एखाद्या स्त्रीने स्वतंत्र रहाण्याचा निर्णय घेतला तर त्यात वाईट काय?

एक स्त्री  म्हणून जबाबदारी पार पाडणं म्हणजे काचेचा हंडा डोक्यावर घेऊन दोरीवर चालण्याची कसरत आहे. यावर समाजाच्या प्रतिक्रिया अशा असतात.

एखाद्या स्त्रीने स्वतंत्र रहाण्याचा निर्णय घेतला तर त्यात वाईट काय?

'महिला दिन' म्हटले की त्याच दिवशी महिलांची आठवण सगळ्यांना येते. का आपलेला असे वाटते, आणि मग रोज संकटाशी दोन हात करणारी प्रत्येक स्त्री कुणालाच दिसत नाही का? आपण घरामध्ये रोज तिच्यावर रुबाब गाजवतो स्त्री एक स्त्रीच आहे ना! याचा विचार कोणी केलाय का? अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिच्यावरच आपण अवलंबून असतो. तरीही तीची कधी काळजी करावं, असं कुणालाच वाटत नाही. आपल्यासोबत राहणाऱ्या मोबाइलची आपण किती काळजी घेतो, वेळेवर चार्जिंग करतो, फुटणार नाही, याची काळजी घेतो, मग सतत तुमची काळजी करणारी तुमची आई, बहीण, बायको हिच्याविषयी कधी तुम्ही विचार केलाय का? तिचं पूर्ण आयुष्य घरातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेता-घेता निघून जाते, कधी तिचीही काळजी केली पाहिजे असं कधी कोणाला वाटतं का?

हल्ली मुलाचं वागणं आईशी जरा रूबाब केल्यासारखं वाटतं. ती तुमची नोकरानी आहे का? हा विचार आपण केला पाहिजे. सगळेच असे असतात असे नाही काही मुलं मुली खरोखरच आईशी अगदी प्रेमाने वागतात. तिला छोट्या मोठ्या कामांमध्ये मदत करतात. घरचे इतर व्यक्ती सुध्दा बऱ्यापैकी वागतात. पण सगळ्यांचेच मुलं किंवा मुली अशा नसतात. काही ठिकाणी तर स्त्री म्हणजे एक मशिनच असते सगळी कामे वेळेवर झालीच पाहिजे, चांगलीच झाली पाहिजे. मग ती थकलली जरी असली तरी तिचा कुणी विचार करत नाही. हा प्रश्न मनात नेहमी असतो की तिलाच का सगळं सहन करावं लागतं. तीला मन भावना नाहीत का? बाहेर जगात डोकावून बघितल्यानंतर, खूप स्त्रियांच्या दुःखद गोष्टी डोळ्यांसमोर येतात. मनात अनेक प्रश्नांचा कल्लोळ सुरू होतो. याला कारणीभूत कोण? ह्याच प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. मी म्हणत नाही की, पुरूषांना काहीच त्रास नसतो, किंवा टेंशन नसतं. पण हे त्यांनाही मान्य करावच लागेल की, एक स्त्रीचं जगणं, एकटं जगणं खुप कठीण असतं.

काही दिवसांपूर्वी एका स्त्रीशी माझी भेट झाली नाव नाही सांगणार पण सत्य आहे. कमी वयात लग्न झाले त्यामूळे शिक्षणही पूर्ण झालेले नव्हते. नवरा तसा सरकारी नौकरीला होता. पण त्याला दारुचे व्यसन असल्यामुळे तो तीला सतत त्रास देत असत. त्यात तिला जुळी मुलं झाली. तरी नवऱ्याचा त्रास सुरूच त्यानंतर पुन्हा मुलगीच पाहिजे म्हणून परत मुलगाच झाला. कमी वयात तीन मुलं सांभाळायची आणि पतीचाही त्रास सहन करायचा अशातच तीने शिक्षण सुरू ठेवले. परंतु पतीचा छळ कमी होत नव्हता. त्यामुळे तीने वेगळे राहायचे ठरविले. आणि तीन मुलांना घेऊन ती वेगळी राहू लागली. आणि इथेच सर्व संपत का नाही. किती भयंकर परिस्थिती आहे ही. असे कित्येक स्त्रियांची उदाहरणे आजूबाजूच्या परिसरामध्ये बघायला मिळतात. एक स्त्री  म्हणून जबाबदारी पार पाडणं म्हणजे काचेचा हंडा डोक्यावर घेऊन दोरीवर चालण्याची कसरत आहे. यावर समाजाच्या प्रतिक्रिया अशा असतात. हीच चांगली नसेल, हिला बाहेरचा नाद असेल. नवरा सोडून राहते शहाणीच आहे. आणखी खूप काही...

त्या सगळ्या गोष्टी एकट्या स्त्रीलाच सहन कराव्या लागतात. एखाद्याची पत्नी गेली तर त्याला दुसरं लग्न करण्याची परवानगी समाज देतो, कारण त्याला जेवन घालायला कुणी नाही. मुलांना कोण सांभाळणार आणि म्हणून पुरुष दूसरे लग्न करतात. मला याचाही विरोध नाही, कारण एकटं पूर्ण आयुष्यभर जगणं एवढं सोप देखील नाही. पण अनेक स्त्रीयां असे करत नाही. असे मला वाटते.

मुलांना आपली जबाबदारी समजून त्या पूर्ण आयुष्यभर सर्व सुखाचा त्याग करून जीवन जगतात. आणि ज्या लग्न करतात त्यांनाही योग्य वागणूक दिली जात नाही.  किंवा आदर मिळत नाही. एक विधवा स्त्रीचे मुल लहान जरी असेल एकच जरी असेल तरीही दुसरे लग्न करण्याचा विचार करत नाही. आणि एकट्या निराधार स्त्रीचे जीवन जंगलातील एखाद्या वेलीप्रमाणे असते समाजात अशा कितीतरी स्त्रीया असतात. ज्यांना आपल्या पतीकडून खूप त्रास सहन करावा लागतो, तरीही त्या सहन करतात. पण त्याला सोडत नाही. एखाद्यावर्षी महिला दिनानिमित्त अशा पिडीत महिलांना एकत्र करून त्यांची कहानी ऐकून त्यांचं मन मोकळं करता यावं असा काहीतरी कार्यक्रम ठेवला पाहिजे, नुसत्या महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन होणार नाही. महिलांसाठी खास कराटे क्लासेस. काही सकारात्मक गोष्टीचे व्याख्यान देऊन मनाने खचलेल्या स्त्रियांना धीट बनवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. नवरा सोडला यामागचे कारण न विचारता त्या स्त्रीला विनाकारणच काहीतरी अपशब्द बोलण्याअगोदर तीच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुमच्यामार्फत ती तीच्या मनावर आलेल दडपन कमी करू शकेल. तीचा निर्णय जर योग्य असेल तर तीची पाठ थपथपायला विसरू नका. कारण स्वतंत्र जगण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना  आहे. मग दुसऱ्यांच्या दबावाखाली (समाजाच्या) राहून जगणं कोणालाच आवडणार नाही. मग एका स्त्रीने जर स्वतंत्र रहाण्याचा निर्णय घेतला तर त्यात वाईट काय?

उडत रहा, भिडत रहा!
कठीण परिस्थितीशी 
कधीतरी किनारा मिळेल
तू दिलेल्या हार्त हाकेला

manisha-maher

सौ. मनीषा संदिप बैनाडे-महेर, 
परसोडा, ता. वैजापूर