आजच्या आधुनिक माॅमला माता म्हणावं की नाही हा मोठा प्रश्न आहे

शिवबा घडवताना जिजाऊला स्वतःला विसरावं लागलं. स्वतःच्या आशा-अपेक्षा, इच्छा, आवड यांना तिलांजली देऊनच परकियांच्या  ताब्यातील आपला मुलूख जिंकून, स्वराज्य निर्माण करणारा शिवबा घडवावा लागला.

आजच्या आधुनिक माॅमला माता म्हणावं की नाही हा मोठा प्रश्न आहे

स्वराज्याची जननी 
शिवबाची माता,
अलौकिक तेजपुंज ते 
निशब्द मी वर्णिता गाथा,
कर्तुत्वाला तिच्या प्रणाम 
टेकिते चरणी माथा।।

आजपर्यंतच्या कालखंडात अगणित माता होऊन गेल्या. पण जिजाऊ मात्र फक्त आणि फक्त एकच होऊन गेली. असं का? विचारा प्रत्येक माता- भगिनीनी स्वतःला प्रश्न. कठीण आहे. पण विचार करून पहा जिजाऊ होणं एवढं सोपं नाही.

जिजाऊ म्हणजे त्याग,
जिजाऊ म्हणजे संघर्ष,
जिजाऊ म्हणजे लढा,
जिजाऊ म्हणजे द्वंद्व,
जिजाऊ म्हणजे प्रेरणा,
जिजाऊ म्हणजे आदर्श,
जिजाऊ म्हणजे वादळ,
जिजाऊ म्हणजे प्रखरता,
जिजाऊ म्हणजे तेजपुंज, 
जिजाऊ म्हणजे धैर्य,
जिजाऊ म्हणजे सहनशीलता
जिजाऊ म्हणजे खंबीर नेतृत्व,
जिजाऊ म्हणजे झंजावात,
जिजाऊ म्हणजे प्रकाश,
जिजाऊ म्हणजे आधार,
जिजाऊ म्हणजे स्वाभिमान,
जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा प्राण,
स्वराज्याची आन-बान शान।।

स्वराज्याचा निर्माता घडवणारी जिजाऊ, जाधव घराण्याची कन्या आणि भोसले घराण्याची सून. शहाजीराजांची पत्नी जे मुघलांच्या चाकरीत होते. शिवबा लहान असताना त्यांच्या हाती पुणे जहांगिरी व मुलाची संगोपनाची संपूर्ण जबाबदारी आली. जी शेवटपर्यंत पार पाडावी लागली.आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर त्या "सिंगल मदर"  होत्या. जिजाऊ मासाहेब, ज्यांनी नवर्‍यापासून दूर राहून पुणे जहागिरी सांभाळत स्वराज्याचा निर्माता घडवला. घर परिवार तर सांभाळलाच पण जनतेलाही न्याय दिला. पोटचा मुलगा शिवबा स्वराज्यनिर्मीतीच्या अग्निकुंडात अर्पण केला. लहानपणापासूनच जीवनाचे तत्वज्ञान, व्यवहार, काळाची गरज आणि मुलाचे कर्तव्य, या गोष्टी विविध घटना, अनुभव, कथांमधून शिवबावर त्यांनी बिंबवल्या. स्वतःचे तारुण्य त्यांनी स्वराज्याच्या पायावर सहज अर्पण केले. स्वतःला विसरून, स्वार्थ बाजूला सारून संसाराबरोबर राज्यकारभाराची सूत्रे सांभाळणारी, राज्याचे खंबीर नेतृत्व करून, अष्टपैलू धैर्यवान, शूरवीर, आदर्श, धर्मशील, राजा स्वराज्याच्या सेवेत अर्पण करणारी माता म्हणजेच जिजाऊ मासाहेब. जिजाऊ इतिहास निर्माण करुन गेली.

आजच्या आधुनिक मम्मीना मॉमला "माता" पण म्हणाव की नाही, हा प्रश्नच आहे. आजच्या मम्मीलाच खरी संस्काराची गरज आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काही अपवाद वगळता हल्लीच्या सगळ्या मम्मी स्वकेंद्रित दिसताहेत. माझी स्वप्न, माझे करियर, माझ्या इच्छा, अपेक्षा यातच ती गुंग दिसत आहे. तोच कालावधी महत्वाचा असतो. मुलांवर संस्कार करण्याचा, त्यांना घडवण्याचा, योग्य दिशा देण्याचा. कुठं स्वतःच्या करिअरला महत्त्व देणारी मम्मी, आणि कुठं जिजामाता. म्हणूनच लेखनाचा विषय अत्यंत गहन आणि विचार करायला लावणारा आहे. "हल्ली जिजाऊ का निर्माण होत नाही." सर्वांनाच अंतर्मुख होण्यास भाग पाडणारा विषय आहे.

गंभीरतेने विचार करायला लावणारी बाब म्हणजे, छोट्या छोट्या कारणांमुळे विभक्त कुटुंब करायला लावणारी मम्मी, अगदीच लहान सहान कारणांवरून स्वतःचा संसार मोडणारी, सोडून जाणारी आधुनिक जगात स्वतःला स्वावलंबी, कर्तुत्ववान म्हणून घेण्यासाठी हपापलेली मम्मी. आपल्या लहानग्याला स्वतःपासून तोडताना क्षणाचाही विचार करत नाही. स्वातंत्र्याच्या नावाखाली बेशिस्त, बेजबाबदारपणे वागणारी, कमावती म्हणून गरोदरपणात गर्भसंस्कार करण्याऐवजी पार्टी व्यसन करणारी मम्मी, स्वतःच्या अहंकारात कोणालाही किंमत न देणारी मम्मी, कसा घडवेल शिवबा अन् कशी बनेल जिजाऊ?

शिवबा घडवताना जिजाऊला स्वतःला विसरावं लागलं. स्वतःच्या आशा-अपेक्षा, इच्छा, आवड यांना तिलांजली देऊनच परकियांच्या  ताब्यातील आपला मुलूख जिंकून, स्वराज्य निर्माण करणारा शिवबा घडवावा लागला. स्वतःच्या संसाराचा विचार न करता, स्वतःच्या स्वप्नांची राखरांगोळी करूनच स्वराज्याच स्वप्न साकार करावं लागलं.

आहे का? आजची मम्मी एवढी त्यागी, निस्वार्थ? ती तर स्वतःच्या स्वप्नात आणि करिअरमध्ये एवढी व्यस्त असते की, तेवढ्यात त्यांची मुले कधी मोठी होऊन बरोबरीला येतात. तिला आठवत सुद्धा नाही. आजची ध्येयवेडी मम्मी स्वतःला विसरल्याशिवाय शिवबा घडवणारी जिजाऊ कधीच होऊ शकणार नाही.

काही मोजक्या आई असतात, ज्या करतात प्रामाणिक प्रयत्न मुलांना घडवण्याचा पण त्याही मोठेपणा सामाजिक प्रतिष्ठा, श्रीमंतीचा देखावेपणा, एकमेकांची चढाओढ यात मुले शिकतात का नाही हेच बघायचे विसरतात. निव्वळ मोठेपणाची चढाओढ म्हणून इंग्लिश स्कूलमध्ये ऍडमिशन, उंची कपडे, स्कूल बस, थाटात जगणे, डान्स, पिकनिक या पाश्चात्त्य संस्कृतीला भूलून, आपली संस्कृती स्वीकार करायलाच कमीपणा समजतात. आपले सण, आपले उत्सव, संस्कार हे सोडून पाश्चात्त्य मोठेपणात आपल्या मुलांना अपुऱ्या कपड्यात, जंगफ़ूडच्या विळख्यात सोडतात. स्वतःही फॅशनच्या नावाखाली संस्कारशून्य वागतात. म्हणूनच मला वाटते की आधुनिक झगमगाटात स्वतःला सिद्ध करू पाहणारी मम्मीच जास्त निर्माण होत आहे. हल्ली जिजाऊ निर्माण होत नाही. मी आजच्या माताभगिनिंना सांगेन...

आता तरी सावर जरा
नको करू गर्व-अभिमान,
तुझीच संतती बिघडून
करीन तुझा अवमान।।

करिअर मागे धावून
नको करू संसाराचे मात्र,
घे जिजाऊंची शिकवण
घडव संस्काराने पुत्र।।

शेवटी एवढंच म्हणेन.... जिजाऊ बनून शिवबा जरी नाही घडवता आला, तरी माणुसकी जपणारी संस्कारशील संतती तरी नक्कीच घडवा.

Jayashree Autade

श्रीमती. जयश्री उत्तरेश्वर औताडे, 
जि. प. के. प्रा. शाळा गंगाखेड,
जि. परभणी