प्रत्येक शिक्षकांनी जयश्री औताडे यांचा आदर्श घेतला तर शाळांचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही

खरंच शाळेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या आणि उपस्थित परिस्थितीत वेगवेगळ्या मार्गाने स्वतःला शाळेतच रमवून घेणाऱ्या शिक्षकांची आज शाळेला खूपच गरज आहे.

प्रत्येक शिक्षकांनी जयश्री औताडे यांचा आदर्श घेतला तर शाळांचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे'।
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत'।।

निसर्गाशी व पशुपक्ष्यांशी सोयरिक जोडणारे हे संतकवी खरे पर्यावरणवादी होते. त्या काळी पर्यावरण हा शब्दही नसेल, पण निसर्गाची जाण होती. जेव्हा जेव्हा तुकाराम महाराज एकांतवासात देहूच्या डोंगरावर जात असत. तेव्हा ते त्या डोंगरावरील झाडांशी व पशुपक्ष्यांशी एवढा तादात्म्य पावत की ते वृक्षवेली पशुपक्षी हे त्यांना बंधू सखा, भगिनी, माता-पिता, सखी वाटत असत. त्यांच्याशी ते मग आपल्या मनातील सुख दु:ख व्यक्त करत. मग निसर्गाच्या सहवासात त्यांना एकांतवासात जे परमसुख मिळे ते त्यांना मोक्षाचा आनंद देत असे. त्या आनंदात पक्षीही सुरात गाऊन त्यांना साथ देत. त्यात ते इतके तल्लीन होत की सारी संसाराची दु:खे ते विसरून जात. वृक्षवल्ली हे आपलेच, कुटुंबीय आहेत. असे मानणारे तुकाराम महाराजांसारखे इतरही संतकवी आपल्याला संत साहित्यात भेटतात. संत सावता माळी तर शेतात आलेल्या फळभाज्यांना आपले दैवत मानत असत.

ईश्वर आपल्याला मनुष्यजन्म देऊन आपल्यावर काहीतरी काम सोपवत असतो. परंतु आपण ते सर्व विसरून जातो. परंतु समाजात असे काही माणसं आसतात. ते आपले कर्म कधीच विसरत नाही. त्यापैकी एक म्हणजे श्रीमती. जयश्री औताडे या होय. जयश्री औताडे या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील १६ जून २०१६ पासून जि.प.कें. कन्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम पाहतात. त्या विद्यार्थ्यीप्रिय शिक्षिका असून एक उत्तम कवयित्री देखील आहेत. तसेच त्या एक दर्जेदार स्तंभलेखिका देखील आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे "अभागिनी" हे पहिले कवितासंग्रहाचे पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे.

गंगाखेडच्या शाळेत रूजू झाल्यानंतर शाळेच्या आवारात झाडे असावेत असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी जून २०१७ ला, २५ झाडे व २०१८ ला, २० झाडे लावले. त्या झाडांचे संगोपन देखील त्या स्वतः करतात. झाडांना पाणी देणे, गवत काढणे, झाडाच्या आळ्यांना माती टाकणे, असे कामे मॅडम करतात. २०१७ मध्ये पाणीटंचाई असल्यामुळे त्यांनी स्वतः दूरवरून पाणी आणून झाडे जिवंत ठेवली. तसेच औताडे मॅडम यांनी झाडांसाठी आवश्यक असणारी काळी माती जिथे उपलब्ध होईल तिथून स्वतः आणून झाडांच्या पोषणासाठी वापरली .
आजच्या तारखेला १५ आशोकाची झाडे, ३ कडूलिंब, ३ कढीपत्ता, ७ गुलमोहर, ५ करंजी, २ चाफा, २ नारळ, २ बदाम, २ गुलाब, १ आवळा, १ शेवगा, १ वड, २ पिंपळ ,१ उंबर, तसेच ७० तुळशीची रोपे त्यांनी संपूर्ण शाळेत लावून वाढवली आहेत. आपणा सर्वांना माहीतच आहे की, तुळस आणि कडूनिंबसारखी झाडे आपणास सर्वात जास्त ऑक्सिजन देतात.

प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ ओव्याची उपयुक्त वेलीची रुजवण देखील केलेली आपणास शाळेच्या आवारात दिसून येते. पिंपळ हा वृक्ष  बोधिवृक्ष नावाने ओळखला जातो. ज्या झाडाखाली गौतम बुद्धांनी ध्यानधारणा करून ज्ञानप्राप्ती केली. असे पिंपळाचे दोन झाडे देखील मॅडमनी शाळेत लावून संगोपन केले आहे. शेवग्याच्या शेंगांचे एक आणि कडीपत्त्याचे तीन झाडे शाळेत दुपारचा मुलांना दिला जाणारा पोषण आहाराचा विचार करून लावली आहेत, जेणेकरून त्या झाडांचा उपयोग केला जावा. प्रत्येक झाडांच्या बुंध्याजवळ लावलेला ओवा आणि पुदिना मुलांसाठी सर्वांसाठी आरोग्यदायकच ठरणार आहे. तसेच मॅडमला कोरोना काळात वृक्षारोपणाचा छंद जोपासण्यास वेळ मिळाला. सुट्टीच्या दिवशी त्या शाळेत पाणी देण्यास जातात. हे विशेष आहे. तसेच शाळेत कार्यक्रमप्रसंगी पुष्पमाळा व पुष्पगुच्छ पण शाळेतच बनवला जातो. तसेच त्यांनी पावसाळ्यात झेंडूची बाग देखील लावली. आणि त्याला छान फुलं देखील आलेली होती.

एकूणच शाळेत लावलेली सर्वच झाडे शाळेचे सौंदर्य तर वाढवतातच आणखी आहार व उपयुक्ततेच्या दृष्टीनेही खूपच फायदेशीर आहेत. सावली देणारे गुलमोहर आणि करंजीची झाडे, तर अधिक ऑक्सिजन देणारी वड पिंपळ आणि तुळशीची झाडे शाळेच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करत आहेत.शाळेत साजरा केल्या जाणाऱ्या विविध महात्म्यांच्या जयंत्या असतील किंवा पुण्यतिथी किंवा एखादा कार्यक्रम, शाळेत आलेल्या मान्यवरांचे स्वागत या सर्वांसाठी लागणारे पुष्पगुच्छ शाळेच्या परिसरातील उपलब्ध झाडांची पाने व फुले या सर्वांचा उपयोग करून शाळेतच तयार केले जातात ज्या मधून झाडांची उपयुक्तता तर सिद्ध होतेच पण विद्यार्थ्यांमधील नवनिर्मिती कौशल्य पहायला मिळते. स्वनिर्मिचा आनंद मुलाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसतो.

आज झाडांची उंची आठ ते दहा फुटापर्यंत वाढलेली आहे. एवढे झाडे जर आपण शाळेत बघितले तर 'ऑक्सीजन हब' ची संकल्पना अंमलात आणलेली आपणांस जाणवते. शाळेत जर 'ग्रीन झोन' असेल तर मुलांना पण छान वाटते. आणि शाळा पण चांगली दिसते. झाडांची संख्या वाढल्यामुळे पक्ष्यांचे येणे जाणे जास्त वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे पक्षांना पाणी पिण्यासाठी मॅडम पाण्याची व्यवस्था करणार आहे. त्यामुळे शाळा निसर्गमय दिसणार आहे. 

२०२० मध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत औताडे मॅडमनी शाळेत सुंदर झेंडूच्या झाडांची बाग तयार केली होती. ज्यामुळे शाळेत सुंदर हिरवेगार नयनरम्य सौंदय निर्माण झाले होते. आणि शाळेत जर हिरवेगार वातावरण असेल तर विद्यार्थी आणि पालकांचे आकर्षण वाढते. आणि शाळेचेही सौंदर्य खुलते. त्यामुळे देशातील प्रत्येक शिक्षकाने जयश्री औताडे यांचा जर आदर्श घेतला तर प्रत्येक शाळेत नंदनवन फुलून जिल्हा परिषदेच्या शाळेंची भरभराट होईल. कारण झाडे, फुले, फळे, पाने, वेली माणसांशी संवाद साधतात. बोलतात. त्यामुळे आपण त्यांच्याजवळ मन मोकळं करू शकतो. कारण माणूस नेहमीच माणसाला दुःख देत आला आहे. त्यापेक्षा एक मित्र म्हणून निसर्ग कधीही सरस भूमिका बजावतो.

तसेच २०२० वर्ष कोरोना कहराचे वर्ष म्हणता येईल. या कोरोना काळात विद्यार्थ्याशी शिक्षकांचा काही अंशी दुरावा निर्माण झाला. तो निर्माण झालेला दुरावा दूर करण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे शाळेचा परिसर, झाडे, निसर्गरम्य वातावरण आणि वेली ,फुले आदि. विद्यार्थ्यांमध्ये रमणाऱ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांशिवाय वेळ घालवणे ही खूप मोठी अडचणच म्हणावी लागेल म्हणूनच औताडे मॅडम यांनी या कोरोना काळामध्ये शाळेमध्ये लावलेल्या झाडांची उत्तम प्रकारे जोपासना केली सुट्टीच्या दिवशीही म्हणजेच ज्या दिवशी झाडांना पाण्याची आवश्यकता आहे त्या दिवशी मग सुट्टी असली तरीही त्या शाळेत झाडांना पाणी देण्यासाठी उपस्थित राहतात.

खरंच शाळेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या आणि उपस्थित परिस्थितीत वेगवेगळ्या मार्गाने स्वतःला शाळेतच रमवून घेणाऱ्या शिक्षकांची आज शाळेला खूपच गरज आहे. आणि अशाच विविध पुरस्कारांनी पुरस्कृत उपक्रमशील शिक्षिका श्रीमती. जयश्री उत्तरेश्वर औताडे यांना त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा. मॅडम आपण उत्तरोत्तर अशीच एक शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रात आणि समाजकार्यामध्ये प्रगती करत राहो. आणि शिक्षण क्षेत्रातील  सर्वच व्यक्तीसमोर आदर्श निर्माण करत राहो, जेणेकरून जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती बदलून त्या अधिकाधिक समृद्ध होतील हीच सदिच्छा.......

Baba Channe

बाबा चन्ने, 
धोंदलगाव, वैजापूर
९६६५६३६३०३.