एका यशस्वी व्यापाऱ्याचं अतिशय सुसज्ज असं किराणा दुकान होतं. त्याचा व्यवसायही चांगला भरभराटीला आलेला असा होता. अर्थात् अनेक गिन्हाईक आपल्याकडेच अगदी विश्वासाने येतात आणि त्यांच्या दैनंदिन गरजा आपल्याकडेच खरेदी करून भागवतात. या विचाराने तो आनंदी होता. त्याच्याच दुकानासमोर एक मोठे आणि सुसज्ज डिपार्टमेंटल स्टोअर बांधले जात आहे, ही गोष्ट मात्र त्याच्यासाठी फार धक्कादायक आणि निराश करणारी अशी होती. त्या व्यापाऱ्याला असे वाटत होतं की हे नवीन दुकान आता आपला धंदा बंद करणार. त्रस्त होऊन तो त्याच्या गुरुकडे गेला आणि त्याला त्याने सांगितलं की हे दुकान जवळपास शतकापासून त्याचं पिढीजात आहे. ते गमावणं म्हणजे त्याच्यासाठी फारच नुकसान करणारं आहे, कारण त्याच्याजवळ दुसरा कुठला व्यवसाय करण्याचे कौशल्यही नाहीये.
गुरू म्हणाले, "जर तू त्या नव्या दुकानाच्या मालकाला घाबरत असशील, तर तू त्याचा तिरस्कार करशील आणि हा तिरस्कार म्हणजे तुझी अधोगती आहे, असं समज."
मग मी काय करू? त्या भ्रमिष्ट व्यापाराने विचारले.
रोज सकाळी दुकानाच्या बाहेर येऊन रस्त्यावर उभा राहात जा आणि तुझ्या दुकानाला चांगले आशीर्वाद दे, त्याच्या भरभराटीची इच्छा कर. मग तुझ्या समोरच्या त्या नव्या दुकानाकडे बघ आणि त्यालासुद्धा तसेच आशीर्वाद दे
काय? माझ्या स्पर्धकाला आणि माझा सर्वनाश करणाऱ्याला । आशीर्वाद...?
तू त्याला जे चांगले आशीर्वाद देशील तेच तुझ्याकडे परतून येतील, तू त्याच्यासाठी ज्या संकटाची इच्छा करशील ते संकट तुझाच विनाश करेल. एका वर्षानंतर तो व्यापारी गुरुला सांगण्यासाठी आला की त्याला ते दुकान बंद करावं लागलं आहे.
कारण तो आता त्या डिपार्टमेंटल स्टोअर्सचा मालक झाल्याने त्याला छोटं किराणा दुकान बंद करून टाकावं लागलं.
आपण एकटे कधीही जगू शकत नाही. कारण विश्वातील प्रत्येक घटक हा दुसर्याशी सूत्राने बांधलेलाच असतो. हे एक वैज्ञानिक असं सत्य आहे. आपल्या विचारामध्ये विभिन्न पातळ्यांमध्ये फिरण्याची क्षमता असते. आपल्या अनुभवाला येणारी किंवा आपण मनात बाळगलेली प्रत्येक भावना समग्र विश्वाला व्यापून टाकते. एखाद्या व्यक्तीविषयी आपण बाळगलेली चांगली भावना ही त्याच्यापर्यंत अजाणतेपणीही पोहचतेच. प्रत्येक व्यक्ती इतरांच्या चांगल्या वा वाईट भावना (कोणत्या का मार्गाने होईना, पण) समजून घेऊ शकतो. जाणतेपणी वा अजाणतेपणी आपल्या आयुष्यभर हे अपरिहार्य असे घटित घडतच असते. जेव्हापासून त्या किराणा व्यापाऱ्याने त्या डिपार्टमेंटल स्टोअरच्या मालकाचा तिरस्कार करणे सोडले आणि एवढच काय पण त्याला आशीर्वादही दिले, ते दोघे मित्र बनले आणि तो किराणा व्यापारी त्या डिपार्टमेंटल स्टोअरचा भागीदारही बनला. त्या किराणा दुकानदाराचा अनुभव अर्थात् बराच असल्यामुळे तो अतिशय सक्षमतेने ते स्टोअरही चालवू शकला. सरतेशेवटी, त्या मालकाने त्या डिपार्टमेंटल स्टोअरचे सारे अधिकार त्या किराणा दुकानदाराकडे देऊन टाकले आणि तो स्वत:चं भलं व्हावं म्हणून शहर सोडून दुसरीकडे गेला.