आपल्या समाजात आजही कित्येक कुटुंब अशी आहेत जेथे पहिले अपत्य जन्माला आल्यानंतर मुलाच्या जन्मानंतर जो आनंद साजरा केला जातो तो आनंद मुलीच्या जन्मानंतर कोणाच्याच चेहऱ्यावर दिसत नाही. अगदी ज्या आईने मुलीला जन्म दिलेला असतो, त्या आईच्या चेहऱ्यावर देखील मुलीच्या जन्मानंतर आनंद दिसण्याऐवजी दिसते ती एक वेगळीच काळजी ती म्हणजे पहिली तर मुलगी झाली आता या नंतर काय? भविष्यात येणारे दुसरे आपत्य पण मुलगी झाली तर? काय होईल? समाज काय म्हणेल? कुटुंबातील व्यक्ती काय म्हणतील? अशा अनेक प्रश्नाने एक स्त्री वेढली जाते.
जन्म जर मुलाचा झाला तर कोणालाच काळजी नसते, येणारे दुसरे अपत्य हे काय असणार मात्र जर मुलगी जन्माला आली तर प्रत्येकाला येणारे दुसरे अपत्य हा मुलगाच अपेक्षित असतो. अशावेळी नकळतपणे एक प्रश्न मनात उभा राहतो आणि तो म्हणजे, स्त्री-पुरुष समानतेबद्दल अनेक भाषणे देणाऱ्या आपल्या समाजामध्ये स्त्री जन्माचा इतका तिरस्कार का? मुलीपेक्षा मुलगाच श्रेष्ठ ह्या विचाराचा इतका जास्त प्रभाव संपूर्ण समाजावर का?स्त्री जन्माविषयी आजपर्यंत जे ही लेखन झाले त्या सर्व लेखनामध्ये नेहमी स्त्रियांबद्दल, दुःखाची, कळकळीची, अतिशय काळजीची भावना व्यक्त करून समाजातील स्त्रियांना दुर्बल, अशक्त, आत्मविश्वासहीन बनवण्याचे काम कोणी केले? असे अनेक प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे शोधण्याची कोणत्याच स्त्रीला कधीच गरज भासली नाही. त्यामुळेच कदाचित आपण स्त्री आहोत म्हणजे हाच आपला गुन्हा आहे की काय अशी एक भावना अनेक स्त्रियांमध्ये वर्षानूवर्ष वाढत राहिली आणि त्याचाच परिणाम म्हणजे एका स्त्रीसाठी दुसऱ्या स्त्रीचा जन्म हा आनंदाचा क्षण नसून स्त्री जन्म म्हणजे दुःख, चिंता आणि काळजी. बदलत्या काळानुसार आधुनिक समाजात स्त्रियांबद्दल अनेक क्रांती निर्माण झाल्या त्या सर्वांमध्ये पुढाकार हा पुरुषांनाच घ्यावा लागला स्त्री शिक्षण, सती जाणे, बालविवाह अशा अनेक वाईट रूढी परंपरा होत्या यांना विरोध हा पुरुषांनीच केला. आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज स्त्री समाजात शिक्षण घेऊन मानाने जगत आहे. मग कधी कधी प्रश्न पडतो की जर समाजातील पुरुषांनी यासाठी पुढाकार घेतला नसता तर आजच्या काळात देखील स्त्रियांना त्याच परिस्थितीचा सामना करावा लागला असता का? आजही स्त्रियांना सती जावे लागले असते का? आजच्या काळात ही मुलींना घराबाहेर पडून शिक्षण घेता आले नसते का? हे सर्व प्रश्न यासाठी पडतात की, अनेक स्त्रियांसमोर एक जिवंत स्त्री जाळली जायची तेव्हा जळणाऱ्या स्त्रीला बघून अनेक स्त्रिया विरोध का नाही करू शकल्या? आजही अनेक ठिकाणी कळत नकळत स्त्रियांवर अन्याय- अत्याचार होतोच पण हे सर्व पाहून दुसऱ्या स्त्रिया कधीच तिच्या मदतीला धावून येत नाही. कारण त्या स्वतः शारीरिकदृष्ट्या असो किंवा मानसिकदृष्ट्या इतक्या परिपूर्ण नसतात, त्या समोरच्या स्त्रीला वाचवण्यासाठी प्रतिकार करू शकतील विचार केला तर खरोखर स्त्रीजन्माविषयी मनामध्ये तिरस्कार निर्माण करण्यासाठी एकच गोष्ट जबाबदार ठरली आहे. ती म्हणजे समाजातील स्त्रीने आपल्या जन्माचे महत्त्व समजलेले नाही.
स्त्रीचा जन्म म्हणजे संपूर्ण सृष्टीचा जन्म असतो. स्त्री म्हणजे संपूर्ण जगाची निर्मिती करणारी ती शक्ती आहे. जिच्या उदरी जन्म घेण्यासाठी देवाला सुद्धा प्रतीक्षा करावी लागते. फक्त एका कुळाचे नाहीतर दोन दोन कुळाचे नाव उजागर करणारी स्त्री म्हणजे दोन्ही कुटुंबाच्या सन्मानासाठी पात्र आहे. अशा या स्त्रीमध्ये ज्यावेळेस स्वतःबद्दल आत्मस्वाभिमान जागे होईल त्यावेळेस प्रत्येक स्त्री ही स्वतंत्र असेल स्वतःसाठी ही आणि इतरांचे रक्षण करण्यासाठी ती स्वतंत्र असेल. आपले निर्णय घेण्यासाठी, ती स्वतंत्र असेल आपल्याकरिता योग्य विचार करण्यासाठी आणि जेव्हा प्रत्येक स्त्री आत्मविश्वासाने भरपूर असेल तेव्हा तिला गरज नसेल कोणाकडून न्याय मागण्याची कारण ती आपल्याबद्दल होणाऱ्या प्रत्येक अन्यायाचा विरोध करण्यासाठी स्वतःइतकी सक्षम असेल की, तिच्यावर अन्याय करणारे देखील तिच्यासमोर आपोआप झुकले जातील. अशावेळेस प्रत्येक स्त्रीला आपला स्त्री जन्म हा तिरस्कार नसून स्त्री शक्तीचा सर्वात मोठा पुरस्कार आहे या गोष्टीची खरी जाणीव होईल.
वर्षातून एकदा नाही तर वर्षभर स्त्री दिवस साजरा करणाऱ्या सर्व माझ्या बंधू-भगिनींना नारी दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
सौ. पुनम सुलाने, जालना