शेकडो विद्यार्थी घडविणारी ज्ञानदायिनी : नीताताई भामरे

ताई जशा उत्तम शिक्षिका आहेत तशा त्या उत्तम कवयित्री देखील आहेत. उत्तमोत्तम काव्यरचना त्यांच्या हातून जन्म घेतात.

शेकडो विद्यार्थी घडविणारी ज्ञानदायिनी : नीताताई भामरे

ज्ञानाचा वारसा लाभलेले आम्ही
शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेऊ
उज्वल भावी पिढी घडवण्यासाठी
कर्तव्याशी सदैव एकनिष्ठ राहू...

वरील काव्यपंक्ती आहेत. नाशिक येथील सौ. नीताताई यशवंत भामरे यांच्या. आणि वरील ओळींना समर्पक असे ताईंचे कार्य देखील आहे. नीताताई नाशिक शहरातील पंचवटी भागात खाजगी शिकवणी वर्ग चालवतात. तसेच ताईंना अध्यापणाचा १६ वर्षाचा अनुभव आहे. ताईंनी आतापर्यंत हजारो विद्यार्थी घडविलेले आहे. मुलांच्या चेहऱ्यावरील गोड हास्य म्हणजेच ताईंचा सर्वात मोठा पुरस्कार होय. एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे यापेक्षा जगात मोठं पुण्य कोणतेच नाही. असे मी मानतो.

ताई जशा उत्तम शिक्षिका आहेत तशा त्या उत्तम कवयित्री देखील आहेत. उत्तमोत्तम काव्यरचना त्यांच्या हातून जन्म घेतात. लाॅकडाऊनच्या काळात ताईंनी जवळपास ४०० च्या वर कविता लिहिलेल्या असून ५०० च्या वर सन्मानपत्र प्राप्त झालेले आहेत. कोरोनाकाळात ताईंची पंढरीची वारी चुकली आणि एका भक्ताची आपल्या देशाविषयी काय भावना असते, ती भावना त्यांनी 'पांडुरंगा कासावीस मी तुझ्यासाठी' या कवितेतून व्यक्त केली. त्या पांडूरंगाला म्हणतात, 

निर्जीव विषाणूने केला घात
आली कोरोनाची महामारी,
कधीच नव्हती रे चुकली देवा
माझी पंढरपूरची पायीवारी...

 भक्त पुंडलिकासाठी विठू
 उभा तिष्ठत युगे अठ्ठावीस,
 भोळा वारकरी हा पांडुरंगा
 होई तुझ्यासाठी कासावीस...

हृदय मंदिरी विठुराया माझ्या
फक्त तुझ्याच भक्तीचा वास
वेध लागले आषाढी वारीचे
मनी तुझ्या दर्शनाची आस

वरील कवितेच्या काही काव्यपंक्ती वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की देव आणि भक्त यांचे नाते किती श्रेष्ठ असते. त्या नात्यात किती सख्ये असतं. आपल्या मनातील भाव आपण ज्या ठिकाणी व्यक्त करू शकतो. ते सख्ये नाते असते. आणि ते देवात आणि भक्तात असते. हे ताईंची कविता वाचल्यानंतर आपल्या लक्षात आले असेल.  

काव्य लेखनाबरोबरच चित्रकला, शिवनकाम, विणकाम हे कामे देखील त्या उत्कृष्टपणे पार पाडत असतात. तसेच विविध नामांकित वर्तमानपत्रातून आतापर्यंत ताईंचे विपुल लेखन प्रसिद्ध झालेले आहे. ही ताईंची जमेची बाजू आहे. अशाप्रकारे सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या नीताताईला माझा सलाम!

baba channe

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर, जि. औरंगाबाद