कोमल मनाची कोमल

कुठलिही ट्रेनिंग नसतांना कोमल उत्कृष्ट अशी प्रमाणपत्र डिझाईन करते. तसेच कोमल काव्यलेखन, स्तंभलेखन व कथालेखन अप्रतिम असे करते. त्यामुळे कोमलविषयी माझ्या मनात नेहमीच जिव्हाळ्याचे भाव आहे.

कोमल मनाची कोमल

कोणी आपला नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला तर नर्वस होऊ नका. आपले काम इतके प्रामाणिकपणे करा की, एक दिवस असा येईल, आपल्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकणारेच आपल्याला गुगलवर शोधतील, सर्व न्याय हा परमेश्वर करत असतो. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हे वाक्य आहे. बार्शी तालुक्यातील मुंगशी या छोट्याशा खेडेगावातील १५ वर्षीय कोमल अशोक डिगे यांचे, कोमलचा जन्म हा मोलमजूरी करणाऱ्या कुटूंबात झालेला असला तरी तीचे संस्कार खुप उच्चकोटीचे आहेत. एव्हढ्या कमी वयात एवढा समजदारपणा आला कुठून, ही कोमलसारख्या छोट्या मुलीचे गुण विशेषच म्हणावे लागेल.

कुठलिही ट्रेनिंग नसतांना कोमल उत्कृष्ट अशी प्रमाणपत्र डिझाईन करते. तसेच कोमल काव्यलेखन, स्तंभलेखन व कथालेखन अप्रतिम असे करते. त्यामुळे कोमलविषयी माझ्या मनात नेहमीच जिव्हाळ्याचे भाव आहे. मी कावेरीला जशी माझी मुलगी मानतो, तसेच कोमलही माझी मुलगीच. कोमल ही तोंडावर बोलणारी कडक स्वभावाची मुलगी असून ती कोणाचीच कुठलीच भीडभाड ठेवत नाही. एक मुलगी जशी बापासोबत बोलते ना अशीच कोमल माझ्याशी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर बोलते. कोमलचा एकदा फोन आला की, ती माझ्या कुटूंबातील  माझी मुलगी गायत्रीदेवी, संस्कारसिंह, माझी पत्नी शालिनीदेवी, व माझे आईवडील सर्वांशी मनमोकळेपणाने  बोलते. कोमल कधी माझ्या कुटूंबाची सदस्य झाली हे मला कळलेच नाही. खुप लवकर कोमलने माझ्या कुटूंबाच्या मनात घर केले.

कोमलने मला एकदा बोलता बोलता सांगितले की, बाबा... आपण काही लोकांना आध्यात्मातील खुप मोठं समजतो; पण ते किती स्वार्थी असतात, किती दांभिक असतात, किती लुटारू असतात. याचा मला अनुभव आला. काम असले की गोड बोलायचे, एक दिवस माझ्यामागे अभ्यास असल्यामुळे एका आध्यात्माच्या टेकेदाराचे मी प्रमाणपत्र बनवू शकले नाही. तर त्या माणसाने माझ्याशी बोलणे बंद केले. आणि तो माणूस मला मुलगी समजायचा आणि अभ्यास सोडून मला प्रमाणपत्र बनवायला लावायचा. मी कोमलला म्हटलं अरे... बाळा लोकं स्वार्थी असतात गं. तू फक्त तुझा  अभ्यास कर आणि मोठं हो. या बिनकामी लोकांचे प्रमाणपत्र बनविणे सोडून दे. 

कोमल जशी तडकाफडकी बोलणारी मुलगी आहे. तशीच तीचे मन खुप कोमलही आहे. एक दिवस कोमलचा फोन आला. आणि म्हटली बाबा जेवलेत का? मी तिला म्हटलं अरे.. बाळा माझे उपवास चालू आहे. त्यावर ती म्हणाली बाबा... म्हणूनच बाबा तुमचा आवाज खुप खोल गेला आणि तुम्ही आजारी पडल्यासारखे वाटतात. माझ्या आवाजाहून तीने सर्व परिस्थिती ओळखली. तसेच ती म्हणाली; बाबा... मला देवाने न मागता सर्व काही दिले, पण माझी एक ताई खुप दुःखी आहे. तिला कित्येक वर्षापासून मुलं नाही. तीला मुलं व्हावं; म्हणून मी पांडूरंगाकडे मनापासून विनवणी केली आहे. आणि तिची ओटी पांडूरंग भरेलच असा मला पूर्ण विश्वास आहे. हे कोमलचे बोलणे जेव्हा मी ऐकले, तेव्हा अक्षरशः माझे डोळे भरून आले. इतक्या कमी वयात या मुलीला दुसऱ्याचे दुःख कळाले, लोकं म्हातारे होतात, तरी त्यांना कधीच कोणाचे दुःख कळत नाही. ते फक्त स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. आणि ही इतकी छोटी मुलगी दुसऱ्याच्या सुखासाठी पांडूरंगाला साकडं घालते. खरच मी कोमलचे बोलणे ऐकले तेव्हा धन्य झालो. खरच कोमलसारख्या मुलींच्या मनात परमेश्वराचे वास्तव्य असते, असे मला मनापासून वाटते.

संत तुकाराम महाराजांनी पुढील अभंग हा कोमलसारख्या मुलीसाठी लिहिलेला आहे, असे वाटते. संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात लिहितात,

आपुलिया हिता जो असे जागता । 
धन्य माता पिता तयाचिया ।। १ ।। 
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक । 
तयाचा हरिख वाटे देवा ॥ २ ॥

वरील संत तुकाराम महाराजांच्या दोन ओळी वाचल्यानंतर कोमलच्या आई-वडिलांची किती पुण्याई असेल. म्हणून त्यांच्या पोटी कोमल नावाचे रत्न जन्माला आले. असे मला मनापासून वाटते.

baba channe bol marathi

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर, जि. औरंगाबाद