नमस्कार! गेले दोन आठवडे मी वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियावर विविध प्रकारच्या आकर्षक जाहिराती बघत आहे. ह्या जाहिराती साडी, कपडे, दागिने अगदी मिठाईच्या दुकानांच्या पण आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त खरेदीवर २०%, ३०% सूट!! मला ह्या जाहिराती खूपच अस्वस्थ करत होत्या. हे का? का बरं हि विशेष सवलत? महिलांबद्दल आदर म्हणून कि अशी सवलत तिला मिळणं हि तिची स्वाभीवि योग्यता आहे म्हणून? किंवा ती सह्या प्रकारच्या जाहिरातींमागे सहज धावेल आणि मग विक्री वाढेल म्हणून?
खूप विचार केल्यानंतर मला असे उत्तर मिळाले, ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाली आहे आणि स्वतःचे आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम देखील! तिला खरंच ह्या अश्या प्रकारच्या सवलतीची गरज आहे का? खरं तर मनात आणलं तर ती कोणत्याही वेळी दुकानात जाऊन खरेदी करू शकते. पण मंडळी, हे सत्य जगाच्या काही भागापर्यंतच मर्यादित आहे. आजही जगातल्या कित्येक भागामध्ये स्त्रीला हीन अथवा दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. तिला गुलामासारखे वागवले जाते. ज्या स्त्री रूपाची आदिशक्ती म्हणून पूजा केली जाते, तिचाच भोगवस्तू म्हणून देखील वापर केला जातो. तिच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या लादल्या जातात. परंतु तिला तिच्या सर्व जबाबदाऱ्या उत्तमरीत्या कळतात . निसर्गतः तिच्या अंगी जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याचे कौशल्य असते.
स्त्री निसर्गतः प्रेमळ या दयाळू आहे. स्वतःच्या उदरात बीज घेऊन ती त्याचे प्रेमाने संगोपन करते. त्या प्रेमाने बीज बहरून फुलात रूपांतरित होते. तिला लाभलेली हि नैसर्गिक देणगी ती तिच्या प्रत्येक कृतीतून दर्शविते. त्याच्या बदल्यात ती फक्त आणि फक्त प्रेम, आदर आणि थोडीशी कृतज्ञता एवढीच अपेक्षा करत होती. मंडळी, आशचर्य वाटले ना "होती" असं म्हणाले म्हणून? अहो, जगभर इतक्या घडामोडी होत असताना स्त्री मध्ये, ह्या नैसर्गीक ऊर्जेच्या उगमस्थानामध्ये घडामोडी होणे राहील का? स्त्रीला तिच्यातील शक्तीचा साक्षात्कार झाला आहे. ती आता कोणाकडूनही प्रेमाची, आदराची किंवा कसल्याही प्रकारच्या कृतज्ञतेचि अपेक्षा करत नाही. ती स्वतःवर खूप खूप प्रेम करायला लागली आहे, ती स्वतःच स्वतःला रोज शाबासकी देत आहे. तिने स्वतःला थे आदरयुक्त जीवन दिले आहे. तिला हे कळून चुकले आहे कि तीचे व्यक्तिमत्व अत्यंत सुंदर आहे. ती भूमातेसारखी सुजलाम सुफलाम आहे. तिच्यातील प्रेम ओसंडून वाहत आहे. तिच्यातील ऊर्जा तिला उंच भरारी घ्यायला प्रोत्साहित करत आहे.
मात्र आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. जागतिक महिला दिना निमित्त, आपण सगळ्या एकत्र येऊन आपल्या आजूबाजूंच्या लोकांना ह्या स्त्रीरूपातील ऊर्जेची प्रचिती घडवायची आहे. आपण सगळ्याजणी मिळून एकमेकींना स्वतःमधील ऊर्जा बघायला आणि वापरून आनंदी राहायला मदत करूया.
हे सखी, तू त्या आदिशक्तीचे नितांत सुंदर, पवित्र, कनवाळू रूप आहेस. तू स्वतःवर आणि सगळ्या प्राणीमात्रावर खूप प्रेम कर.
जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
सौ. स्वाती सुळे,
(रेग्रेशन थेरपसीट आणि हिलर) ठाणे