संत साहित्याचा वारसा जपणारी कवयित्री : सोनाली रसाळ

सोनाली रामलाल रसाळ या वैजापूर तालुक्यातील कापूसवाडगाव या छोट्याशा खेडेगावातील रहिवासी. कापूसवाडगाव या गावाला खुप मोठी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. थोर संत गंगागिरीजी महाराज याच गावातील होते.

संत साहित्याचा वारसा जपणारी कवयित्री : सोनाली रसाळ

वैजापूर तालुक्याला फार मोठी धार्मिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. संत बहीनाबाई पाठक, गंगागिरीजी महाराज, नारायणगिरीजी महाराज, जनार्दन स्वामी, बाजीराव स्वामी या महान संतांनी तालुक्याला धार्मिक परंपरा घालून दिलेली आहे. तसेच विनायकराव पाटील यांनी स्वच्छ राजकारण आणि स्वच्छ शैक्षणिक संस्था कशी चालवावी याचा आदर्श महाराष्ट्राला घालून दिला तसेच तो आदर्श गंगाधर नाना टेंबीकर, नारायण बाबा पवार खंडाळकर व आर. एम. वाणी यांनी तो पवित्र वारसा पुढे चालू ठेऊन आदर्श राजकारण व शैक्षणिक संस्था चालवणे काय असते हे सबंध महाराष्ट्राला दाखवून दिले. वैजापूर  तालुक्याला १६ व्या शतकापासून साहित्य परंपरा आहे. संत बहीनाबाई पाठक यांनी काव्य रूपाने साहित्याचे रोपटे लावले. त्यानतंर रा.रं. बोराडे, भास्कर चंदनशिव, डाॅ. भीमराव वाघचौरे, उत्तम बावस्कर, धोडिंरामसिंह ठाकूर, ना. वि. पटारे, योगिराज बागूल, जे. के. जाधव, यांनी साहित्य परंपरा घालून दिली तसेच कै. जगताप सर, अशोक गायकवाड, कावेरी गायके, स्नेहल जगताप, यांनी तालुक्यात साहित्य चळवळीचा वारसा पुढे चालू ठेवला. सध्या तालुक्यात अनेक नवोदित लेखक व कवी लिहिते झालेले आहे. त्या नवोदित कवींमध्ये संत साहित्याचा वारसा चालवणाऱ्या सोनाली रसाळ हे एक महत्वाचे नाव आहे. 

सोनाली रामलाल रसाळ या वैजापूर तालुक्यातील कापूसवाडगाव या छोट्याशा खेडेगावातील रहिवासी. कापूसवाडगाव या गावाला खुप मोठी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. थोर संत गंगागिरीजी महाराज याच गावातील होते. गंगागिरीजी महाराजांचे किर्तन सुरू होते. किर्तन ऐकण्याकरिता एक मुलगा आला. महाराजांनी त्या मुलाला समोर बोलावले. आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले हा मुलगा भविष्यात खुप मोठा संत होईल आणि याच्या दर्शनाला देश विदेशातून भाविक येतील. आणि अगदी तसेच झाले तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून शिर्डीचे साईबाबा होते. त्याच पावनभूमीतील म्हणजे कापूसवाडगावातील सोनाली रामलाल रसाळ या आहेत.

त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झालेला असून अगदी लहानपणापासून त्यांना लेखनाची आवड आहे. त्यांचे लेखन हे आध्यात्मिक पायंडा पाडणारेच आहे. त्या आपल्या कवितेतून पांडूरंगाची विनवणी करतात. त्या लिहितात. 

अवतरशील का रे बा तू पांडुरंगा
साक्षी होण्यास माझिया अभंगा

नाम तुझे भासे स्वर्गाहूनी सुंदर
जपेल निष्फळ देऊनी आदर

ओढ जीवा लागली जसे गाय वासरू
पाजाशील ना रे पान्हा माय कनवाळू

सुकला रे प्राण घेण्या तुझा दर्शना
होतील नष्ट सगळ्या आत्मयातना

नाही घेता दर्शन जरी पंढरीसी येऊन
लटकीच भक्ती माझी होई तळमळ

होऊनी लेकुरवाळा सांभाळशी रे दीनदयाळा
पांगुळले जरी चरण माझे मन पाहे सर्व सोहळा

वरील रचनेत सोनाली रसाळ मॅडमचे प्रतिबिंब दिसते. त्या पांडूरंगाला विनवणी करतात. हे पांडूरंगा मला तुझ्या दर्शनाची ओढ लागली आहे रे... पण मी माझ्या पायामुळे दर्शनाला येऊ शकत नाही. त्यामुळे मला तळमळ होत आहे. हे पांडूरंगा तू मला तुझ्या लेकरासारखा सांभाळ करशील का रे. माझ्या पांगुळलेला पायामुळे मी जर पंढरपूरला जरी येऊ शकत नसेल तरी माझे मन पंढरपूरचा सर्व सोहळा पाहत आहे. किती निर्मळ भक्ती आपल्याला कवितेत दिसून येते. हे मॅडमच्या प्रामाणिक भक्तीचे विशेष म्हणावे लागेल.

रसाळ मॅडम मला बोलताना एकदा म्हणाल्या होत्या. सर माझे शरीर जरी अपंग असले तरी माझी बुध्दी अजिबात अपंग नाही. या एका ओळीहून खुप मोठा संदेश त्यांनी समाजाला दिलेला आहे. समाजात अनेक घटक असे आहेत की त्यांच्याकडे अनेक सुखसुविधा आहे. पण जशी बुध्दीमत्ता पाहीजे तशी नाही. कारण बुध्दीमत्ता हा माणसाचा खुप महत्वाचा दागिना आहे. तो सहजासहजी कोणाकडे सापडत नाही. रसाळ मॅडमने शेकडो अभंग, आध्यात्मिक कविता लिहिलेल्या आहे. तसेच त्यांना पशु-पक्ष्याविषयी खुप जिव्हाळा आहे. ही त्यांची खुप विशेष बाब आहे. 

कुठल्याही कलाकृतीची निर्मिती हा त्या कलावंतांच्या प्रतिभेचा आविष्कार असतो. म्हणून तिच्या अभिव्यक्तीची तगमग त्याला सतत बैचेन करत असते. किंबहुना तिचं मुर्तरूप हीच खऱ्या अर्थाने त्याच्या मनाची परिपूर्ती असते. किंवा अंतिम तृप्ती असते. लेखक कलावंत ही त्याला फारसा अपवाद नसतो. संवेदनशील लेखक हा अदिम काळापासून समाजाचा भाष्यकार राहीलेला आहे. तेथील तत्कालीन समूहमनाच्या वृत्ती - प्रवृत्तीमधून निर्माण होणारे विविध विचारप्रवाह त्याच्यातून घडत, रूढ होत, बदलत जाणाऱ्या अनेक घटनांचाही कमी-अधिक प्रमाणात साक्षीदार राहीलेला आहे. त्याचप्रमाणे  सोनाली रसाळ या औरंगाबाद जिल्ह्यातील आध्यात्मिक साहित्याच्या भविष्यात नक्कीच साक्षीदार होतील. असे त्यांच्या कविता वाचल्यानंतर आपल्याला वाटते. त्यांनी संत साहित्यात खुप मोठे नाव कमवावे असे मला मनापासून वाटते.

baba channe

बाबा चन्ने, धोंदलगाव, 
ता. वैजापूर