मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर साहित्य क्षेत्राच्या दृष्टीने प्रसिद्ध तालुका म्हणून ओळखला जातो. तसेच तालुक्याला १६ व्या शतकापासून साहित्य परंपरा लाभलेली आहे. संत तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहीनाबाई पाठक यांनी १६ व्या शतकात काव्यरूपाने साहित्याचे रोपटे लावले. त्यानतंर पत्रकार अनंत भालेराव, रा.रं. बोराडे, भास्कर चंदनशिव, डाॅ. भीमराव वाघचौरे, ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, उत्तम बावस्कर, ना. वि. पटारे यांच्यासह नवोदित साहित्यिक अशोक गायकवाड, कावेरी गायके, सोनाली रसाळ यांनी देखील तालुक्यात साहित्य चळवळीचा वारसा पुढे चालू ठेवला. सध्या तालुक्यात अनेक नवोदित लेखक व कवी लिहिते झालेले आहे. त्या नवोदित लेखकांमध्ये कवींमध्ये वैजापूर तालुक्यातील सिरसगाव या छोट्याशा खेडेगावातील कु. स्नेहल लक्ष्मण जगताप ही विद्यार्थीनी देखील छानपैकी विविध विषयांवर कविता, लेख, कथा लिहू लागली आहे. तीचे ओढ शेतीकडे असल्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख नेहमीच तिच्या लेखणीतून जाणवते.
विशेष म्हणजे तिचे शेतीविषयी असलेले प्रेम, शेतकऱ्यांचे दुःख, वेदना बघून खरच बरं वाटलं. शेतकऱ्यांच्या मुली लिहू लागल्या. वेदना मांडू लागल्या हे खरच विशेष आहे. मला तर आपल्या तालुक्यातील एक मुलगी लिहिती झाली याचा खुप आनंद वाटला.
ग्रामीण भागाविषयी ओढ असणारी स्नेहल ग्रामीण भागातील अनेक ज्वलंत प्रश्न ती डोळ्याने पाहत असते. आणि अधूनमधून सोशल मिडीयाच्या माध्यमातून ती त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे देखील काम करत असते. पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, त्यात वाया गेलेला मुग, कापूस, बाजरी, सोयाबीन याविषयी ती नेहमीच हळहळ व्यक्त करत असते. आणि लेखणीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न देखील करत असते. स्नेहल जगताप या त्यांच्या 'सांग ना रे देवा' या कवितेत लिहितात,
का? रे देवा
शेतकऱ्याने काय गुन्हा केला
सगळा भोग
त्याच्याच का नशिबी आला
पीक तोंडाशी आलं होतं
जणू तोंडात घालायचा होता घास
घेतलं रे हिसकावून
जणू काही गेला त्याचा श्वास
कर्ज उभं आहे डोक्यावर
फेडायला उठलाय कहर
काय उपाय आहे त्याच्याकडे
खाण्याशिवाय जहर
असं कसं देवा
तू हे काय केलं
शेतकऱ्याचं पीक
का बरं वाहून नेलं ?
शेतकरी मेला
तो पटणार सुद्धा नाही
कारण....
दुष्काळ आहे ओला
स्नेहल जगताप यांची वरील कविता वाचल्यानंतर शेतकऱ्यांचे दुःख वेदना प्रकर्षाने जाणवतात. हाता तोंडाशी आलेला घास जेव्हा निसर्ग हिराहून नेतो तेव्हा त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच नसतो. एका लेखकाने म्हटलेले आहे. सर्व सत्तेच्या बाजूने असतात. शेतकऱ्याच्या बाजूने कोणीच नसतो. शेतकऱ्याच्या बाजूने असतो तो फक्त साहित्यिकच असतो, हे स्नेहल जगताप यांच्या लेखणीने सिध्द केले आहे.
बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर