साहित्य क्षेत्रात रमणारी डाॅक्टर : वैष्णवी मनगटे

आरोग्य क्षेत्रात डाॅ. वैष्णवी मनगटे जशा उत्कृष्ट सेवा देतात. तसेच भविष्यात साहित्य क्षेत्रात देखील त्या साहित्याच्या डाॅक्टर होतीलच...

साहित्य क्षेत्रात रमणारी डाॅक्टर : वैष्णवी मनगटे

साहित्य क्षेत्रात रमणारी डाॅक्टर : वैष्णवी मनगटे

डाॅ. वैष्णवी गणेश मनगटे हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरातील आरोग्य क्षेत्रातील महत्वाचे नाव आहे. वैष्णवी मनगटे यांच्या मुळ पिंड ग्रामीण मातीशी जोडलेला असल्यामुळे त्यांची ओढ ग्रामीण भागाकडे जास्त आहे. आरोग्य क्षेत्रात सेवा करत असतांना कविता लिहिणे हा त्यांचा आवडता छंद आहे. त्या नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर कविता लेखन करत असतात. त्यांच्या कवितेतून ग्रामीण स्त्री, स्त्री-सन्मान, ग्रामीण वास्तव, इतिहास, संस्कृती, हे विषय नेहमीच दिसून येतात.

vaishani mangate

डाॅक्टर आपल्या 'कलावंतीन' या कवितेतून लिहितात,
     

प्रेम कर कलावंतीनीसारखं
प्राक्तनाशी बहरलेलं
कुणास ठाऊक बाई
तुझ्या नशिबी काय लिहिलेलं

घे मनसोक्त जगून 
झोकून दे साऱ्या आशा अपेक्षा 
लोक काय म्हणतील विचार करू नकोस
बळ दे स्व्प्नांना जातील कुजून त्यापेक्षा

डाॅक्टर आपल्या कवितेतून समस्त स्त्रीजातीला सांगू इच्छितात, आपल्या नशिबात काय लिहिलेलं आहे; हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे कलावंत जसा अभिनय करत्यावेळी जसा आनंदी असतो, तसं आपण नेहमीच आनंदी असलं पाहिजे. मनसोक्त जगलं पाहीजे, लोकं काय म्हणतील याचा अजिबात विचार न करता नेहमीच सुखी राहिले पाहीजे. आपण आपल्या स्वप्नांना बळ दिले पाहीजे. आपण जर स्वप्नांना बळ दिले नाही, तर ते स्वप्न कुजून जायला वेळ लागणार नाही. कवयित्री डाॅ. वैष्णवी मनगटे किती सकारात्मक संदेश समस्त स्त्रीजातीला देऊ इच्छितात, हे वाचकाच्या सहज लक्षात येते. 

तसेच डाॅ. मनगटे आपल्या 'जिजामाय' या कवितेतून लिहितात,

माझी माय मले शिकवी 
भाजी, भाकर अन् निंदणं
जिजामाय राजाला शिकवी 
स्वराज्याचे कोंदणं

माझी माय मले शिकवी 
बाई पदर कसा सावरू 
जीजामाय राजाला सांगे
सांभाळ परस्त्रीची आबरू

वरील कवितेचे दोन कडवे वाचले की, प्रत्येक आई श्रेष्ठ असते, हे आपल्या लक्षात येते; तीने मुलीवर व मुलांवर योग्य संस्कार केले तर मुलं-मुली आपले नाव नक्कीच कमवतात. जसे जिजामायने छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे तोरण बांधणे शिकविले तसेच आजच्या प्रत्येक आईने आपल्या मुलीला भाजी-भाकरी आणि शेती करणे शिकविलेच पाहीजे. कारण भाजी-भाकरी व शेती हे जीवन जगण्याचे साधन आहे. तसेच आपल्या आईने आपल्या मुलाला परस्त्रीची आब्रू कशी वाचवावी हे तर नक्कीच सांगितले पाहीजे. परस्त्रीला बहीण संबोधले पाहीजे, ही शिकवण अलिकडे कुठेतरी कमी पडतेय, जिजाऊ घडली तरच शिवबा घडेल, आणि सुसंस्कृत समाज घडू शकेल. असे मला तरी वाटते. याच कवितेला जिजाऊ महोत्सवात सिदंखेड राजा येथे उत्कृष्ट कविता म्हणून पुरस्कार देखील मिळालेला आहे.

आरोग्य क्षेत्रात डाॅ. वैष्णवी मनगटे जशा उत्कृष्ट सेवा देतात. तसेच भविष्यात साहित्य क्षेत्रात देखील त्या साहित्याच्या डाॅक्टर होतीलच, असे मला मनापासून वाटते.

bol marathi baba channe

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर, जि. औरंगाबाद