प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करणारी गायिका : फरिन शेख (धन्नो)

 'औरंगाबाद आयडाॅल' या कार्यक्रमात फरिन शेख यांनी आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांचे मने जिंकून घेतले. तसेच त्याच कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी देखील फरिन शेखच्या गाण्याचे तोडभरून कौतुक केले.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करणारी गायिका : फरिन शेख (धन्नो)

वैजापूर तालुक्याला फार मोठी धार्मिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. संत बहीनाबाई पाठक, गंगागिरीजी महाराज, नारायणगिरीजी महाराज, जनार्दन स्वामी, बाजीराव स्वामी या महान संतांनी तालुक्याला धार्मिक परंपरा घालून दिलेली आहे. तसेच विनायकराव पाटील यांनी स्वच्छ राजकारण आणि स्वच्छ शैक्षणिक संस्था कशी चालवावी याचा आदर्श महाराष्ट्राला घालून दिला तसेच तो आदर्श गंगाधर नाना टेंबीकर, नारायण बाबा पवार खंडाळकर व आर. एम. वाणी यांनी आण्णांचा पवित्र वारसा पुढे चालू ठेऊन आदर्श राजकारण व शैक्षणिक संस्था चालवणे काय असते हे सबंध महाराष्ट्राला दाखवून दिले. तसेच तालुक्याला १६ व्या शतकापासून साहित्य परंपरा आहे. संत बहीनाबाई पाठक यांनी काव्य रूपाने साहित्याचे रोपटे लावले. त्यानतंर रा.रं. बोराडे, भास्कर चंदनशिव, डाॅ. भीमराव वाघचौरे, उत्तम बावस्कर, ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, ना. वि. पटारे, आशोक गायकवाड, विकास जगताप यांनी तालुक्यात साहित्य चळवळीचा वारसा पुढे चालू ठेवला. सध्या तालुक्यात अनेक नवोदित लेखक व कवी लिहीते झालेले आहे. त्याचप्रमाणे तालुका संगीत व गायन क्षेत्रातही मागे नाही. तालुक्याची कन्या फरिन शेख (धन्नो) यांनी तालुक्याला पूर्ण महाराष्ट्राभर नावलौकिक मिळून दिला.


गायिका फरिन शेख (धन्नो) यांच्याशी बोलत असतांना मला संत तुकाराम महाराजांचा पुढील अभंग आठवला.


आपुलिया हिता जो असे जागता ।
धन्य माता पिता तयाचिया ॥ध्रु.॥
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक ।
तयाचा हरिख वाटे देवा ॥१॥


गायिका फरिन शेख (धन्नो) यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आपण जर बघितली तर ती आध्यात्मिक आहे. त्यांचे आजोबा ह.भ.प. नजीर सय्यद (वस्ताद) हे वैजापूर तालुक्यातील लोणी (ब्रु.) या छोट्याशा खेडेगावचे. तसेच ते तालुक्यातील नामांकित भजनी होते. त्यांचे तालुकाभर आदराने नाव घेतल्या जायचे. सरला बेट येथील ह.भ.प. नारायणगिरीजी महाराज यांच्या सप्ताहातील ह.भ.प नजीर सय्यद (वस्ताद) हे महत्वाचे गायनाचार्य असत. त्यांचे मुलं रफीक नजीर सय्यद व हसन नजीर सय्यद हे देखील आध्यात्मिक वृत्तीचे असल्यामुळे घरात गायनाचा वारसा नेहमीच होता. त्यामुळे रफीक नजीर सय्यद यांची मुलगी फरिन हिला ही गायनाची आपोआपच गोडी लागली.


फरिन ह्या आजोबाप्रमाणेच गायनात खुप हुशार होत्या. त्यांचे वडील व काका गावातील मंदिरात भजन म्हणत. त्याच्यासोबत मंदिरात फरिन देखील जायच्या आणि मंदिरात भजन म्हणायच्या. भजन म्हणता म्हणता त्यांना गायनाविषयी प्रेम निर्माण झाले. जसे आपण आपल्या परमेश्वरावर मनापासून प्रेम करतो. भक्ती करतो. तसेच फरिन देखील आपल्या गायनावर मनापासून प्रेम करू लागल्या. गाणं म्हणजे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य घटकच बनून गेले. फरिन गाण्याशिवाय राहू शकत नव्हत्या.


त्याच कालावधीत त्याचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर सासरी गेल्यावर त्या गाण्याशिवाय राहू शकत नव्हत्या परंतु गाणं म्हणणे सासरच्या मंडळीना आवडत नव्हते. त्यामुळे गाण्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या फरिनची गाण्याशिवाय काय अवस्था झाली असेल. याची कल्पना आपण करू शकतो. जसे शरीरातून आत्मा बाजूला करावा अशी अवस्था फरिन यांची झाली होती. परंतु त्यांचे काका हसन सय्यद यांनी आपल्या पुतणीला मनापासून साथ दिली. आणि तिचे गाणे सुरूच ठेवले.


औरंगाबाद शहरात २०१८ ला  'औरंगाबाद आयडाॅल' हा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात फरिन शेख यांनी आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांचे मने जिंकून घेतले. तसेच त्याच कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी देखील फरिन शेखच्या गाण्याचे तोडभरून कौतुक केले. तसेच २०२० ला 'स्टार प्रवाह' या वाहिनीवर 'मी होणार सुपरस्टार' या कार्यक्रमात सहभाग नोंदवून 'माझ्या मनी प्रियाची' हे गीत गाऊन श्रोत्यांचे मने जिंकून घेतले.


तसेच एप्रिल २०२१ मध्ये 'सुर नवा ध्यास नवा' या 'कलर्स मराठी' वाहिनीवर सुरू असलेल्या कार्यक्रमात तर फरिन शेख यांनी आपल्या कुटूंबाचे, गावाचे, तालुक्याचे नाव राज्य पातळीवर झळकावले. फरिन शेख कोण आहे? हे संबंध महाराष्ट्राला कळाले. 'एक राधा एक मीरा' हे गीत त्यांनी गायले. तेव्हा 'कलर्स मराठी' या वाहिनीचे सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. तसेच त्यांना वेगवेगळ्या संस्थांनी अनेक महत्वाचे पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलेले आहे.

 
लोणी (ब्रु.) ता. वैजापूर या छोट्याशा खेडेगावात सर्वसामान्य कुटूंबात जन्म घेतलेली मुलगी आपल्या कला कौशल्य आणि सकारात्मक विचाराच्या जोरावर आपल्या कुळाचे नाव राज्यभर उज्वल करू शकते. ही पुर्वजन्मीची पुण्याईच म्हणावे लागेल. त्याचा आदर्श ही प्रत्येक मुलीने घेतला पाहिजे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश कसे संपादन करावे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे फरिन शेख (धन्नो).


फरिन शेखने एवढ्या उंचीचे यश संपादन केले असले तरी त्याचं बोलणं एकदम साधं आहे. कुठलाही मोठेपणा, बडेजाव त्यांच्यात दिसून येत नाही. माझ्यासोबत बोलत असतांना त्यांनी एकदम मोकळ्या मनाने संवाद साधला. आणि मला म्हणाल्या सर, माझा मुलगा मला खुप लकी आहे. त्याच्याकडे बघितले की माझ्यात आपोआपच सकारात्मक उर्जा उत्पन्न होते. कला ही माणसाला जगायला शिकवते. कुठलिही कला असो, उदा. साहित्य, नृत्य, संगीत, चित्रकला, अभिनय या कला माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात. 
फरिन शेख म्हणजे 'वैजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा' असेच म्हणावे लागेल. फरिनच्या रूपाने भविष्यात वैजापूर तालुक्याचे नाव नक्कीच देश पातळीवर उज्वल होईल असे मला वाटते. 
गायिका फरिन शेख (धन्नो) यांना गायन क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा. 


बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर
९६६५६३६३०३