उमलणाऱ्या कळ्यांवर संस्कार फुलवणारी दुर्गा म्हणजेच 'सासूबाई'

फुलाप्रमाणे नाजूक असतात ही मुलं त्याचा काहीही दोष नसतांना त्याला सारा त्रास सहन करावा लागत असे केवळ माझ्याच स्वाभिमानापायी

उमलणाऱ्या कळ्यांवर संस्कार फुलवणारी दुर्गा म्हणजेच 'सासूबाई'

पहाटे चार वाजल्यापासून तारेवरची कसरत करत आठ वाजता राघवला घेऊन बाहेर पडणारी सीमा आज कोमेजली, चेहरा पडला होता. रोजची मेली दगदग रागवला तरी सांभाळायला घरी हवं होतं कोणी माझं एकटीचं ऑफिसला जाणे किती बरं सोपं झालं असतं, हा विचार मनाला किती सुखावह वाटत होता. एकत्रित असताना राघवची जबाबदारी पूर्णपणे सासूबाई सांभाळायच्या तर त्यांची किती मदत व्हायची. हा विचार मात्र काळजात सुरी भोसकल्याप्रमाणे अनंत वेदना देऊन गेला. का बरं माळीतील मण्याप्रमाणे माणसं निखळत आहेत नकळतपणे कुपीतील अत्तर प्रसार व्हावं त्याप्रमाणे मनातील नात्यातील गोडवा अलगद संपुष्टात यावा, चार माणसं एकत्रित राहून नयेत का? मग शाळेतील "भारत माझा देश आहे" किंवा "हे विश्वचि माझे घर" या बालमनावर झालेल्या संस्कारांचं काय का फक्त ही पोपटपंची! नाही असे नको व्हायला खोलं अंतकरणात नात्यातील आपुलकीचा गोडवा रुजवणारे संस्कार या बालमनांवर व्हायलाच हवेत आणि ते देण्यासाठी बालकांचे विद्यापीठ त्यांची हक्काची मांडी सिंहासन म्हणजे? आजी सासुबाई
 
त्यांना कोण आणणार? येतील का त्या! सारं विसरून हो मी आणि माझ्या बाळासाठी राघवसाठी मला त्यांना बोललंच मग माझं काय माझा स्वाभिमान मीच का बोलू त्यांना नाही नाही! तेवढ्यात बेल वाजली आणि विचारांची तंद्री सुटली सीमा भानावर आली तर दूधवाला होता तीने ते दूध घेऊन गॅसवर ठेवले राघवच्या आटोपन्याकडे तिचे लक्ष लागले घड्याळाच्या काट्यासोबत तिची तळमळ वाढतच चालली होती, एकदाची ती घराबाहेर पडली आज का कोणास ठाऊक राघवही खूप चिडचिड करत होता. 

फुलाप्रमाणे नाजूक असतात ही मुलं त्याचा काहीही दोष नसतांना त्याला सारा त्रास सहन करावा लागत असे केवळ माझ्याच स्वाभिमानापायी. विचारांचे वादळ थांबायलाच तयार नव्हते, कामातही मन लागलं नाही टिफिन खाण्यातही रस नव्हता असं वाटलं की जाऊन घेऊनच यावे माफी मागून सासूबाईंना माफी मागितल्याने कुठे कमीपणा येणार आहे का गावाकडे सुट्टीत गेलो म्हणजे राघवची स्वारी आनंदात असते आणि त्याही त्यांची जबाबदारी पूर्णपणे सांभाळतात किती सहज त्याच्या बालमनाच्या शेकडो प्रश्नांची उत्तरे साध्या सोप्या शब्दातं त्याला पटतील रुचतील असे देतात.

गुडघ्याचा त्रास असतानाही त्याच्या मागे किती आनंदाने धावतात गुलाबाचे फुल अलगद तोडून घ्यावे तसे त्याला उचलून घेऊन मनसोक्त पापे घेऊन निरागस चेहऱ्यावरच हसू टिपतात. तोही गुलमोहर बहरावा तसा दिलखुलास हसायचा. परसात टेरेसवर कधी चांदण्याच्या प्रकाशात तर कधी जाई जुईच्या वर्षावात आजी, नातवांची मैफिल रंगलेली असायची गोष्टी, परीकथा, रामायण, श्यामच्या आईच्या गोष्टीही त्याला खूप समजू लागल्या होत्या. त्यातील आशयगर्भ ज्ञान जीवनाची कला भूतदया, प्रेम, माणुसकी, आईविषयी आदर मोठ्यांशी कसे वागावे, या सर्व सदगुणांचा वर्षाव कसा सहज त्याच्यावर अमृत सिंचनाच्या रूपात होत होता. या सर्व सुंदर गोष्टीचा सुंदर गालिचा अंगावर ओढूनच तो नकळत निद्रेच्या स्वाधीन व्हायचा. एक आई म्हणून आपल्याच पुढच्या गोळ्याचा हक्काचे ज्ञानपीठ त्याला मिळवून द्यावं की आपल्या सुखासाठी व्यक्तीशा अहंकारापायी या चिमुकल्या कळ्यांचा या ताऱ्यांचे भविष्य अंधकारात झोपून देऊन कायमचं अंधकारला कवटाळावं? हे कोडं काल, आज आणि उद्या अनुत्तरीतच आहे. अवाढव्य फीस भरून वाटेल तो क्लास लावून त्यांच्या वजनापेक्षा जास्त मोठा त्यांच्या बॅगचा बोजा आणि सॉक्समध्ये जखडलेली ही पाखरं ठेवून आपलं कर्तव्य पूर्णत्वास जात आहे का? सासू सुनेचा नात्यातील मनातील भाव आपण झटकून जाई-जुईच्या सोबतीप्रमाणे आपले घर परिसर नात्याच्या सुगंधाने बहरून टाकूया.

सासू साक्ष इतिहासाची
सुन साद नवश्वासाची...
इतिहास अन् श्वासाचे 
गुंफून रेशमी धागे 
सासू सुना सवे लेकी सम वागे...

सासूने जपलेली फुलवलेली संसार वेल पुढे मायेचा सिंचनानं जपण्याचं सामर्थ्य आपल्या सुनेत तीने द्यावेत मनातील मतभेदाच्यामागे त्या वेलीचा चिमुकला देह होरपळून जाऊ नये याचे भान हृदयात जपायला हवं...

Durga Deshmane

सौ. दुर्गा देशमाने-राऊत,
माजलगाव, जि. बीड