवयित्री
   मी नाही मोठी लेखिका
   या जीवनाच्या रंगमंचावर
   मी सादर करीत आहे 
   एक पात्री नाटिका

या ओळी प्रत्येक भाषणामध्ये बोलत असतात. आमच्या शाळेत‌ झालेल्या   बरेचदा कार्यक्रमात त्यांना आमंत्रित करण्यात येते व संगीताताई वेळात, वेळ काढून शाळेचा मान ठेवून उपस्थित राहतात आमच्या विद्यार्थींना मार्गदर्शन करतात. आजही त्यांची परिस्थिती नाजूक असली तरी जसे त्या लिहितात त्या प्रमाणे समाजकार्य घडवून आणतात, मग विधवा भगिणींचा सत्कार असो, किंवा मोलमजुरी करणाऱ्या भगिणींना सन्मान, दैनदिन वृतपत्र वाटप करणाऱ्या मुलांचा सत्कार असो किंवा कोरोना काळात अडकलेल्या लोकांसाठी घरोघरी जाऊन मागितलेली भीक. स्वत: केलेली मदत  उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे स्वखर्चाने बणवलेले रक्तदान कवितेचा बॅनर असो किंवा नगरपंचायतमध्ये सफाई कर्मचारी करणाऱ्यांचा राखी बांधून सत्कार असो किंवा आदिवासी सेवक स्व. मोतीरामजी कोल्हे यांचा सत्कार असो किंवा, आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोर गरीब आदिवासी कुंटुबातील दिव्यांग मुलींची मदत असो किंवा शाळेचा पहिला दिवस त्या निमित्ताने शाळेला भेट देऊन विद्यार्थीशी संवाद असे अनेक सामाजिक उपक्रम स्वतः राबवून त्यांनी दाखवलेले आहेत. त्यांनी जेव्हा आपल्या घरी वृतपत्र वाटप करणाऱ्या मुलांचा सत्कार केला त्यावेळी पदमश्री डॉ. परशुराम खुणे उपस्थित होते, सरांनी संगीताताईच्या उपक्रमाची प्रसंसा केली तसेच नावाजलेले मान्यवर उपस्थित होते. आजपर्यंत त्यांनी बरेच सामाजिक कार्य केले सोबत ओबीसी वर्गाला आरक्षण मिळावे यासाठी घंटानाद आंदोलनात सहभागी झाल्या, नागपूर येथे कलार समाजाच्या विकासासाठी आंदोलनात सहभागी झाल्या, त्या एक शेतकरी, गृहिणी असून सुद्धा तीन हजारापेक्षा जास्त लेखांचे लेखन केलेले आहेत, सर्व परिचित असलेले दै. पुण्यनगरी, देशोन्नती, तरूण भारत, सकाळ, विदर्भ मतदार अश्या अनेक दै. वृतपत्रात, मासिकामध्ये, दिवाळी अंकात लेख, कविता, चर्चा सत्रात तसेच प्रतिक्रिया लिहिलेल्या आहेत. आजही त्यांचे दैनदिन लेखन वृतपत्रात प्रकाशित होत आहेत. 

या वर्षी स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त नवसंजीवनी सार्वजनिक वाचनालय देऊळगाव येथे ध्वजारोहण करण्याचे भाग्य लाभले. अनेक ऑनलाईन कविता स्पर्धेचे परीक्षण केले, बऱ्याच कविता स्पर्धेत त्यांना सर्वोकृष्ट, प्रथम द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ क्रमांक मिळालेले आहेत अनेक सहभागी सन्मानपत्र मिळाले आहेत. बऱ्याच कार्यक्रमात अध्यक्ष, वक्ते, प्रमुख पाहुणी, विशेष अतिथी म्हणून आमंत्रित आहेत. गेल्या वर्षी युवक बिरादरी भंडारा संस्थेच्या वतीने क्रांतिदिनानिमित्त भंडारा जिल्ह्याचे‌ जिल्हा अधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते संगीताताईंचा उत्कृष्ट परीक्षक म्हणून सत्कार करण्यात आला. कुरखेडा येथे भारताचे माजी पंतप्रधान श्रद्धेय स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गडचिरोली येथील  आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा गीता हिंगे व त्यांच्या संस्थेकडून ताईंचा सत्कार करण्यात आला. अशा अनेक नावाजलेल्या मान्यवरांच्या हस्ते तसेच अनेक सामाजिक, शासकीय कार्यक्रमात त्यांचे सत्कार झालेले आहेत. नुकताच गडचिरोली येतील सुप्रसिद्ध साहित्यिक मा. कुसुमताई अलाम यांनी संगीता ताईचा आपल्या  स्वगृही  सत्कार केला. त्यांच्या कार्याचे कौतुक करून  फेसबुकवर प्रतिक्रिया दिली.  खास करून ताईबद्दल एक गोष्ट सांगावीशी वाटते की, आजही त्या एकत्र कुंटूबात राहत आहेत, घरचे सर्व काम, शेतातील कामं, सोबत लिखाणाचा छंद व समाजकार्य करत असतात. ताईंवर व त्यांच्या संघर्षातून घडलेल्या प्रवासाबद्दल व लिहिण्यासारखे खूप  काही आहे. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या संगीताताईंच्या कार्याची महाराष्ट्र  शासनाने दखल घ्यावी व त्यांचा सन्मान करावा. आज मला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द लिहिण्याचे भाग्य लाभले हेच माझ्यासाठी खूप काही आहे. मी ताईंना वाढदिवसाच्या गोड, गोड शुभेच्छा देते त्यांच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करते. त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि थांबते... धन्यवाद. 

lata margiya

सौ. लता मनोज मार्गीया, 
मु. पो. ता. कुरखेडा, जि. गडचिरोली