आला 8 मार्च. होईल उदो उदो तिच्या शौर्याचा कर्तृत्वाचा .गायल्या जातील गाथा तिच्या पराक्रमाच्या, अन् ठेवला जाईल माथा तिच्या स्नेहपूर्ण स्वभावावर. या एका दिवसासाठी ती सगळं करते का? तर नाही ती वर्षानुवर्षे अगदी युगानुयुगे झुकते आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा विचार न करता. स्वअस्तित्वासाठी झटते आहे. एकविसाव्या शतकात 8 मार्च दिनी तरी तिचा सन्मान होऊ लागला आहे. तिच्या सहनशक्तीचा अंत नसतो. कधी ती झुकते तिच्या लेकरांसाठी, नातेवाईकांसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी. तिच्या शारीरिक, मानसिक भावना बाजूला सारून ती फक्त झटत असते.
घरासाठी झीजणारी बाई चूल आणि मूल यातून बाहेर पडून शिकून-सवरून नोकरी, व्यवसायाकरिता बाहेर पडली. तिथे तिने तिचं अस्तित्व दाखवून दिले. स्त्री कुठेच कमी नाही. आज उच्च पदावरील महिला पाहिल्या की अभिमानाने ऊर भरून येतो. पूर्वीच्या काळातील ज्यावेळी स्त्रियांना उंबरठा ओलांडण्यास सुद्धा पाप समजले जायचं, त्या काळातही आपलं स्त्रीपण आडवे येऊ न देता पुरुषांच्या बरोबरीने लढणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा म्हणून ठरलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराष्ट्राचे छत्रपती घडविणाऱ्या माता जिजाबाई, छत्रपती संभाजी राजे यांची पत्नी येसूबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई, आंबेडकरांना साथ देणाऱ्या रमाबाई अशी अनेक उदाहरणं आपल्याला माहीत आहेत. पण खर्या अर्थाने पुस्तकी ज्ञान, वाचन लेखनाचा प्रारंभ सावित्रीबाई फुले यांनी केला, जिथून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली, आणि ती शिकू लागली त्या सगळ्या माय माऊलींना आजच्या महिलांचा मानाचा मुजरा आणि असंख्य सलाम.
प्रत्येक स्त्री स्वतःच एक शक्ती असते. वेगळीच असते ती पुरुषापेक्षा मानसिक दृष्टीने. का कोण जाणे? जेव्हा मी माझ्या मैत्रिणी, नात्यातल्या, आजूबाजूच्या स्त्रियांना बघते ना तेव्हा मला हे जाणवतं. काय काय सहन करतात या. त्या मानानं आपण काहीच नाही असं वाटून जातं .प्रत्येक स्त्रीचं आयुष्य म्हणजे एक कहाणी असते. सोशिकतेची, आनंदाची, दुःखाची, तिच्यातल्या बेफिकीरीची, तर कधी बिनधास्त मुक्त जगण्याची. पण ती जगते कोणत्याही परिस्थितीत.. स्वतःच एक वेगळं अस्त्तिव ठेवून. ती जितकी इतरांसाठी जगते ना तितकी ती स्वतःसाठी जगत नाही किंबहुना तिला तसा वेळ मिळत नाही. असं असलं तरी तीच तीच एक अवकाश असतं स्वतःचं बनवलेलं , किंवा तिच्या कळतं नकळत बनलेल सुद्धा. तिच्या जगण्यात तिला ते सोबत करत. एका अनामिक शक्तीनं ती बांधली जाते स्वतःभोवती.असतात मग तिच्या सोबत तिचे तिचे विचार. कधी फुटकळ, कधी हसवणारे तर कधी गंभीर करणारे. यातूनच ती वाट काढत पुढे जात राहते. पण ती हारत नाही. मजबूत होऊन जगत राहते.
निसर्गतः ती प्रेमळ असते. प्रेम तिच्या ठायी भरलेलं असतं. तरीही प्रेमापेक्षा तिला सन्मान गरजेचा असतो. तिला सन्मान मिळाला की ती आणखीन प्रेमाने भरून येते झोकून देऊन कोणतेही काम होईल असं करते. कितीही बिझी असली तरी तिच्या डोक्यात तिच्या मुलांची काळजी असते. पहिली काळजी लेकरांच्या खाण्याची, मग त्यांच्या अभ्यासाची. वेळात वेळ काढून ती मुलांची जेवणाची, अभ्यासाची चौकशी करते. घरातील वृद्धांची चौकशी करते औषध-पाणी पाहते. तिने केलेल्या कामाची यादी संपणार नाही. तिच्याकडे असलेला महत्त्वाचा गुण म्हणजे तिची सहनशीलता. कोणी रागावले, ओरडले, भांडले तरी ती सहन करत असते. तिला कुटुंब, नातेवाईक यांना जोडून ठेवायला आवडते. स्वतःच्या कुटुंबासाठी साऱ्या साऱ्या सुखांचा त्याग करायला ते मागेपुढे पाहत नाही. आजच्या दिनी इतकच वाटतं की येऊ द्या तिला जन्मास ती फेडील तुमचे पांग. जगू दया तिला मनासारखं.
प्रत्येक स्त्रीने सुद्धा जगताना 51% घरासाठी, 49% नोकरी-व्यवसायासाठी आणि निदान 1 % तरी स्वतःसाठी जगावं. असा एखादा छंद जोपासावा जो कधीच तिला एकटं पाडणार नाही. तिला तिच्या मरणापर्यंत साथ देईल. मुले थोडी मोठी झाली की त्यांच्यातील गुंतवणूक तिने कमी केली पाहिजे. डिटॅच राहून अटॅच कसे राहायचं हे तिला जमायला हवं. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायला हवा.छंदासाठी वेळ कसा काढायचा तिचं तिने ठरवायला हवं.कारण छंद म्हणजे एक स्वतंत्र अस्तित्व असतं. कोणताही छंद असू दे त्याच्यातून तिचं जगणं ती जगत असते. ती आपलं मन त्याच्यातून मांडत असते.व्यक्त होत असते. रांगोळीतून रंग भरताना जीवनाचे रंग ती भरत जाते. चित्रातून व्यक्त होते. अशा कोणत्याही छंदातून दिसतात तिच्या अस्तित्वाच्या खुणा.ती आनंदी तर घर आनंदी असते हे सगळ्यांनी धान्यात ठेवावं. तिला थोडीफार मदत करुन तिच्या प्रती सन्मान दर्शवावा.हीच खरी या दिनी सुरुवात असेल.
सौ जयश्री अविनाश जगताप
सातारा