जिव्हाळ्याची शिदोरी वाटणारी नवदुर्गा : पूनम चंद्रकात बेडसे

पूनम बेडसे मॅडम एक माणूस म्हणून जेवढ्या श्रेष्ठ आहे. तेवढ्याच त्या एक उत्तम कवयित्री, उत्तम लेखिका, उत्तम  अभिनेत्री देखील आहेत.

जिव्हाळ्याची शिदोरी वाटणारी नवदुर्गा : पूनम चंद्रकात बेडसे

माणसाने किती चांगलं वागावं? याचे उत्तम उदारण म्हणजे धुळे आकाशवाणी केंद्राच्या गोड गळ्याच्या निवेदिका सौ. पूनम चंद्रकात बेडसे. बेडसे मॅडमचा आणि माझा परिचय नाशिकच्या लेखिका आदरणीय सरलाताई मोते यांच्या माध्यमातून मागच्या नवरात्रीतच झालेला. तसेच धुळे आकाशवाणी केंद्राच्या फोन इन कार्यक्रमात त्यांनी मला अनेकदा सहभागी करून घेतले होते. पूनम बेडसे मॅडमचा स्वभाव नावाप्रमाणेच आहे. पूनम म्हणजे पोर्णिमा आणि तो पोर्णिमेची मंद शितलता प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. अशीच शितलता मॅडमच्या स्वभावात आहे.

एक मितभाषी व्यक्तीमत्व म्हणजे बेडसे मॅडम होय. माझ्या आयुष्यात अनेक बऱ्या वाईट घटनाच्या बेडसे मॅडम साक्षीदारही आहेत. माझ्या लेखनाची लकब बघून त्या ओळखतात की मी कुठल्या परिस्थितीत असेल. अनेकदा मॅडम मला भावनिक आधारही देतात. त्यांच्या बोलण्यातील मधूरता, आपलेपणा, समजदारपणा मला खुप पराकोटीचा वाटतो. त्यांनी माझ्या अनेक कविता व्हाईस देखील केलेल्या आहे. मॅडमचे सेड्यूल पहाटे चारपासून ते रात्री अकरापर्यंत खुप व्यस्त असते. तरी देखील त्या महिन्यातून एक तरी फोन मला करत असतात. आणि ख्याली खुशाली विचारतात. एक मैत्रीण कशी असावी याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पूनम बेडसे मॅडम. मी मागे एकदा मैत्रीण कशी असावी या विषयावर 'अगदी तुमच्यासारखीच' ही एक कविता लिहिली होती. त्या कवितेतील सर्वच गुण आदरणीय बेडसे मॅडमशी जुळतात, असे मला वाटते. आदरयुक्त मैत्री कशी असावी, म्हणून मला त्या कवितेच्या काही ओळींचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो, तो असा,

अगदी तुमच्यासारखीच...
सुंदर, सोज्वळ अन् प्रेमळ मैत्रीण
माझ्याही आयुष्यात असावी 
अगदी तुमच्यासारखीच...

मान, सन्मान, आदर तुमचा
कायमच माझ्या मनात आहे
वास्तव्य कुठेही असो तुमचे
नाव मनात मात्र तुमचेच आहे

तुमच्याकडून घेण्यासारखे
खुप काही गुण चांगले आहे
मनात माझ्या तुमच्याविषयी
पवित्र व प्रेमळ भाव आहे

तुमची साहित्यिक वाटचाल
अन् सकारात्मक दृष्टिकोन
या कारणांमुळेच की काय 
आत्मियता माझी वाढत गेली

तुमच्या प्रेमळ मैत्रीच्या छत्रछायेखाली
थोडीशी सावली मला ही मिळो
अगदी तुमच्यासारखीच...
प्रेमळ मैत्रीण मला ही मिळो

मनाच्या किनाऱ्याला मैत्रीची लाट जेव्हा हळूवार स्पर्श करून जाते, तेव्हा खूप काही हरवलेले असतांना देखील आपलेपणाची ऊब देते,  खरंतर तेव्हाच कळते मैत्री काय असते. अगदी तोच विश्वास रंगीबेरंगी आपलेपणा मला बेडसे मॅडमच्या स्वभावातून अनुभवायला मिळतो. मैत्री म्हणजे फक्त दिखावा कधीच नसतो, मैत्री म्हणजे काळजात सदैव जपून ठेवणारी भावना असते. हे मला बेडसे मॅडम यांच्या मैत्रीच्या विश्वासातून समजले. आनंदसोहळा साजरा करायला सोबतीला असंख्य येतात. आपल्या म्हणणाऱ्या लोकांची खुप मोठी गर्दी असते. पण दुःखात  सात द्यायला पक्की मैत्रीच असावी लागते. हे तितकेच खरे आहे. जी व्यक्ती इतरांच्या सुखाचा विचार करत असते. तसेच मौल्यवान मैत्रीची शिदोरी आयुष्याच्या शेवटपर्यंत आठवणीत राहील अशी भरपूर मैत्रीतून वाटत असते. म्हणून मला मनापासून वाटते मॅडमच्या विचारांचा आयात असाच खूप मोठा होत जावो आणि त्यांच्या जीवनातील सुखाचा, खळखळून येणाऱ्या आनंदाचा व हास्याची कुठेही सीमारेषा नसावी.

पूनम बेडसे मॅडम एक माणूस म्हणून जेवढ्या श्रेष्ठ आहे. तेवढ्याच त्या एक उत्तम कवयित्री, उत्तम लेखिका, उत्तम  अभिनेत्री देखील आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो कविता लिहिलेल्या आहेत. तसेच त्यांच्यावर आतापर्यंत अनेक अल्बम व लघुचित्रपटाची निर्मिती देखील झालेली आहे. माणसाच्या डोळ्यात पाणी आणणारा त्यांचा अभिनय खरच दर्जेदार वाटतो. अगदी जिवंतपणाच त्या आपल्या अभिनयातून उभा करतात.

जीवनात अभिनय करता करता सामाजिक अभिनयातही त्या कधी कमी पडल्या नाही. त्यांनी स्वतः लिहिलेले साहित्य म्हणजे स्त्री-भ्रुणहत्या, बेटी बचाओ, पु.ल. देशपांडे लिखित ती फुलराणी वरील अभिनय, साक्षरता अभियान चिऊची कथा, अंभगवाणी खरच खुप श्रेष्ठ आहे. तसेच पूनम बेडसे नावाच्या या नवदुर्गेने "माय नी वारी" या अहिराणी चित्रपटात व "ध्वज" या मराठी चित्रपटात अभिनयाची चांगलीच  झलक दाखवून दिलेली आहे. तसेच 'लाईफस्टाईल' व 'माणुसकी' या लघुपटात देखील त्यांनी उत्तम काम केलेले आहे. "ती" या चित्रपटात देखील त्यांनी उत्तम भुमिका साकारलेली असून "कुजबूज" या वेबसिरीजमध्येही त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे.

तसेच नृत्य, गायन, कविता, एकपात्री अभिनय, खांदेश महोत्सवातील सूत्रसंचालन हे त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्वच जणू. या सर्व कार्यांची पावती म्हणजे त्यांना आजपर्यंत मिळालेले अनेक पुरस्कार. अहिल्याबाई होळकर पुरस्कार, विशेष गुणगौरव पुरस्कार, बेस्ट निवेदिका पुरस्कार, बेस्ट अँन्करिंग पुरस्कार, नैमित्तिक उद्घघोषिका पुरस्कार असे अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.

समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. म्हणून त्या समाजापुढे एक आदर्श निर्माण करत आहे. त्यांना  उत्कृष्ट काम करुन समाजात त्यांच्या कामाचा ठसा उमटवायचा आहे. माणसानं जगावं तर असं, की इतिहासानं आपल्यासाठी एक पान राखून ठेवलं पाहिजे. अशी सकारात्मक विचारसरणी असणाऱ्या पूनम बेडसे या नवदुर्गेला माझा मानाचा मुजरा.

baba channe

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर, जि. औरंगाबाद