जागर स्त्रीशक्तीचा

स्त्री वाचून एखाद्या घराची कल्पना करून बघा जर घरात स्त्री नसेल तर घराची अवस्था काय होते,

जागर स्त्रीशक्तीचा

"नवनिर्मिती अधिकार
आहे केवळ स्त्रीशक्तीचा
ओळख व्हावी तुझी तुला
म्हणुनी जागर हा नवरात्रीचा"

स्त्री वाचून एखाद्या घराची कल्पना करून बघा जर घरात स्त्री नसेल तर घराची अवस्था काय होते, स्त्री वाचून सुंदर घराची कल्पना देखील केली जात नाही. अंगणातल्या रांगोळी पासून तर घरातील सुई धाग्यावर जिचे लक्ष असते ती स्त्री स्वतः साठी वेळ देऊ शकत. नाही कारण तिचा वेळ हा फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासाठी असतो. लग्नाअगोदर  स्वच्छंद  मुक्त अशी स्त्री आपला संसार आणि कर्तव्य चक्रात इतकी गुरफटून जाते की, तीला आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत, आपले देखील एक अस्तित्व आहे आपल्याला देखील आनंदी राहण्याचा अधिकार आहे या सगळ्या गोष्टी ती विसरून जाते.दिवस-रात्र फक्त आणि फक्त कुटुंबासाठी जगणारी स्त्री स्वतःसाठी जो वेळ तिला द्यायला हवा तो ती देऊ शकत नाही.संसाराचा गाडा ओढण्याची जबाबदारी स्त्री पुरुष दोघांची असून देखील जोपर्यंत घरातली संपूर्ण जबाबदारी स्त्री सांभाळत नाही,तोपर्यंत घर पूर्णपणे विस्कटलेले असते. घराबाहेरील सर्व कामे करू शकणारा पुरुष  स्त्रीप्रमाणे घर सांभाळू शकत नाही. सहन करण्याची शक्ती, घरातील प्रत्येकाचे मन जाणून घेण्याची शक्ती, सगळ्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे स्वयंपाक करण्याची शक्ती, घरात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचे मने सांभाळण्याची शक्ती, घरातील लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांची सेवा करण्याची शक्ती, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती साठी काय योग्य आणि काय अयोग्य ती परखण्याची शक्ती असलेल्या स्त्री शक्तीलाच तिच्या स्वतःच्याच घरात तो सन्मान प्राप्त होत नाही ज्याची ती खरी हकदार असते.


घरातील स्त्री म्हटली तर कुटुंबातील लोकांसाठी अनेक वेळा महत्त्वाची व्यक्ती नसते. ज्या एका व्यक्तीच्या असण्याने घराला घरपण आहे अशा घर सांभाळणार्‍या स्त्रियांना समाजातील व्यक्तीच काय पण कुटुंबातील व्यक्ती देखील घराबाहेर काम करणाऱ्या स्त्रियांपेक्षा कमी लेखतात. तिला हवा तो मान सगळ्यांकडून मिळत नाही आणि यामुळे हळूहळू कोठे ना कोठे सर्व शक्तीने परिपूर्ण असलेल्या नारी शक्तीचा आत्मविश्वास नकळतपणे खचला जातो. तो विश्वास टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक स्त्रीने स्वतः खंबीर होण्याची आज गरज आहे. प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ततेसाठी नाहीतर आपल्या स्वतःच्या आनंदासाठी स्वतः मध्ये असलेल्या क्षमतेची ओळख करून त्या पद्धतीने आपले करिअर प्रत्येक स्त्रीला निवडता आले पाहिजे. प्रत्येक वेळी इतरांसाठी स्वतःच्या आनंदाचा बळी देणाऱ्या आणि त्यातून मनातल्यामनात संघर्ष करत आयुष्य काढणाऱ्या अनेक स्त्रिया आजही समाजात आहे यामागे एकच कारण आहे ते म्हणजे तिच्यामध्ये असलेल्या शक्तींचा विसर होणे. प्रत्येकामध्ये असलेल्या अनंत शक्तींची जाणीव होणे म्हणजेच खऱ्या नवशक्तीची पूजा आहे. या नवरात्री मध्ये नवरात्रीच्या जागरणा बरोबर स्त्रीशक्ती मध्ये असलेल्या  नवशक्तीचे देखील जागर आपण करु शकलो तरच खऱ्या अर्थाने नवरात्री साजरी होईल.

poonam sulane bol marathi

पुनम सुलाने
हैदराबाद