क्रांतिकारी विचाराच्या संत कवयित्री : बहीनाबाई पाठक

संत बहीनाबाईंना लहानपणापासूनच धार्मिकतेची गोडी असल्यामुळे त्यांना भजन, किर्तन व पौराणिक कथा ऐकण्यात रस होता. शिक्षणाचा अभाव, हलाकीची गरीबी परिस्थिती तरीही बहीनाबाईंची वृत्ती समाधानी होती.

क्रांतिकारी विचाराच्या संत कवयित्री : बहीनाबाई पाठक

महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभलेली असून त्यात स्ञी संत ही मागे नाही. स्ञी संत परंपरेतील संत मीराबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपाञा, संत जनाबाई, संत वेणाबाई, संत आक्काबाई यांच्याबरोबरीने संत बहीनाबाई पाठक यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते.
         

संत बहीनाबाई यांचा जन्म कन्नड तालुक्यातील देवगाव (रंगारी) येथील श्री आउजी कुलकर्णी व आई जानकीदेवी कुलकर्णी यांच्या कुटूंबात अंदाजे इ. स. १६२८ मध्ये झाला असावा असे संत साहित्याच्या  अभ्यासकांचे मत आहे. संत बहीनाबाई यांचे कुटूंब धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे साहजिकच त्यांची ओढ ही आध्यात्माकडेच होती. त्याकाळी बालवयात विवाह होत असे त्यामुळे संत बहीनाबाई यांचा विवाह देवगाव (रंगारी) पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील रत्नाकर पाठक नावाच्या बिजवराशी झाला. रत्नाकर पाठक यांना आधीचीच दोन मुलं होती. 
           

संत बहीनाबाईंना लहानपणापासूनच धार्मिकतेची गोडी असल्यामुळे त्यांना भजन, किर्तन व पौराणिक कथा ऐकण्यात रस होता. शिक्षणाचा अभाव, हलाकीची गरीबी परिस्थिती तरीही बहीनाबाईंची वृत्ती समाधानी होती. तसेच संतवृत्तीला साजेल अशी पंढरीच्या पांडुरंगाची ओढ त्यांच्या मनात कायम घर करून होती. जयराम स्वामीच्या कीर्तनात संत तुकाराम महाराजांचे अभंग ऐकून  बहीनाबाईंच्या जीवणावर संत तुकाराम महाराजांचा प्रभाव पडत गेला. त्या रोज तुकाराम महाराजांचे अभंग म्हणू लागल्या त्यातूनच संत तुकाराम महाराजांचे दर्शन व्हावे हे त्यांना मनापासून वाटू लागले. त्यांना तुकाराम महाराजांचे दर्शन घेवून आशीर्वाद घ्यायचा होता. परंतू त्यांच्या भेटी आधीच तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाले त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. शेवटी संत बहीनाबाईंची भक्ती पाहून संत तुकाराम महाराजांनी कार्तिक वद्य ५ शके १५६९ रोजी स्वप्नात येऊन दर्शन दिले व गुरूपदेश केला. असे अनेक किर्तनकार आपल्या किर्तनातून प्रबोधन करतात. 
       

संत तुकाराम महाराजांच्या स्वप्नातील भेटीनंतर संत बहीनाबाईंचे जीवण फार बदलून गेले. आणि त्यानतंर त्यांनी संत परंपरेतील अनेक अभंगाची रचना केली. त्यांच्या अभंगातून संत तुकाराम महाराजांचे दर्शन आपणास घडते. अभंग, श्लोक, ओव्या, आरत्या असे सर्व मिळून ७३२ कविता संत बहीनाबाईंच्या नावावर आहे. त्यांनी कविता केल्या त्या १७ व्या शतकात परंतु त्या २० शतकात प्रसिद्ध झाल्या. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!, या प्रसिद्ध अभंगाची रचना संत बहिणाबाई यांचीच आहे. संपूर्ण अभंग पुढीलप्रमाणे, 

संत कृपा झाली इमारत फळा आली!
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया!
नामा तयाचा किंकर तेणे विस्तरिले आवार!
जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत!
तुका झालासे कळस भजन करा सावकाश!
बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा!!


यावरून संत बहीनाबाईंचे मोठेपण आपल्या लक्षात येते. संत बहीनाबाई या संत तुकाराम महाराजांच्या विचाराला प्रेरीत होऊन अभंग रचना करत असे. त्यामुळे त्यांना तत्कालीन सनातनी वृत्तीच्या लोकांचा खुप ञास सहन करावा लागला. तसेच संत साहित्य अभ्यासकाच्या मते इ.स. १७०० मध्ये संत बहीनाबाईंचा मृत्यू झालेला असावा असा अंदाज आहे. आजही संत बहीनाबाईंचा फिरता नारळी सप्ताह मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यावेळी महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने भाविक भक्त येऊन मोठ्या प्रेमाने संत बहीनाबाईंच्या प्रतिमेपूढे नतमस्तक होतात.           

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर 
९६६५६३६३०३.