सौभाग्यवती महिलांचा महत्वाचा सण म्हणजे 'मकर संक्रांत' नवीन इग्रंजी वर्षातील पहिला मराठी सण 'मकर संक्रांत' दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी याच दिवशी येतो. सुवासिनाचा वाण वाटण्याचा व लुटण्याचा सण म्हणून पंधरा दिवस अगोदरच लहान मोठ्या प्लाॅटीकच्या वाणाने (वस्तूने) बाजार तुडूंब भरून वाहत असतो.
सहज बाजारातून चक्कर मारली अन् मनात विचाराची गर्दी निर्माण झाली. सण म्हणजे आनंद, उत्साह, समाधान व एकमेकांविषयी व्यक्त होणारं भरभरून प्रेम. सुवासिनी आपल्या शेजारी, परिसरातील व ओळखीच्या सर्व सुवासिनींना सोबत घेऊन संक्रांतीच्या दिवशी विठ्ठलरुक्मिणी मंदिरात आपल्या सौभाग्याला दीर्घायुष्य लाभावे, म्हणून प्रार्थना व पूजा करतात. नंतर रथसप्तमी म्हणजे धाकली संक्रांत येईपर्यंत एकमेकींना घरी वाणासाठी बोलवतात. हळदीकुंवाचे कार्यक्रम ठेवतात. काही ठिकाणी तर एकत्रित कार्यक्रम ठेवला जातो. महिला गटामध्ये आपल्या काॅलनीत एकच मोठा कार्यक्रम ठेवतात. एकट्याने कार्यक्रम करण्यापेक्षा एकत्रित कार्यक्रमामुळे पैशाचा अपव्यय टळतो. प्रत्येकाचा वेळ वाचतो. समुह सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी जपली जाते.
शहरामध्ये सामुहिक कार्यक्रम आयोजन दिवसेंदिवस वाढत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. कारण महिला एकटीने कार्यक्रम करण्याठी वाण म्हणून बाजारातून ज्या हलक्या वस्तू आणत होत्या. त्याची जागा आता सामुहिक कार्यक्रमामुळे उपयुक्त वस्तूने (वाणाने) घेतली आहे. उदा. गुळाची छोटी भेली, साखरेची छोटी पोती. कपड्यांची साबण, तेलाची छोटी बाटली, निरमा पुडा किंवा स्टीलची उपयुक्त वस्तू.
मग मला प्रश्न पडतो? बाजारातील प्लास्टिकच्या वस्तूचा वाढलेला व्यापार एवढा कसा वाढतोय, हा प्रश्न मनाला नेहमीच सतावतोय. आणखीही महिला अगदीच हलक्या निरुपयोगी वस्तूची (वाणाची) खरेदी करून वाणाची प्रथा चालवतच आहे. परंतु संक्रांतीसारख्या तीळगुळाच्या गोडव्याच्या सणाला घातक प्लास्टीक वस्तूचे बाजार कडवटपणा आणण्याची काहीच गरज नाही. महिला घरातील महत्वाचा घटक असते. आहार आणि आरोग्य सर्वस्व तिच्यावरच अंवलबून असते. तीने आता आधुनिक संगणक युगात विचारांनी थोडं प्रगल्भ व्हावं, आणि जीवनाला घातक सामाजिक रूढींना बदलण्याचा प्रयत्न करावा, असे मला वाटते.
जर एक महिला शिकली तर पूर्ण कुटूंब सुशिक्षित होत असेल तर समाजाची महत्वाची घटक असलेली महिला जर समाजविघातक रूढींच्या विरोधात उभी राहिली तर सणाचा गोडवा नक्कीच वाढल्याशिवाय राहणार नाही. महिलांनी बाजारात मिळणाऱ्या फक्त गोड तीळाचा वापर न करता आपल्या पारंपारिक तीळाचा व गुळाचा वापर करून आरोग्यदायी जीवनाची रूढ निर्माण केली पाहीजे. वाणात प्रेमपूर्वक दिल्या जाणाऱ्या निरुपयोगी प्लास्टिक वस्तूशिवाय वाचनयोग्य पुस्तके, झाडाचे रोपे, आरोग्यदायी खाद्यपदार्थ, तसेच समाजातील आदर्श कार्य करणाऱ्या महिलांच्या विचाराचे वाण लुटायला हरकत नाही. कारण समाजातील छोट्या मानल्या जाणाऱ्या गोष्टीनीच समाज अधिक प्रभावित होत असतो.
संक्रांत गोडव्याचा, प्रेमाचा, आपुलकीचा व जिव्हाळ्याचा सण. कितीही नाही म्हटले तरी किंवा फक्त महिलांचा सण म्हटलं तरी संपूर्ण समाज प्रभावीत झाल्याशिवाय राहत नाही. वाणाच्या वस्तू निर्मिती करणाऱ्या कारखान्यापासून ते खरेदी विक्री करणारा व्यापारी, सुगडे बनवणारा कुंभार, ऊस, बोर, हरभरा मिसळीच्या भाजीसाठी भाजी पिकवणारा शेतकरी, विकणारे व्यापारी, तीळगुळ निर्मिती करणारे बचतगट, एकुणच सर्व समाजघटक सहभागी असतात. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आणखी महत्वाचा घटक म्हणजे साडी व कापड व्यवसाय, सोनाराचे दुकाने, सामान्य कटलरी मेकअप सामानाचे विक्रेते, गजरे, हार, फुले विकणारा माळी, पिकवणारे शेतकरी, फळविक्रते ही सर्व उलाढाल सर्वमान्य व्यवहार आहे.
फक्त महिलांचा म्हणला जाणार 'मकर संक्रांत सण' सर्वच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व कृषीक्षेत्र ढवळून टाकत असेल तर महिलांनो कंट्रोल तुमच्या हातात आहे. सकारात्मक दृष्टीने विचार करून जुन्या रूढी परंपरा न नाकारता फक्त योग्य पद्धतीने बदलून सणाचा, पुरणपोळीचा, तीळगुळाचा गोडवा वाढवण्याची जबाबदारी तुमची आहे. जूनी संस्कारमुल्य तशीच सांभाळून नव्याची आधुनिक सकारात्मक सांगड कशी घालावी, आणि कुटुंबाबरोबर आपला समाज शहर नव्हे देश एकसंघ कसा ठेवायचा, यासाठी सिध्द व्हा! स्त्रीशक्तीचा वापर करा.
चला तर मग जुनी विचारांची जळमट काढून नव्या आधुनिक रंगाने, ढंगाने सजलेली पण जुन्या संस्कारमुल्यांना जपणारी 'मकर संक्रांत' साजरी करूया...!
आनंद वाटूया,
आनंद मिळवूया
मकर संक्रांत
साजरी करूया
श्रीमती. जयश्री उत्तरेश्वर औताडे,
गंगाखेड, जि. परभणी