अतिशय संवेदनशील व प्रेमळ स्वभावाची मानसकन्या : कावेरी गायके

कावेरीचे लेखन हे वास्तव मांडणारे असल्यामुळे मराठी साहित्याच्या दृष्टीने ते महत्वपूर्ण आहे. डोळस साहित्याचा वारसा कावेरी पुढे नेत आहे. ही माझ्या दृष्टीने खुप महत्वाची बाब आहे.

अतिशय संवेदनशील व प्रेमळ स्वभावाची मानसकन्या : कावेरी गायके

साहित्यक्षेत्रात वय कधीच महत्वाचे नसते, महत्त्वाचा असतो तो अनुभव. याचा प्रत्येय मला आला. म्हणतात ना, पुताचे पाय पाळण्यात दिसतात हे अगदी रास्त आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझी मानसकन्या कु. कावेरी आबासाहेब गायके हे होय. अतिशय प्रेमळ स्वभाव असलेली ही विसीतील तरूणी वैजापूर तालुक्यातील भीवगाव या छोट्याशा खेडेगावातील. गाव तसं पाहिलं तर खुपच छोटं. त्यातही कावेरी शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे राहायला शेतवस्तीवर. कावेरी शेतकऱ्याची मुलगी असल्याचा नेहमीच अभिमान बाळगते. शेतकरी पैशाने कधीच श्रीमंत नसतो. परंतू मनाने श्रीमंत त्याच्याइतका दुसरा कोणीच नसतो. हे तीचं वाक्य मनात घर करून केलं. 

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतात. पीक आले तर भाव नसतो, भाव असला की पीक नसते. निसर्गाचा लहरीपणा, ग्रामीण भागातील रस्त्यांचे झालेले वाटोळे हे कावेरीने अगदी जवळून पाहीलेले आहे. अनुभवलेले आहे. म्हणून तिच्या लेखनातून ग्रामीण भागाचे प्रश्न प्रामुख्याने जाणवतात. 'कोरोनाचा शेतमालावर झालेला परिणाम' हा कावेरीचा लेख अनेकांचे डोळे ओले करून गेला. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याकरिता शेतकऱ्यांचाच मुलगा किंवा मुलगी पाहीजे असते तरच त्या प्रश्नाला न्याय मिळू शकतो. नाहीतर काही जन वातानुकूलित कार्यालयात बसून शेतकऱ्यांविषयी लिहितात. तर ते कधीच वाचकाच्या ह्रदयाला भिडू शकत नाही. ह्रदयाला भिडणारं लेखन करणारा हा शेतकऱ्याच्याच कुटूंबातील असला पाहिजे तरच ते लेखन ह्रदयाला भिडते. उदाहरण द्यायचे झाले तर जेष्ठ ग्रामीण साहित्यिक डाॅ. भीमराव वाघचौरे यांची "रानखळगी" ही कादंबरी वाचकाचे डोळे ओले करते. तर का? डाॅ. वाघचौरे यांचे तरूणपण १९७२ च्या दुष्काळात होरपळून निघाले. आणि त्यांच्या त्या होरपळीचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात उमटले. त्याचप्रमाणे कावेरीचे बालपण गरीबीत गेले आणि कोरोनात शेतकऱ्यांची झालेली दुरावस्था तिने जवळून पाहिली. म्हणून त्या अवस्थेचे प्रतिबिंब तिच्या लेखनातून उमटते. हेच कावेरीच्या लेखनाचे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल.

कावेरी काव्यलेखन पण खुप प्रभावीपणे करत असते. कावेरी सध्या चाललेल्या 'चायनीज नात्याचा' बरोबर आणि नेमकेपणाने वेध घेते हे विशेष. 'चायनीज' हा शब्दप्रयोग मी यासाठी केला की सध्या कुठलेच नाते हे परिपक्व राहिलेले नाही. कोण कोणाला कधी धोका देईल, आणि नातं कधी संपुष्टात येईल, याचा अजिबात नेम नाही. म्हणून कावेरी चायनीज नात्यांचा बरोबर आपल्या लेखणीद्वारे वेध घेत असते. तसेच ती 'कोणासाठी तरी देव बना', या कवितेत लिहिते, 
 

शाब्दिक आधार देऊ आपण 
मोडणार नाही समोरच्याचा कणा, 
माणुसकीचे दर्शन घडवत 
कोणासाठी तरी देव बना...

वरील काव्यपंक्ती वाचल्यानंतर एक लक्षात येते, कोणी दुःखी, कष्टी असेल तर त्याला सकारात्मक शाब्दिक आधार द्यायला पाहीजे. जेणेकरून त्याचे जीवन सुखकर होईल. प्रत्येक माणसाने एका माणसाला जरी आधार दिला तर आपोआपच माणूसकीचे दर्शन घडेल. आणि आपल्याला देवत्व प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही.

कावेरीचे लेखन हे वास्तव मांडणारे असल्यामुळे मराठी साहित्याच्या दृष्टीने ते महत्वपूर्ण आहे. डोळस साहित्याचा वारसा कावेरी पुढे नेत आहे. ही माझ्या दृष्टीने खुप महत्वाची बाब आहे. भविष्यात कावेरी गायके महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील एक महत्वाचे नाव असेल. असा मला पूर्ण विश्वास आहे. कावेरीसारखी हुशार, संवेदनशील व प्रेमळ मुलगी माझी मानसकन्या आहे. याचा आनंद व्यक्त करायला शब्द ही अपूरे पडतील असे मला वाटते. 

Baba Channe

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर, जि. औरंगाबाद