कोणतेही काम सुरु करण्याआधी त्याचा शेवट कशा पद्धतीने होणार याची स्वतःला माहिती असणे आवश्यक आहे. किंवा एखादे काम हाती घेतल्यानंतर ते तडीस नेणे गरजेचे आहे. असे ध्येय पूर्ण करण्यासाठी त्या ध्येयाचे छोट्या-छोट्या कामांमध्ये विभागणी करावी. त्यामुळे एखादे मोठे ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणा-या पाय-या आपोआप तयार होतील आणि अशा तयार झालेल्या पाय-यांपासून एक उत्तम मार्ग बनेल, त्या मार्गाने चालण्यास सुरुवात करा.
रात्री झोपताना किंवा दररोज सकाळी उठल्यावर आपण दिवसभरामध्ये कोणकोणती कामे करायची आहेत याची यादी आपल्याकडे उपलब्ध असते. त्यानुसार तुम्ही कामाला सुरुवात करता परंतु संपूर्ण दिवस पूर्ण गेला तरी सुद्धा काही कामे अजून पर्यंत उरलेली असतात. याचे कारण आपणाला उमजत नाही आणि अनेकांच्या तोंडातून असे शब्द बाहेर पडतात की, 'मी पूर्ण दिवस काम करत असतो तरी सुद्धा माझी कामे मागे उरतात.'
यावर एक साधा आणि सोपा उपाय आहे. तो म्हणजे आपण करत असलेल्या प्रत्येक कामाची किंवा काम पूर्ण करण्याची एक डेडलाईन ठरवत नाही. त्याचा परिणाम एखादे काम तुम्ही किती वेळात पूर्ण करावयाचे आहे ठरविले की त्या कामामध्ये एक प्रकारची गती आणि अचुक्ता निर्माण होते आणि त्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त काम करू शकाल.
आज या स्पर्धेच्या युगात बहुतेक विशेषतः खासगी क्षेत्रात अंतिम मुदतीचे म्हणजेच डेडलाईनचे पालन करावेच लागते. त्यामुळे काम दिलेल्या वेळेत पूर्ण होण्यासाठी मदत होते. आपल्या दिनक्रमातील कामांची डेडलाईन ठरवा आणि ही डेडलाईन नोंदवून घ्या. त्यानंतर तुम्हाला करावयाच्या कामाचे आणि तुमच्या जवळ असणा-या वेळेचे नियोजन करा. या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्वाची भूमिका बजावणारी डेडलाईन तुम्ही स्वतःच्या जीवनात देखील त्याचा वापर करा. तुम्ही कमी कालावधीमध्ये मोठे ध्येय गाठू शकाल आणि जीवनात यशस्वी व्हाल.