आभार मानायचे राहून गेले...

आमच्या जीवनाला सुगंधित ‌करणाऱ्या‌ या कस्तुरीचे, प्रेम ममतेचा अथांग सागर त्या वात्सल्य मूर्तीचे आभार मानायचे राहूनच गेले

आभार मानायचे राहून गेले...

किती वर्ष उलटून गेले... परंतु आजही ती वात्सल्याची करुणामय मूर्ती जशीच्या तशी डोळ्यापुढे उभी राहते. सडपातळ बांधा, गौरवर्णीय, गुडघ्याच्याही खाली लोंबकळणारी लांबसडक वेणी, साक्षात लक्ष्मीच आपल्या पुढ्यात उभी रहावी. प्रथम दर्शनी त्यांना आमच्या घरासमोरून जैन मंदिरात जाताना बघितलं, आणि सारखं बघतच राहावं असं वाटणारं ते विलोभनीय सौंदर्य, ईश्वराने अगदी तल्लीन होऊन त्यांची मूर्ती घडविली होती.

अशा आमच्या आ. सुनिता काकू...  त्यांना आमचा फारच लळा. जणू मागच्या जन्मात आमचे रक्ताचेच संबंध असावेत. आम्ही त्यांचे केवळ शेजारी आहोत ही भावना त्यांनी कधीच जाणवू दिली नाही. माझी बहीण आणि मी  बऱ्याचदा त्यांच्याकडे जात होते. तासनतास त्यांच्याशी गप्पा मारत कसा वेळ जायचा कळायचंही नाही.शाळेचा अभ्यास, इतर गमतीजमती, त्यांचे शालेय जीवन, त्यांना शिक्षणात असलेला रस, विवाहामुळे समोरच्या शिक्षणाची राहिलेली आवड  याविषयी भरभरून बोलायच्या. लक्ष्मी घरी पाणी भरत असतानाही अहंकार, गर्व हा शब्द ही त्या माऊलीला ठाऊक नव्हता.

लावण्याची मूर्ती ती
तिजं लक्ष्मीचं वरदान
नाही यत्किंचितही जरा
ठावा कुठला अभिमान

काकूंच्या सहवासात गप्पा-टप्पा मध्ये छान दिवस जात होते. काही दिवसांनी काकूला सुरेख बाळ झालं. बाळाला खेळवण्यासाठी आमचही त्यांच्याकडे जाण्याचं प्रमाण वाढलं. खूप गोड आवाजात त्या आपल्या बाळाला जोजवायला गाणं म्हणायच्या

"मेरा चंदा है तू, मेरा सूरज है तू
ओ मेरी आंखों का तारा है तू"

आम्हीसुद्धा तल्लीन होऊन त्यांचं गाणं ऐकत होतो. बाळाला कुठे इजा होऊ नये म्हणून त्या फार कमी दागिने वापरत होत्या. तसं पाहता त्यांना दागिन्यांची काही हौसही नव्हतीच. प्रत्येक गोष्टीत काकू आम्हाला खूप छान मार्गदर्शन करायच्या.

कधीही वाकडं पाऊल पडू द्यायचं नाही, वाईट गोष्टींपासून नेहमी दूर राहायचं, हे वारंवार समजावून सांगायच्या. त्यावर्षी माझी बहीण
बारावीला आणि मी डी.एड. ला होते. काकू तिचे पेपर झाले म्हणजे प्रत्येक चाचणी परिक्षेचे पेपर बघायच्या. सतत अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यायच्या, रोज रात्री तिच्या कडून ठरवून घ्यायच्या कि ,ताई आज तुम्हाला एवढ्या वाजेपर्यंत अभ्यास करायचा आहे, आणि माझी बहिण योगिता, तिने सुद्धा मनात निश्चय केलाच होता, की कॉलेजमधून मला टॉपर यायचंच आहे. तिच्या अभ्यासा मागे काकूंची मेहनत होतीच. तिचे चांगले मार्क्स पाहून, त्यांना खूप आनंद व्हायचा. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता यायची. मारवाडी जैन असल्यामुळे त्यांच्याकडे तशी बरीच बंधने होती, सासू-सासरे थोडे कडक स्वभावाचे होते, जास्त कुठे बाहेर जायची त्यांना परवानगी नव्हती,
परंतु त्याविषयी मात्र त्या कधीच कुठे बोलत नव्हत्या.
           
आमच्यासोबतच त्यांचा वेळ जायचा. काही बनवलं त्यांनी, तर नाही नाही म्हटलं तरी अगदी प्रेमाने  खाऊ घालायच्या. आमचा स्वभाव थोडा लाजाळू असल्याने; आम्ही कुठलीच गोष्ट पटकन घेत नव्हतो, शिवाय ते एवढे श्रीमंत होते, की आम्हाला थोडं संकोचल्यासारखं व्हायचं. पण काकूंचं मात्र तसं नव्हतं.
त्या अगदी आम्हाला खूपच जीव लावायच्या,
        
जिवाभावाची मैत्रीनच
काकू आमची होती
प्रेमाच्या  छत्रछायेत
बहरली सुंदर  नाती

काकूच्या मार्गदर्शनात तिचा सारखा अभ्यास सुरू होता. सराव परीक्षेमध्ये सुद्धां तिने बाजी मारली होती. आता बोर्डाचे पेपर होते. जोमाने अभ्यास सुरू होता. काकूसारख्या अभ्यासासाठी प्रेरणा द्यायच्या. तिची खूप काळजी घ्यायच्या. आई सुद्धा तिला कुठलं काम सांगत नव्हती. प्रत्येक गोष्ट तिच्या हातात आणून द्यायची. जमेल तसा, वेळ मिळेल तसा, योगिताचा अभ्यास सुरू होता. बोर्डाचे पेपरही खूप छान गेले .
       
जिद्द होती मनामध्ये
यश आता मिळवायचे 
प्रयत्नांची पराकाष्टा करून
एव्हरेस्ट शिखर गाठायचे

सात जून निकालाचा दिवस उजाडला, त्यादिवशी वटसावित्री होती, आमच्या सर्वांचा उपास, आई फराळाचं करायला लागली. तेवढ्यातच घरी कॉलेजचे बाबू, आणि पत्रकार आले, योगितावर अभिनंदनाचा वर्षाव करू लागले, आज तिच्या मेहनतीचं चीज झालं होतं. आम्ही शेतकरी कुटुंबात असल्यामुळे, व परिस्थिती साधारण... एखाद्या शेतकऱ्याची मुलगी मेरीट मध्ये येणे, ही त्या पित्यासाठी खूपच असाधारण गोष्ट होती. आज आई-बाबा आजी सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. आपली बहीण मेरिटमध्ये आली, हे ऐकून माझाही आनंद गगनात मावेनासा झाला. मी तशीच धावत पळत सुनिताकाकू कडे गेली. त्यांना सांगितलं की "काकु आपली योगिता मेरीटमध्ये आली" हे ऐकताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले..... त्या लगेच मला म्हणाल्या , "ताई सांगू नका तुम्ही त्यांना, की तुम्ही मला सांगितलं म्हणून, मला बघायचं आहे त्या मला सांगायला येतात कि हवेतच उडणार‌ आज "

पत्रकार जाताच माझी बहीण धावत धावत काकूंकडे गेली, आणि त्यांच्या गळ्यात पडून अक्षरक्ष: रडायला लागली, आज दोघींच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. काकुनी  लगेच तिची पाठ थोपटली... पटकन स्वतः पेढ्यांचा डब्बा बोलवला आणि तिचं तोंड गोड केलं . आजही तो भाऊक करणारा प्रसंग डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो. थोड्याच दिवसात ‌तिचा वाढदिवस होता . तेव्हा  वाढदिवसाला काकुंनीतिच्यासाठी ड्रेस पाठवला, आणि लगेच म्हटल्या, "सांगायचं नाही का ताई आधी, मी वर्धे वरून आणखी सुंदर ड्रेस आणला असता हो तुमच्यासाठी".
         
त्यानंतर माझी बहीण योगिताने डी. एड. ला एडमिशन घेतली. वर्धेला जावं लागत असल्यामुळे तिलाही वेळ कमी मिळत होता , त्यामुळे काकूकडे जाणं  कमी झालं . त्याच कालावधीत काकूंची सासू जळून मरण पावली... आणि आमच्या सुंदर काकुच्या तब्येतीलाही ग्रहण लागलं , काकू दुसऱ्यांदा प्रेग्नंट राहिल्या परंतु त्यात त्यांना मात्र बऱ्याच आजारांनी ग्रासलं. अधेमधे  आम्ही दोघीही जातं होतो, त्यांचं मन वळविण्याचा प्रयत्न करत असू, परंतु त्यांच्या मनात मात्र कुठलेतरी विचार यायचे, दिवसेंदिवस काकू अधिक कृश होत चालल्या होत्या. त्यांना एवढ्या मोठ्या घरात एकटं वाटायला लागलं होतं. त्यांच्या अशा तब्येतीमुळे त्यांचे भाऊ वहिनी त्यांना माहेरी न्यायला आले. तेव्हा योगिता त्यांना भेटायला गेली, तिला काकू कडे पाहून खूप रडायला आले, "काकू तुम्ही किती अशक्त झाल्या हो" असं म्हणत तिला खूपच रडायला आलं,"योगिता ताई तुम्ही रडू नका, मी परत येतेच, तुम्ही छान अभ्यास करा"आणि आपला आशीर्वाद देऊन काकू माहेरी निघाल्या. सातव्या महिन्यातच त्यांचं सिझेरियन करून बाळ काढण्यात आलं,. पण आता काकूंची वाचण्याची काहीच शक्यता नाही असं असं डॉक्टरांनी सांगितलं . बाळ जन्मल्यानंतर पंधरा दिवसातच, काकुनी शेवटचा श्वास घेतला, आपल्या दोन गोजिरवाण्या बाळांना मागे ठेवून ही माऊली अनंताच्या प्रवासाला निघून गेली होती.
       ‌   
ही बातमी कानावर येऊन धडकताच छातीत एकदम धस्स झालं , आमची लाडकी काकु परत येईल हा आमचा विश्वास आज हरला होता. अंतर्मन एकदम स्तब्ध झालं  .एवढही काही आपल्यासोबत वाईट होऊ शकते, यावर योगिताचा आणि माझा विश्वासच बसत नव्हता. डोळ्यातून चिंब चिंब भिजवणाऱ्या अश्रुधारा वाहू लागल्या. आता आमच्या सुनिता काकू आम्हाला कधीच भेटणार नव्हत्या, म्हणतात ना,

'जो आवडतो सर्वांना,
तोची आवडे देवाला'

त्यांच्या स्मृतींनी आजही आमचा हृदयगाभारा गंधाळला आहे. त्यांच्या स्मृती आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहतील,

दूरदेशी गेली माऊली
राहिल्या स्मृती अंतरी
शब्दसुमने अर्पिते ही
त्या चरण कमलावरी

आमच्या जीवनाला सुगंधित ‌करणाऱ्या‌ या कस्तुरीचे, प्रेम ममतेचा अथांग सागर त्या वात्सल्य मूर्तीचे आभार मानायचे राहूनच गेले, आभार मानायचे राहूनच गेले...
   
'रेखाटावं ते सुंदर व्यक्तिमत्व
नाही सामर्थ्य माझ्या शब्दात
करते‌ मी केविलवाणा प्रयत्न  
लेखणीने‌ त्यांना साकारण्यात'

Vijeata Channekar

सौ. विजेता चन्नेकर, गोंदिया