मनात सकारात्मक पेरणी करणाऱ्या : उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर

अंधारात सुध्दा आपली वेगळी ओळख हिरा निर्माण करत असतो, हिरा आहे तो चमकतच असतो. अगदी तसेच मॅडम आपले लेखन, अभिनय, वक्तृत्वकला जोपासत असतात.

मनात सकारात्मक पेरणी करणाऱ्या : उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर

स्त्री म्हणजे प्रेमाचा कधी न अटणारा सागर, असंख्य जबाबदाऱ्या पार पाडणारी, जिच्या शक्तीचा होत असतो जागर, स्त्रीची ताकद ही स्त्रीच्या कार्यात असते. जी स्त्री सहन करू शकते, तीच वाईट मार्गाचे दहन देखील करू शकते. असे कुठलेच क्षेत्र नाही की जिथे स्त्रीने आपली मोहर उमटवली नाही. म्हणूनच ८ मार्च स्त्री सन्मानाचा दिवस असतो. तोच 'महिला दिन' म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. स्त्रीने आकाशी घेतलेली झेप मान उंचवणारी आहे. अशीच एक स्त्रीशक्ती, मंजुळ, मधाळ वाणीने आपलेसे करणाऱ्या, हसतमुख, नेहमी कार्यतत्पर व्यक्तीमत्व, खरं तर त्यांची वेगळी ओळख मी करून द्यायची गरज नाही. कारण असे होईल मी मेणबत्ती असून सूर्याला प्रकाशाबद्दल सांगत आहे. तसेही आपल्या कामाचा प्रकाश मॅडमच्या कामातून सर्वाच्या समोर येतोच. उपजिल्हाधिकारी पद सांभाळून ज्या आपल्या कलेला देखील वेळ देतात, आवडीसाठी सावड करून आपले छंद जोपासतात. मला तर प्रश्न पडतो मॅडम वेळेचे गणित कसे जमवतात. जगभर एकच प्रश्न असतो. जेवायला वेळ मिळत नाही, मग छंदासाठी कसा काढावा? पण मॅडम आपली जबाबदारी व आवड खूप चांगल्या प्रकारे त्याचा समतोल साधता. 

आज याच आदर्श व्यक्तीला मी मला समजल्यानुसार शब्दात माडंते आहे. आदरणीय अंजली धानोरकर मॅडम महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाद्वारे १९९८ मध्ये शासकीय महसूल सेवेत तहसिलदार म्हणुन रूजू झाल्या. खरं तर आज माझी लेखणी देखील थरथरते आहे. कारण आपल्या आवडत्या व्यक्तीमत्वावर आज मी लिहते आहे. मनात येवढे आहे की शब्द देखील कमी पडतील. मॅडमचे प्रत्येक शब्द माझ्या मनात घर करून राहतात. त्यातील एक वाक्य मला खूपच जास्त आवडते, आयुष्यात कुठलीही गोष्ट करताना आनंद लुटत करा. मॅडम म्हणतात साधं पाणी देखील पित असतांना पाण्याचा घोट देखील एन्जॉय करत घ्या. त्यांचा प्रत्येक शब्द एक सकारात्मक पेरणी मनात करून जातो. आनंदाच्या मागे न पळता आनंद निर्माण करायचा, कामात व्यस्त राहून, मस्त राहिले पाहिजे हा संदेश त्या आपल्या शब्द फुलांनी देतात. 

मॅडमला महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघातर्फे मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते राज्य स्तरावरील उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार २००६ मध्ये प्राप्त झाला. तसेच २०१०-११ औरंगाबाद जिल्हा स्तरावर उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून गौरव देखील झालेला आहे. तसेच मॅडम वनखात्यात वन उपजिल्हाधिकारी, वन जमाबंदी अधिकारी या पदावर कार्यरत असताना औरंगाबाद वन जमाबंदी कार्यालयाला आय.एस.ओ नामांकन देखील मिळाले आहे. असे नामांकन मिळणारे महाराष्ट्रातील हे पहिले वन कार्यालय आहे.  ऐतिहासिक शहर म्हणून जगप्रसिद्ध असलेला औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ या गावात मतदान केंद्रावर सर्व स्तरावर महिला उमेदवारापासून ते सुरक्षाव्यवस्थेपर्यंत महिला पोलिसांची नियुक्ती केलेली होती. पूर्णपणे स्त्रीशक्तीला जगासमोर त्यांनी ठेवले. सन २०१७ मधील निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भारतीय निवडणूक इतिहासात ऐतिहासिक कामगिरी त्यांनी केलेली आहे.  

अंधारात सुध्दा आपली वेगळी ओळख हिरा निर्माण करत असतो, हिरा आहे तो चमकतच असतो. अगदी तसेच मॅडम आपले लेखन, अभिनय, वक्तृत्वकला जोपासत असतात. शांत वाहणारा वारा आणि माणसातील थंडगार माणुसकीच्या गारा जगात खूप काही बदल घडवून जातात. मॅडम चंचल, मितभाषी, उत्कृष्ट लेखिका आहेत. आपल्या लेखणीतून शब्दरूपाने, शब्दप्रसाद आपल्यापुढे ठेवणाऱ्या शब्ददेवता आहे. साहित्यक्षेत्रात देखील मोठे योगदान त्यांचे दिसते. मोठ्यापासून ते लहानपणापर्यंत त्यांचे साहित्य आपल्याला बघायला मिळते. त्यांचा "गट्टीफु" या बालकथासग्रहाची चतुर्थ आवृत्ती देखील प्रसिद्ध आहे. "मनतरंग" ललित लेखासंग्रह तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशित झाला तसेच "श्यामची आई" या पुस्तकाचे अभिवाचनाचे ऑडिओ डीव्हीडी पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या हस्ते प्रकाशित झाली. मला "आय. ए. एस. व्हायचंय" हे पुस्तक देखील प्रकाशित आहे. तसेच आणखी भर टाकणारे कार्य मॅडमने केलेले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत मनतरंग पुस्तकातील "काहूर" लेखाचा २०१२-१३ पासून बी.ए, बी.एस.सी, बी. एस. डब्ल्यू आणि बी.एफ.ए  द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २०१७-१८ पासून "देहबोली" व "संवाद कौशल्य" हा धडा पाठ्यक्रमात समाविष्ट केलेला आहे. तसेच नामांकित वृत्तपत्रात लेखन केलेले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक सामाजिक पुरस्काराने सन्मानित देखील केलेले आहे. मॅडमची व्वा! व्वा! आपल्या देशातच नाही तर परदेशातही होते आहे. त्यांच्यावरील लेख अमेरिकन नियतकालिक Thrive Global मध्ये फेब्रुवारी २००१ मध्ये प्रसिद्ध झालेला आहे तसेच स्पेन मधील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या Transcontinental Times या पंचवीस पेक्षाही अधिक देशांमध्ये वाचल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये मॅडमवरील ऑगस्ट २०२० मध्ये लेख प्रसिद्ध केला आहे. त्याचबरोबर फेमिना मासिकात २०१९ च्या अंकात देखील त्यांच्यावर लेख प्रकाशित झालेला आहे आकाशवाणीवर देखील त्यांचा सहभाग आहे. त्याचबरोबर त्या विविध विषयांवर चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करतात. व्हिडिओज मधून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषण देऊन त्यांच्यामध्ये सकारात्मक आशेची किरणे पोचवतात. तसेच साॅफ्ट स्किल ट्रेनर म्हणून शासकीय अधिकाऱ्यापासून ते महाविद्यालय व शाळांमध्ये वेळोवेळी प्रशिक्षण व मार्गदर्शन करतात.

माझी आणि मॅडमची प्रथम प्रत्यक्ष भेट ही २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक बाबा चन्ने यांच्या माध्यमातून झाली होती. ती भेट म्हणजे माझ्यासाठी सुखाची प्रर्वनीच होती. कारण आपल्या जीवनात ज्या व्यक्तीचे शब्द मोलाचे असतात. त्या व्यक्तीला भेटताना कसा आनंद होतो ते मला तेव्हा समजले. मधाळवाणी ज्यांची मलाच नाही तर अनेकांना आकर्षित करते, त्यांच्या प्रत्येक शब्दातून नवे विश्व निर्माण करण्याची उमेद मिळते, अगदी पाण्यासमान असणारा त्यांचा स्वभाव परिपूर्ण रंगीन दिसतो. अंधारावर मात करण्याचे बळ दुःखीकष्टी जीवनात मॅडमचे मार्गदर्शन देखील जीवनाला रंगीन बनवते. 

writer-kaveri-gayake

 कु. कावेरी आबासाहेब गायके
भिवगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद