आजपर्यंत समाजाच्या, घरातल्या सर्व रुढी-परंपरा बंधने पाळत महिला जीवन जगत आल्या आहेत. परंतु महिलांनी यापुढे तरी आपण आपला स्वाभिमान सांभाळूनच जीवन जगले पाहिजे. ८ मार्च महिला दिन सर्व महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस समजला जातो. एक दिवस साजरे करण्याने महिलांचा सन्मान होतो का? महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो का? महिला खरच स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगू शकतात का? सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला काही प्रमाणात तरी नाही असेच मिळतील.
एकविसाव्या शतकात कितीही प्रगती झाली. संगणक युगामध्ये जग कितीही पुढे गेले, परंतु समाजातील लोकांचा घरातील असो किंवा समाजातील महिलांच्या संदर्भात असलेल्या दृष्टिकोण अजूनही काही प्रमाणात तसाच पाहायला मिळतो. आजही मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे कारण म्हणून मुलींचा पेहराव, त्यांची राहणे, त्यांचे वागणे या गोष्टींना दोषी ठरवले जाते. परंतु आपल्या घरातील मुलगी जर कमी कपड्यात समोर आली तर आपल्या मनात तिच्याबद्दल अपवित्र विचार येतो का? तर कधीच नाही. मग प्रत्येक पुरुषाच्या मनात असलेला स्त्रीबद्दलचा विचारच जर बदलायला तयार नसेल तर त्या गोष्टीला कारण महिलांचे राहणीमान कपडे किंवा वागणे या गोष्टींना दोष देता येणारच नाही. राहतात मुली थोडं स्वच्छंद, मनासारखं कपडे घालतात परंतु कोणीतरी आपल्यासोबत वाईट वागावे हा विचार असतो का? तर अजिबात नाही. आणि प्रत्येकवेळी तिचा पोशाख हा समोरच्या पुरुषाला उद्युक्त करण्यासाठी असेलच असे नाही. तिलाही काही आशा, आकांक्षा, अपेक्षा, इच्छा असतीलच ना!
आजचा अपडेटेड संगणक समाज सर्व क्षेत्रात प्रगतीने पुढे जात आहे. आणि अजूनही स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजुनही का बदलला गेला नाही? आपल्या नजरेतच जर समोर दिसणारी स्त्री आपली आई, बहीण या नात्याने जर पाहिली तर आपण तिच्याकडे वाईट नजरेने अजिबात कधीच बघणार नाहीत. म्हणून महिला दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव न होता तो दररोज महिलांच्या जीवनात जगण्यासाठी स्वाभिमान आणि स्वावलंबी जीवनासाठी आनंद सोहळा झाला पाहिजे. यासाठी आपल्याला कोणाकडून अनुमतीची अजिबात गरज नाही. कारण समाज म्हणजे कोण? तुम्ही आम्ही अवतीभवतीचे लोक. चांगल्या गोष्टीसाठी समाजामध्ये चांगला बदल करण्यासाठी समाज त्या गोष्टीला मान्य करणार नाही. पण समाजाला दोष देतो. परंतु वाईट वागत असताना वाईट करत असताना मात्र आपण पुढाकार घेऊन त्या गोष्टीला प्रोत्साहन देत असतो. म्हणून महिलांनो स्वतःला महिलादिन हा स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि स्वाभिमान या दिवसाला एकच सण आणि उत्सव हा सारखा साजरे करून मोकळ्या होऊ नका. जागृत व्हा! स्वतःला ओळखा आणि समाजाला सुद्धा तुमच्या कर्तृत्वाबद्दल ओळखायला भाग पाडा.
असतील काही महिला वाईट परंतु त्याची शिक्षा सर्व मुली, महिलांना का? असेलही एखादी चारित्रहीन महिला किंवा मुलगी, परंतु स्वतःला सांभाळत आपला आयुष्य कष्ट जगणाऱ्या मुलीला त्रास होण्याचे कारण काय?
आज समाजात घडत असलेल्या बलात्कार, विनयभंग, अत्याचार या गोष्टींना वय आणि मर्यादा राहिलेली नाही. या सर्व गोष्टींना कारण म्हणजे आपण मुलगी असणं हा एक दोष आहे. आज या महिला दिनानिमित्त मी संपूर्ण समाजाला असा परखड प्रश्न विचारू इच्छिते, समाजातील कोणत्याही मुलीवर अत्याचार करताना तुम्ही त्या ठिकाणी आपली आई -बहीण यांना ठेवून पहा आपलं अस्तित्व हे एका आईच्या उदरातून जन्म घेऊनच निर्माण झालेलं आहे. या गोष्टीला तुम्ही विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर तुम्ही पाहिले असेल तर माॅ जिजाऊ साहेब यांनी छत्रपतींना महिलांना आदर सन्मान देण्याची शिकवण दिली. आणि आजही त्यांचा आदर सन्मानाचा आपल्याला कुठे प्रत्यय येत असेल तर आजही आपली माता-भगिनी ज्या ठिकाणी शिवरायांचा फक्त फोटो आहे. त्या ठिकाणी १००% सुरक्षित आहे असे पाहायला मिळते. म्हणून आज ज्या समाजाने तिचे रक्षण करायला हवे, तोच समाज आज तिला बाटवन्यास टपुन बसलेला आहे. आणि म्हणूनच आज आजचे पालक हे मुलीला जन्म देण्यासाठी घाबरत आहेत. कारण तिचे रक्षण जर आपण करू शकत नाही. हा मोठा प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण होत आहे आणि जर आपण आपल्या मुलीचे रक्षण करू शकत नसू तर आपल्याला तिला जन्माला घालण्याचा कोणताही अधिकार नाही. आणि मुलींचा जन्म न होऊ देणे गर्भातच त्यांना संपवणे हा यावरचा पर्याय नक्कीच नाही. स्त्री ही केवळ एक उपभोग घेण्याची वस्तू नसून ती एक नवनिर्मिती करणारी शक्ती आहेत. दुर्गा आहे, माता आहे, एक ताकत आहे. ते ओळखा केवळ महिला दिनी तिला शुभेच्छा देऊन सत्कार करून भागणार नाही. तर तिलाही तिच्या हक्कचे दररोज दैनंदिन जीवनामध्ये मान सन्मान, आदर, प्रेम, माया आणि महत्त्वाचे म्हणजे सुरक्षितता देऊन आपण आपले कर्तव्य बजावू शकतात. हीच तिच्यासाठी महिला दिनी सर्वात मोठी आपल्याकडून भेट असेल.
श्रीमती. जयश्री उत्तरेश्वर औताडे,
गंगाखेड जि. परभणी