आईच्या उदरात गर्भरूपाने एक जीव वाढतो, आपल्या मातेशी तो एकरूप होतो, अन् तिचाच होऊन एक संरक्षण कवच घेऊन बाहेर येतो, तिच्या अंगाखांद्यावर खेळताना कधी मोठा होतो हे कळतही नाही.
मातीच्या या गोळ्याला आकार देण्यासाठी "आई नावाचे आयन" आपलं सर्वस्व पणाला लावते. आईची प्रकर्षानं आठवण येत असताना 'शत भावनांनी आज माझे हृदय उचंबळून आले, डोळे पाणावले अन् अश्रूंच्या तर्पणाने कागदावर मनातले भाव मांडले...' आम्ही चार भावंडे. त्यावेळी म्हणजे आमच्या जन्माच्यावेळी आईचे आईवडील म्हणजे माझे आजीबाबा रानातल्या घरात राहायचे. आई, मावश्या, मामा अशी सात भावंडे, मोठे कुटुंब, अन् परिस्थिती जेमतेम तरीही सारी भावंडे एकत्र गुण्यागोविंदाने राहत. गावातून शेताच्या लगतच एक नदीवजा ओढा खळखळून वाहायचा. त्याला जवळजवळ बारमही पाणी असायचे म्हणून आजूबाजूचा परिसर नेहमी सुजलाम् सुफलाम् असायचा.
आईच्या तोंडून तिच्या माहेराचे कौतुक ऐकताना आम्हीही बालपणी मामाचा गाव अनुभवलाय. माझा त्र्यंबक मामा स्वभावाने अतिशय मायाळू, दिलदार आईवर त्याचा खूप जीव... घरातल्या सर्वांचीच जबाबदारी तो लीलया पार पाडत असे, आईची चारही बाळंतपणे मामाच्या घरीच झालेली. त्याकाळी वाहतुकीची साधने नव्हती, दुखले खुपले तर तालुक्याच्या गावी जावे लागायचे आणि तेही बैलगाडीने.
शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे अतिशय शांत, स्थिर, सोशिक स्वभावाची माझी माऊली मोठ्या धीराची होती. पोटात बाळ असताना देखील मामा मामीबरोबर शेतात वांगी तोडणे, मिरच्या खुडणे, भाजीपाला लावणे आणि संध्याकाळचा स्वयंपाक करणे ही कामे ती हसतमुखाने पार पाडी. तिच्या हाताला विलक्षण चव होती दमून थकून शेतातून काम करून आलेली मंडळी तिच्या हातचे जेऊन तृप्त व्हायची....
नऊ मास सरले., प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या "बाईच्या प्रसूतीच्या वेदना म्हणजे प्राणाशी प्रसंग" जीवनातला अती कठीण समय. घरातील सर्वच मंडळी पांडुरंगाचा, नारायणाचा धावा करायची आणि सारी चिंता त्याच्यावर सोपवून द्यायची. जीवन मृत्यूच्या सापळ्यात अडकलेला जीव एकदाचा मोकळा झाला की सर्वजण सुटकेचा सुस्कारा टाकत.
किती भयाण प्रसंग तो! बाईपण आईपण मिळणं, ते निभावणं सोपं नाही. आईच्या कुशीत निजलेलं तान्हूल, तिची प्रेमळ करुणामय नजर पाहून माझी बीजा आजी कौतूकाने तिची अन् बाळाची नजर काढत असे. खरंच... दया, क्षमा, कष्ट, सोशिकता याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आई.
प्रेम वात्सल्याचा फुटे तिज पान्हा
निजता कुशीत बाळ राजस तान्हा
तिच्या दुधास अमृतासम गोडी
पिऊनी तृप्त होई यशोधेचा कान्हा...
आईची अन् तिच्या बाळाची नजरभेट होताच, त्याचे गोड पापे घेताना तिच्या प्रसूतीच्या वेदना सहज कुठे विरून जातात, हे देखील कळत नाही.
किती सोसशी प्रसूतीच्या कळा
होई बाई जन्माच सार्थक
आई तुझ्याविना लेकरांच
जगणच आहे गं निरर्थक.
सौ. निता यशवंत भामरे, नाशिक