ताडोबा अभयारण्यातील एक अविस्मरणीय अनुभव

ताडोबाचे जंगल चंद्रपूर जिल्हया मध्ये स्थित आहे.  एकूण ६२५.४ स्क्वेअर किलोमीटर वर पसरलेले जंगल ताडोबा आणि अंधारी अशा दोन अभयारण्याना समाविष्ट करते.

ताडोबा अभयारण्यातील एक अविस्मरणीय अनुभव

काही वर्षापूर्वी आनंदवन हेमालकसा ट्रीप बरोबरच ताडोबा जंगलची एक सफारी करण्याची संधी मिळाली.  घनदाट जंगलात फिरण्याचा  हा पहिलाच अनुभव हो वाईट नशीब असे की त्यावेळी एखादे हरीण सोडल्यास आम्हाला कोणतेच  प्राणी आणि पक्षी दिसले नाहीत. त्यावेळी आमच्या सोबत  असलेल्या दुसऱ्या गटातील  मात्र ताडोबा मधील राणी माया आणि तिच्या पिल्लांचा मस्त रोड शो  बघता आला इतकेच नाही तर परत येताना त्यांना असंख्य प्राण्यांचे दर्शन झाले . त्यांच्या सुरस कहाण्या आणि फोटो बघण्यातच आम्हाला धन्यता मानावी लागली. मन नाराज  झाले पण त्या घनदाट जंगलाची ओढ लागली होती.

फक्त जंगलात खुल्या जीप  मधून फिरणे हा पण  एक सुंदर अनुभव होता.  पुन्हा ताडोबाला जायचेच असे मनाशी पक्के केले.  जुलै  २०२० ला जाऊ असे ठरत असतानाच करोना  ने डोके वर काढले आणि तो प्लॅन ही रद्द झाला. शेवटी  ताडोबा चे दर्शन करण्यास फेब्रुवारी २०२१  उजाडले.  
सगळ्यांच्या सुट्ट्या कामे परीक्षा यातून वाट काढत  ११ फेब्रुवारी २०२१ ला आम्ही नागपूरला रवाना झालो.

विमानात कोरोनाचे नियम पाळत नागपूरला  पोहचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला ताडोबाला जायचे असल्याने एक संध्याकाळ मोकळी  होती.  त्या दिवशी हल्दीराम आणि सावजी हे खाऊन घ्यायचेच असे ठरले होते. हल्दीरामचा अनुभव पुण्या पेक्षा नक्कीच छान होता. रात्री सावजी खाण्यासाठी  नागपूर मधील फेमस हॉटेल मध्ये गेलो. हिंमत आणि शहाणपणा करून एकच पाय सूप आणि सावजी मटण मागवले. सुपाचा पहिलाच चमचा घेत नाही तर तोंड पोळले.... झणझणीत मसालेदार तिखट..... बाकीचे  सूप  नाईलाजाने सोडावे लागले.  मग आले सावजी मटण जे पुण्याच्या मंडळींसाठी  कमी तिखट बनवले आहे असा वेटरचा दावा होता. पहिला घास घेतला... आणि सया पेक्षा सूप बरे असे म्हणण्याची वेळ आली. तिखट.... तिखट.... फक्त  तिखट....आणि तेलगट..... भराभर काहीतरी गोड आणण्याची ऑर्डर दिली ... मोजून पाच  ते सहा घास पोटात गेले असतील .... ते ही चपाती सोबत थोडा थोडा रस्सा घेऊन... प्रत्येक घासा गणिक एक रसगुल्ला असे असे पाच सहा  रसगुल्ले खाऊन पोट भरून बाहेर पडले.  सावजी खाण्याची हौस पूर्णपणे फिटली होती....

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आमचा टूर ऑपरेटर इनोवा कार घेउन हॉटेलच्या समोर उभा... ट्रीप मध्ये आपल्या बरोबर कोण कोण असेल ही उत्सकता होतीच.... पण काय... एका फॅमिली चे बुकिंग cancel झाल्याने  आम्ही आणि टूर operator अशी चौघांचीच ट्रीप सुरू झाली. एका अर्थी बरेच झाले की आम्हाला पूर्ण vip treatment होती अगदी personal tour गाईड असल्या सारखी. ताडोबाचे जंगल चंद्रपूर जिल्हया मध्ये स्थित आहे.  एकूण ६२५.४ स्क्वेअर किलोमीटर वर पसरलेले जंगल ताडोबा आणि अंधारी अशा दोन अभयारण्याना समाविष्ट करते. १९९५च्या सुमारास अंधारी अभयारण्य  ताडोबास जोडले गेले. एकूण अरण्याचा काही भाग प्रोटेक्टेड फॉरेस्ट एरिया मध्ये येतो या भागात पर्यटकांना परवानगी  नाही.

साडे तीन तासांचे नागपूर ते ताडोबा अंतर कापत ११.३० च्या सुमारास हॉटेल वर पोहोचलो. वाटेत कापसाच्या शेतातले पांढऱ्या शुभ्र कापसाची बोंडे डोलत होती. दुतर्फा ज्वारी, कापूस आणि तुरीची मोठी मोठी शेते बघून   विदर्भाबद्दल असलेला गैरसमज थोड्या फार प्रमाणात दूर झाला.  सालई नावाच्या एका छोट्याशा homely resort मध्ये आमची रवानगी झाली. जेवून  पहिल्या सफारीला निघायचे वेध लागलेले.

पहिली सफारी कोअर झोन मध्ये होती. ट्रीप  बुक करतानाच दोन कोअर सफारीआणि दोन बफर सफारी असे पक्के करूनच आलो होतो.  मागल्या वेळेस बफर मध्ये कोणी न दिसल्याने बफर झोन नको असे वाटत होते.  कोअर म्हणजे मुख्य घनदाट जंगल असा लोकां प्रमाणेच माझा ही समज होता.... इथे आल्या वर मात्र खरे काय ते समजले.  पर्यटनाच्या सोयीसाठी कोअर आणि बफर असे झोन केले गेले त्याचा घनदाट असण्याशी काडीमात्र संबंध नाही. बफर हे कोअरच्या भवती पसरले आहे.  कोअरचे जंगल विरळ ताडोबा तलावा भवती पसरले आहे तर बफर चे जंगल हे अगदी खऱ्याखुर्या अर्थानेआपल्या कल्पनेतील जंगलासारखे आहे. 

सफारीला सुरुवात झाली. एका मागोमाग एक gypsy धडाधड मोहरली गेट मधून आत शिरल्या... काही तेलिया तलावाच्या दिशेने तर काही ताडोबा तलावाच्या दिशेने. प्रत्येक gypsy मध्ये एक गाईड आणि एक ड्रायव्हर. ड्रायव्हरचे कौशल्य नक्कीच वाखणाण्या जोगे. छोट्या  खडबडीत पायवाटेवरून जिप्सी चालवायची , कधी मागे फिरवायची आणि मुख्य म्हणजे एकाला एक चिकटवून गाड्या उभ्या करण्या मध्ये आणि नंतर क्षणा मध्ये पुन्हा वेगळे  होण्यात हे भलतेच हुशार.  असे हुशार ड्रायव्हर्स मुंबई मध्ये मिळाले तर ट्रॅफिक ची समस्या बरीच कमी होईल. 

कोअर झोन चे मुख्य आकर्षण म्हणजे माया मॅडम. ताडोबा मधील सगळ्यात बोल्ड tigress  माया. किती ही पर्यटक असले तरीही ना भिता रस्ता अडवून बसण्याची हीची ख्याती.  तिच्या शिवाय कोअर मध्ये छोटी तारा  आणि बजरंग या कोअर मधील page 3 personalities.  म्हटले बघू आज नशिबात कोण कोण आहेत.  छोटी तारा ने काल रात्री शिकार करून ठेवल्याचे समजले..आज ती पिल्लांना घेऊन शिकारी जवळ नक्की येईल असे अंदाज बांधले गेले.. सगळ्या गाड्या  दूर थांबून आता येईल बया नंतर येईल बया अशी वाट बघून कंटाळून अखेरीस निघाल्या.  सभोवती उंच  गवत असल्याने ती आली तरी दिसण्याचे chances फारच कमी होते. जिथे शिकार केली होती तिथेच काही अंतरावर  अर्जुनाच्या झाडा खाली एक सांबर निश्चल  उभे होते... कोणी म्हणाले सकाळ पासून हे तिथे च आहे. आमच्या गाईडने सांगितले की शिकार झालेले सावज त्याचा जोडीदार असणार... त्यामुळे तो इतक्या लवकर तिथून निघणार नाही...  मुक्या प्राण्यांमध्ये ही इतक्या भावना असतात बघून गलबलून आले. 

आजूबाजूला बरीच हरणे ((spotted dears) चरत होती, खेळत होती कोणीच काही संकेत देत नव्हते. त्यामुळे ताराबाई येतील ही आशा मावळली. ताराबाईंनी दर्शन नाही दिले तरी सांबर ,हरणे  मुंगूस, लांडोर असे बरेच प्राणी पक्षी स्वच्छंद पणे बागडताना दिसले.  भारद्वाज पक्षाची सुंदर जोडी फोटो साठी पोझेस देऊन गेली. खरतर  भारद्वाज पक्षी आजकाल शहरात ही दिसतात... आमच्या घरा समोरच्या बदामाच्या झाडावर नेहमीच येतात... पण जंगलामधील  पक्षांचे रंगरूप आणि सौंदर्य काही वेगळेच... गर्द निळ्या रंगावर तांबूस सोनेरी पंख... काय डौल त्या भारद्वाजाचा.

तारा न आल्याने आम्ही तिथून निघालो मायाच्या एरिया मध्ये.... वाटेत एक बिबळ्या मस्त पैकी झाडावर आपली शिकार टांगून  त्या शेजारीच लटकला होता... म्हणजे शांतपणे फांदीवरच त्याने ताणून दिली होती...

आपल्या सारख्याला तो दिसला ही नसता. पण ड्रायव्हर गाईड या लोकांची नजर इतकी बसलेली असते की अगदी छोट्यात छोटा प्राणी ही त्यांच्या नजरेतून सुटत नाही. झाडांच्या रंगात हे प्राणी इतके मिसळून जातात की फांद्या पाने कुठली आणि जनावर कोणते हे शोधण्यास ही आपल्याला प्रयास पडतात. 

काही अंतरावर छोट्याशा पायवाटेवर अनेक जीप थांबल्या होत्या... बाजूला झाडीमध्ये माया बाई आल्या होत्या.... कुठे आहे कुठे आहे शोधे पर्यंत गुरगुराट सुरू झाला बहुदा कोणी रानगवा आला असावा...इतक्या जवळून गुरगुर ऐकण्याची पहिलीच वेळ... नाही म्हटले तरी थोडी धडधड सुरू झाली... ड्रायव्हर ने जीप पुढे घेत दुसऱ्या दिशेला घेतली... ती आतल्या बाजूने नीट दिसावी म्हणून... मनात म्हटले अरे देवा ही बया रागात दिसतेय आणि हा कुठे तिच्या जवळ चालला आहे. एक दोन मिनिटं गुरगुर जास्तच वाढली...आणि मग पुन्हा शांत.  गव्याला पळवून लावून माया मेमसाब पहुडल्या.

झाडी तितकीशी दाट नसली तरी आतला प्राणी बघणे म्हणजे डोळ्यांची परीक्षा... मॅडम पोट वर करून पडल्या होत्या त्यामुळे थोड्या झाडांमधून त्यांचे पांढुरके पोट नीट दिसत होते.... थोडा वेळ सगळेच थांबले पण पोज बदलण्याची चिन्हे दिसेनात. पोटावर समाधान मानत आम्ही तिथून निघालो.  पुन्हा छोटी तारा शोधण्याचा प्रयत्न केला पण ती काही आली नाही.  वेळ संपत चालली होती जवळ जवळ 4 तासांची एक सफारी पण असे वाटते की ही मजा संपूच नये. परतीच्या प्रवासाला लागलो. हवेत गारवा जाणवू लागला... कधी एक छोटीशी डुलकी झाली समजले च नाही. सुर्य ही परतीच्या प्रवास ल लागलेला... एका जागी थोडे थांबून इराई Dam च्य बॅकवॉटर वर सूर्यास्त दर्शन घेतले.... लाल लाल गोळा हळू हळू पाण्या मध्ये बुडला... आणि आम्ही रिसॉर्ट वर परतलो. गरमा गरम चहा आणि भजी आमची वाटच पाहत होते.

सालई रिसॉर्ट इनमीन 4 ते 5 रूमचे. सगळ्या खोल्या स्वच्छ , उत्तम पलंग आणि गाद्या, एसी, बाथरूम ही नीट नेटके. बाहेर छोटीशी बाग... फारसे पॉश नाहीं की commercial नाही. पुराणिक पती पत्नी यांनी चालवलेले. पतीदेव एकदम बडबडे bussinessman तर वहिनी सुंदर सुगरण. स्टाफ त्यांच्या हाता खाली well trained.  जेवण घरगुती पण अप्रतिम. पोटोबा खुश असला की आपोआपच ट्रिपची रंगत वाढते. सकाळ संध्याकाळ स्वयंपाक घरात न राबता सुग्रास घरगुती जेवण मिळणे याला भाग्यच लागते. या बाबत आमचा Tour operator शशी याला धन्यवाद. अगदी मितभाषी पण  जंगलाचा उत्तम जाणकार , professional wild life photografer.

मोजकेच बोलण्याची सवय असल्याने(त्याला) मी मात्र ट्रीप सुरू होईपर्यंत साशंक होते की हा ट्रीप बरोबर करतोय की नाही... पण सुरवाती पासून शेवट पर्यंत त्याने खरंच उत्तम बडदास्त ठेवली. ताडोबा मध्ये त्याला ओळखत नाहीत असे कोणी मिळणे मुश्किल दिसत होते... वाघ, हरणे यांना बोलता येत नाही..नाहीतर त्यांनी ही त्याला इतर लोकं प्रमाणे " काय शशी भाऊ बरेच दिवसांनी आलात" असे विचारले असते तर नवल नव्हते. 

दुसऱ्या दिवशी. सकाळी लवकरच निघायचे होते सफारीला. सकाळच्या मस्त थंडी मध्ये स्वेटर स्कार्फ यात गुंडाळून आम्ही तयार होतो. आज ही कोअर ची दुसरी सफारी होती. तेच मोहरली गेट. कोअर साठी तीन गेट वेगवेगळ्या भागात आहेत मोहरली, नवेगाव आणि जूनोना पण फिरण्याचा भाग सर्वासाठी तोच आहे. फरक इतकाच की कुणाला एखादा भाग जवळ किंवा लांब पडतो.  आम्ही प्रथम तेलिया भागात शिरलो.  काही वर्षांपूर्वी Sisters of Telia ही डॉक्युमेंट्री Discovery channel वर आली होती.   ताडोबाचा राजा

वाघदो (या वाघदोच्या ही अनेक सुरस कहाण्या आहेत.) आणि माधुरी याच्या चार छाव्या सोनम, लारा, गीता आणि आणि मोना.  यापैकी गीता आणि मोना कुठे migrate झाल्या कळले नाही. सोनम आज ही तेलिया ची राणी आहे.  लारा ही अनेक पिल्लांची आई झाली आहे... असे म्हणतात लारा प्रत्येक वेळी आपल्या लेकींसाठी एक एक भाग रिकामा करत स्वतः पुढे पुढे जात राहते. 

अर्थात सोनमला शोधण्यास आम्ही  निघालो. आमचे नशीब या बाबतीत फारच जोरदार! सोनम काही दिसेना.   अखेर तिथून आम्ही निघालो आणि अचानक पुढे जीप उभ्या दिसल्या. छोटी तारा ची पिल्ले झुडुपात झोपली होती. एक पिल्लू नीट  दिसत होते मागे दोन पिल्ले थोडीशी दिसत होती. त्यांची आई त्यांना सोडुन शॉपिंगला गेली होती. बाजूच्या जीप मधील लोकांनी "आम्ही  जूनोना गेट मधून येताना तारा आणि तिची पिल्ले चालत येताना बघितले "इत्यादी कुजबुजत सांगितले....  खरतर त्यांची असूयाच वाटली... त्यांनाच दिसले आणि आपल्याला नाही....

आज ही कोणी दिसेल की नाही असे विचार मनात येत असतानाच...समोरून एक ग्रँड एन्ट्री झाली. दमदार पावले टाकत पिवळी तुकतुकीत कांतीची छोटी तारा रस्त्यावर आली. अचानक सगळे शांत.  काही अंतर चालून तिने रस्त्या वर पथारी  पसरली. काही अती शहाणी लोक आपल्या जीप ड्रायव्हरला "आगे चलो आगे चलो" करत पुढे येऊ लागली त्या बरोबर  ती उठलीच... आणि बाजूच्या झाडीमध्ये  गेली. आता सगळ्या jeeps रस्त्यावरून तिचा पाठलाग करू लागल्या... ती कोणत्या बाजूने बाहेर येईल त्या प्रमाणे आपापल्या जीप लावून सगळे तिची वाट बघू लागले. झुडुपात होणाऱ्या हालचालींमुळे तिचा मागोवा घेणे सोपे होते. तशी ती कुठे जात आहे हे ही दिसत होते. आणि थोड्याच वेळात ती पुन्हा रस्त्यावर वर आली रस्ता ओलांडून पलीकडे मोकळ्या पठारावर जाण्यासाठी.  या वेळी ती आमच्या पासून अगदी काही फूट अंतरावर होती. काय तो दिमाख. दमदार पावले ,संथ चाल ,कुठे ही भीतीचा लवलेश नाही. २०-२५ गाड्या आजूबाजूला असून ही कसलीच फिकीर नाही. किंबहुना काय हे मूर्ख लोक आहेत अशा थाटात  ती कोणाकडे ढुंकून ही न बघता शांत चाली ने आपला रस्ता  कापत राहिली.

तिला इतक्या जवळून बघताना अंगावर रोमांच उभे राहिले. काही क्षण  मंत्रमुग्ध  व्हायला झाले. लोकांचे कॅमेरे पटापट सरसावले... त्या क्लिकक्लिकाटा कडे लक्ष्य न देता तारा बाई मोकळ्या पठारावर फिरू लागल्या. बाजूलाच हरणे निश्चिंतपणे चरत होती. कोणी ही संकेत दिले नाहीत की पळापळ झाली नाही. त्यांनाही माहीत होते की आज ही शिकारीच्या मूड मध्ये नाहीये. गाईडच्या मते नर वाघ येऊन गेला होता त्याचा सुगावा लावत ती तिथे फिरत होती. आपल्या पिल्लांचे रक्षण करण्यासाठी.  बराच वेळ झाला.  पुन्हा आम्ही पिल्लां जवळ आलो. ती पिल्ले कसली ( दिसायला चांगलीच मोठी होती. ) वाघीण दोन वर्षं पर्यंत आपल्या पिलांना सांभाळते. दोन वर्षात पिल्ले अंगापिंडाने चांगलीच मोठी होतात पण त्यांची अक्कल मात्र लहान मुला सारखी असते. नंतर ती स्वतंत्र झाली की आई पासून दूर जातात.

ताराची पिल्ले मात्र आज्ञाधारक होती... आई बसवून आलेली त्या जागे वरून हलली सुधा नाहीत. त्यांना आईची वाट बघत बसवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.  वाटेत येताना  अचानक ड्रायव्हरने जीप थांबवली.  बाजूच्या झाडी मध्ये एक अस्वल जमीन उकरून मुंग्या खाण्यात मग्न होते. त्याने मागे वळून एक कटाक्ष आमच्या कडे टाकला आणि पुन्हा आपल्या कामा मध्ये व्यस्त झाले.  आम्ही ही पुढे निघालो. वाटेत रस्त्याच्या कडेने काही खांब लावले होते. त्यातील काही खांब २५० वर्षांपूर्वीचे होते.  जंगलात राहणाऱ्या लोकांना दिशा समजव्यात आणि रस्ता कळवा या साठी त्या खांबाचे चार कॉर्नर चार दिशांना येतील अशी ठेवणं होती.  ब्रिटिशांच्या काळात हे बनवले गेल्याचे सांगितले जाते. अलीकडच्या काळात असे अजून काही खांब सुशोभीकरणासाठी त्या रस्त्यावर बनवण्यात आले आहेत. 

दुसरी सफारी संपली होती आणि आज खरंच वाघ बघितला हे छातीठोक पणे सांगू शकत होतो. अजूनही दोन सफारी बाकी होत्या. बघू अजून काय काय खजिना बघायला मिळतोय ते!

तिसरी सफारी आज दुपारी लगेचच होती. अंघोळ नाश्ता जेवण सगळे उरकून दोन वाजता आम्ही पुन्हा सज्ज झालो.  आजची सफारी बफर झोन ची पहिली सफारी होती. पुराणिक साहेबांनी "आज ५-६ तरी दिसणारच तुम्हाला" असा आशीर्वाद आधीच दिला होता. देवाडा गेट resort पासून थोडा दूर होता पण पीक अप आणि ड्रॉपची व्यवस्था होतीच.  हाच तो देवाडा गेट... आठवणी जाग्या झाल्या... जिथे मला चिटपाखरू ही दिसले नव्हते.  पण उगाच आधीच negativity नको म्हणून आज वाघ दिसणारच असे मनाला बजावत जीप मध्ये चढलो. इथे माधुरी, कॉलारवली आणि शर्मीली यांचे राज्य. शर्मिलीला नुकतीच  पिल्ले झाल्याची गोड बातमी मिळाली होती.त्यामुळे पिलांना सोडून ती फारशी बाहेर येणार नाही अशी अटकळ बांधली गेली.  शशी भाऊंची ऑर्डर निघाली आपण माधुरीच्या आवडत्या जागी जाऊ.

बफरचे जंगल आणि कोअर चे जंगल यात फरक जाणवत होता. बफरचे जंगल खूपच दाट होते. बफरच्या जंगलं मध्ये झाडीत असलेले प्राणी दिसण्याची शक्यता फारच कमी होती.  आम्ही चिंचोळ्या वाटेने अगदी खऱ्याखुऱ्या जंगलामध्ये शिरलो जिथे फक्त माहिती असलेले एक दोन drivers पर्यटकांना घेऊन आलेले. त्या मधले आम्ही एक.  झाडाच्या फांद्या चुकवत , काटेरी झुडुपे सांभाळत आम्ही खूप दूर वर आलो.  कुठून येतोय कुठून जातोय याचा काही मागमूस नाही. कोणी इथे एकटा मागे राहिला तर परत येईल याची शाश्वती नाही.

त्या जंगलाची नशाच वेगळी होती. भटकून ही नेहमी प्रमाणे माधुरी बाई काही सापडल्या नाहीत. परत वळलो. येताना तसा वेळ लागत होता.... अचानक पुढे गाड्यांचा ताफा उभा. समोरच  एका छोट्याशा पाणावठ्या मागे कॉलरवाली दिमाखात बसली होती. लोक फोटो काढण्यात मग्न आणि ही देखील लोकांना पोझ देण्यात बिझी.  आम्ही तसे उशिराच पोचलो होतो पण जणू काही ती आमचीच वाट बघत होती. ५-१० मिनिटांनी ती उठली आणि पाणावठ्यावर येऊन वाकून पाणी पिऊ लागली... अगदी फोटो मध्ये असते तशीच पोझ... पुढचे पाय दुमडून लालक लपक पाणी पिऊ लागली... सकाळच्या तारा पेक्षा हीचा देह आकाराने प्रचंड होता म्हणायला हरकत नाही. पाणी पिऊन झाल्यावर पुन्हा थोडा वेळ विश्रांती घेत ती लोकांना न्याहाळत पहुडली. तिचे ते भेदक  डोळे.... जवळ आली असती तर नक्कीच पळता भुई थोडी झाली असती. पुन्हा पर्यटकांचा उतावळेपणा नडला कोणी तरी दिसत नाही नीट म्हणून पुढे येण्यास jeep सुरू केली आणि मॅडमचे त्या आवाजाने बिनसले. उठून तरातरा बाजूच्या झाडीत लुप्त झाली. पण तिचे कौतुक असे की तिने सगळ्या लोकांना आपले नीट दर्शन होईल अशा जागा बदलल्या ५-५ मिनिटे का होईना सगळ्यांना आपण नीट दिसू याची काळजी घेतली.  आणि मग ते अजस्त्र धुड तोऱ्यात निघून गेले.  ताडोबा मध्ये पर्यटकांच्या बेशिस्त वागण्या मुळे मोबाईल्स Ban केले आहेत. वाघाबरोबर selfie काढण्यासाठी लोकांची चुरस सुरू असायची.. त्यात त्या लांब लांब selfie sticks  मुळे प्राणी बिथरू लागले आणि प्रशासनाने मोबाईल ban करण्याचा निर्णय घेतला.  एका अर्थी हातात मोबाईल नव्हता हे उत्तम च झाले... फोटो काढण्या पेक्षा  डोळे भरून दृश्य बघता आले. 

आता आम्ही घनदाट जंगले सोडून थोडे  बॅकवॉटर कडे जायचे असे ठरले. जाण्यासाठी  एक डांबरी रस्ता ओलांडत असतानाच...  समोरून एक अजस्त्र काळेकुट्ट धुड धावत जीप. समोरून गेले.... अगदी २ सेकंद ही उशीर झाला असता तर नक्कीच त्या १००० किलोच्या धुडाने आमच्या सकट जिप उडवली असती. हेच ताडोबा मधले famous रानगवे. काळेकुट्ट ! डोक्यावर एक पांढऱ्या केसांचा सुपका. दिसायला रेड्या सारखेच फक्त आखूड शिंग.  वजन १००० ते १५००० किलो. रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला पोहोचल्यावर काही घडलेच नाही असा आमच्या कडे बघत ठोंब्या उभा!

इराई बॅकवॉटर ही bird lovers  साठी मेजवानीच. गेल्या गेल्याच वाटेत असंख्य मोर लांडोर... पलिकडच्या  तीरावर मोर पिसारा फुलवून नाचत होता... दूर होता तरी त्याच्या आनंदाचा अंजदाज बांधता येत होता. त्याला बघे पर्यंत आमच्या जवळच एक मोर दोन लांडोरीना बघून थुई थुई नाचू लागला. समोरच एक मगर तलावात छान पहुडली होती... त्यातली मगर कोणती आणि तलावातील दगड कोणता हे समजू नये इतकी ती निश्चल होती. इथे पक्षी म्हणावेत तर असंख्य ! वेगवेगळे रंग आकार आणि त्यांची ही भली मोठी नवे. काही लक्षात राहिलेली सोपी साधी नावं ग्रे हेरोन, purple heron , टिटवी, कोतवाल , इनडियन रोलर...इत्यादी. यातला कोतवाल पक्षी छोटासा काळाकभिन्न तर इंडियन रोलर सप्तरंगी... इंडियन रोलर कर्नाटक राज्याचा राज्यपक्षी आहे.

या पक्षांना बघता बघता कसा वेळ गेला कळलं च नाही. जवळ च एक रान डुकराची जोडी (wild boar.... pumba)  जमीन उकरताना दिसली.  परतीच्या वाटवर  असंख्य  हरणे होती. कळपा मध्ये शिंग असलेले नर उठून दिसत होते.  चकचाकित सोनेरी कांती वर सुंदर ठिपके, बोलके डोळे, नो डाऊट सीतेला त्याने भुरळ पाडली.  पुढे जाताच रानगवे कळपाने फिरत होते. त्यांच्या मागोमाग पायापायात बगळे उड्या मारत होते. कोणी रानगव्याच्या पाठीवर स्वार होते. रानगवा चालतो तेव्हा वजना मुळे त्याचे पाय चिखलात रुततात आणि त्या पायावर चढणारे किडे हे बगळे चोचीने अलगद टिपून घेतात. असे या दोघांचे सहजीवन. अचानक काय झाले माहीत नाही पण दोन रानगव्यांची जुंपली आणि शिगात शिंगे घालून डोक्याला  डोकी लावून त्यांची कुस्तीच सुरू झाली... बराच वेळ रेटारेटी सुरू होती... निकाल काही लागेना... त्यात हे बगळे पण त्यांच्या पायपायात पुढे मागे... अगदी कुस्तीच्या रेफ्री सारखे नाचत होते.  मला तर शंका वाटते बगळेच भांडणे लावून देत असावेत.  त्यांना भांडत सोडून पुढे निघालो. पायवाटेच्या बाजूच्या झुडुपात अजून दोन नर रानगवे एकमेकांना खुन्नस देत उभे होते. त्यातला एक धावत येऊन रस्त्याच्या कडेला उभा राहिला. फोटोसाठी कॅमेरे सरसावले पण त्याला काही फारसे ते रुचले नाही रस्त्याच्या मधोमध येऊन तो उभा राहिला आणि एकाएकी डोके खाली घालून एक पाय किंचित दुमडून attacking पोझ  मध्ये आला.  त्याला असे बघताच सगळ्यांची भंबेरी उडाली. पुढल्या जीप मध्ये स्टाईल मध्ये फोटो काढणारे गुपचूप खाली जागेवर बसले. बॅक बॅकचा हाकारा करत सगळ्या जीप जमेल तसे u turn मारत सुसाट निघाल्या. तो मागे धावला नाही हे नशीबच सर्वांचे. 

बॅक वॉटर ला सूर्यास्त बघणे  ही एक आगळीवेगळी मेजवानीच. पक्षांचा किलबिलाट, एखादे बोडके झाड , त्यावर बसलेले पक्षी आणि मागे मावळत्या सूर्याचा backdrop.... अगदी चित्रासारखेच. आजची सफारी खऱ्या अर्थाने परिपूर्ण होती. वाघ दिसल्याचे समाधान आणि इतर कितीतरी प्राणी पक्षी बघण्याचा आनंद दोन्ही घेऊन आम्ही रिसोर्टवर परतलो. उद्या शेवटचा दिवस आणि शेवटची सफारी.

रिसॉर्ट वर येऊन खमंग भेळ आणि चहाचा आस्वाद घेतला. रात्री जेवण झाल्या वर एक फेरफटका मारण्यास बाहेर पडलो. बाहेर किट्ट काळोख आणि वर ताऱ्यानी गच्च भरलेले आकाश. असे दृश्य शहरात सापडणे कठीणच.

सकाळी लवकरच उठून तयार होऊन जीपची वाट बघत बसलो. आज कालच्या परीस थंडी बरीच कमी होती. आज अगरझरी गेट मधून दुसरी बफर सफारी होती. आज कोण दिसणार? कालच्या सारखेच बफरचे घनदाट जंगल. लाल मातीचा धुरळा उडवत जीप वाघोबा शोधू लागल्या. पण आज अगर्झरीला आलेल्या सर्वांच्याच पदरी निराशा पडली. म्हटले वाघ नाही तर नाही बाकीच्या जंगलाचा तरी आनंद घेऊ.  सुरुवातीलाच मोठी मोठी सांबर अगदी जवळच उभी असलेली दिसली, त्या नंतर काळ्या तोंडचे पांढऱ्या केसांचे लांगुर, ठिपक्यांची हरणे असे छोटे मोठे प्राणी मधून मधून दर्शन देतच होते.  पहिल्याच दिवशी गाइडने सांगितलेले आठवले... हरणे इतकी दिसतील की नको असतील तरी ही ती समोर येतच राहतील.  Serpent Eagle, Grey Eagle, घुबड , रंगीबेरंगी पोपट असे निरनिराळे पक्षी बघत आजची सफारी पुढे चालली होती.

बफरच्या काही भागात अजून ही छोट्या छोट्या वस्त्या आहेत. कोअर मध्ये असलेली सगळी गावे दुसरीकडे विस्थापित केली गेली आहेत. त्यामुळे बफर मध्ये काही भागात एका बाजूला शेती तर दुसऱ्या बाजूस जंगल असे दृश्य ही दिसते.

ताडोबा अंधारी रिझर्व्ह मध्ये बांबूची झाडे मोठ्या संख्येने आहेत. बांबूचे आयुष्यमान साधारण ३५ ते ४० वर्षे असते. शेवटच्या वर्षात बांबूला बहर येतो. असे फुले आलेले बांबू प्रथमच पाहायला मिळाले. त्यानंतर ते झाड मरते.   टिक, सालई, तेंदू, महू, डिंक ही इथे दिसणारी प्रमुख झाडे. आमच्या रिसॉर्टचे नाव सालई हे देखील याच झाडा वरून ठेवले होते.   तेंदुची पाने गोळा करणे, महुचा रस जमवणे यासारखे छोटे उद्योग जवळपास राहणारे गावकरी करत. महू पासून बनवलेली दारू या भागात लोकप्रिय आहेच पण आता येथील महिला महू पासून लाडूही बनवून विकू लागल्या आहेत.  पूर्वी येथील झाडे कापून चंद्रपूर मधील बल्लारशाह पेपर मिलला पुरविण्याचे काम गावकरी करत. अभयारण्य झाल्यापासून या वृक्षतोडीवर बंदी घालण्यात आली आहे. ताडोबा मध्ये दिसलेली दोन वेगळी झाडे म्हणजे ऐन किंवा crocodile bark tree याची साल अगदी मगरीच्या स्किन सारखी असते तर दुसरे झाड भुत्या किंवा Ghost tree. पांढऱ्या शुभ्र चकचकीत खोडाची ही झाडे इतर सगळ्या झाडांमध्ये उठून दिसतात. कदाचित रात्री ती भुता सारखी दिसत असावीत म्हणून असे नाव पडले असावे.  बहुतेक झाडाखाली ही मोठाली मुंग्यांची वारुळे आणि फांद्यात मोठी मोठी कोळ्यांची जाळी. जंगलाची परिपूर्ण ecosystem अभ्यासात वाचली होती आज डोळ्यांनी बघत होतो.

फेब्रुवारी मार्चच्या सुमारास पडलेली पाने जाळण्याची पद्धत आहे. उन्हाळ्यात उष्णता मुळे पाने पेटून वणवा लागण्याची शक्यता असते या साठी ही खबरदारी.

जंगलात सगळीकडे फायरलाइन्स आहेत. म्हणजे एका बाजूला लागलेला वणवा दुसऱ्या बाजूला पसरू नये म्हणून मध्ये मोकळ्या ठेवलेल्या जागा. ही खबरदारी ब्रिटिशांच्या काळा पासून घेतलेली आहे. गोऱ्या साहेबांनी त्या काळी केलेले जंगलाचे मोजमापनआणि आताच्या काळात GPS द्वारे  केलेली मोजणी ही तंतोतंत  मिळते.

पर्यटन आल्यामुळे गावकऱ्यांशी उपजीविकेचे साधन मिळाले आहे. गाईड, drivers  ही कामे आजूबाजूच्या गावातील मुलेच करतात. शिवाय तिथलेच असल्याने जंगलाबद्दल एक प्रेम आणि आपुलकी ही त्यांच्या वागण्यात दिसून येते.

शेवटची सफारी संपली. वाघ दिसणे न दिसणे हा खरतर नशिबाचा भाग म्हणावा लागेल. प्रत्येक सफारी मध्ये आम्ही ज्याला शोधत होतो ते न दिसताच दुसरेच कोणी समोर दत्त म्हणून उभे राहत होते. पण प्राणी शोधण्याची मजा ही काही ओरच आहे.  भले वाघोबा दिसले नाहीत पण इतर माहिती घेत घेत ही सफारी ही छान च झाली.

दुपारी नागपूर साठी रवाना व्हायचे होते. सारखे वाटत होते की अजून दोन तीन सफारी घ्यायला हव्या होत्या. online booking सुरू झाल्या पासून आयत्या वेळी तिकीट मिळणे मुष्कील झाले आहे. तसेच सध्या इतर अभयारण्या पेक्षा ताडोबाला वाघोबांचे दर्शन जास्त होत असल्याने  tourism प्रचंड वाढले आहे. १५ एप्रिल पर्यंत सर्व सफारी भरल्या आहेत असे कळले.

अखेर पुढल्या वेळी नक्की  यायचे आणि जास्त वेळ काढून त्याचे असे मनाशी पक्के करत ताडोबाला रामराम करत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

डॉ. पल्लवी गुप्ते