हल्ली नात्यातील ओलावा कमी होत आहे. आता फक्त स्वार्थ, पैसा व सुंदरता याच गोष्टी नात्यामध्ये महत्वाच्या आहेत. भाव भावना केव्हाच मरण पावल्या आहे. असे कुठतरी वाटायला लागले आहे. बाप आणि मुलगी, अशा पवित्र नात्यातही धोका दिला जातो. ही कुठतरी समाजाला विचार करायला लावणारी बाब आहे. जो मनापासून नातं जपतो, तो फक्त जपत असतो. आणि ज्याने नात्याचा बाजार मांडला, तो नात्याचा खेळ केल्याशिवाय राहत नाही.
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात चिखली तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेले धुसरगाव छोटेसे गाव. या गावात एक शिस्तप्रिय परिवार राहत असे. त्या परिवारात पाच मुली व एक मुलगा होता. या मुलींचे वडील सैन्यात होते. पाच मुली व एक मुलगा आपल्या आईसोबत गावी राहत असे. मुलींचे वडील सुट्यांमध्ये घरी यायचे. तेव्हा कुटूंबात आनंद दरवळायचा. त्यांनी अत्यंत हालाकिच्या परिस्थितीत बारा एकर शेती घेतली होती.
मुली उपवर झाल्या होत्या. म्हणून मोठ्या बहीणीचे लग्न झाले. आता चार बहीणी व एक भाऊ होता. वडील सैन्यात असल्यामुळे मोठ्या दोन मुलींना जास्त शिक्षण घेता आले नाही. मुलगा छोटा होता. त्यामुळे आई काय काय बघेल हा प्रश्नच होता. म्हणून मोठ्या दोन बहीणीचे चौथीपर्यंत शिक्षण होऊन नंतर बंद पडले. मोठीचे नाव उषा तिचे लग्न झाले. नंतर दोन नंबरची आशा तिच्या लग्नाचा विचार सुरू झाला. आशाच्या वडीलाने तिला आत्याच्या घरी द्यायचे ठरविले. आत्याचा मुलगा अभियंता होता. त्यामुळे तो मामासोबत (आशाच्या काकासोबत) काम बघायचा. त्याची घरची परिस्थिती हलाकिची होती. त्याची शेतीही गहान पडलेली होती. म्हणून आशाच्या आत्याला वाटलं. आशा जर आपली सून झाली तर हुंडा मिळेल, आणि आपली शेती पण सोडवून घेता येईल. आशाचे लग्न ठरले. त्याबदल्यात आशाच्या वडीलांनी त्यांची गहान पडलेली शेती सोडवून दिली. मग आशाचा व आत्याचा मुलगा रमेश यांचा विवाह थाटामाटात पार पडला. त्यांचे वैवाहिक जीवन सुरू झाले.
रमेश मामाच्या साईटवर काम बघत असल्यामुळे तो लोणार या ठिकाणी राहत होता. आशा आपल्या सासरी सासू सासरे, नंदा, दीर यांचासोबत राहत होती. असे चालू असतांना लोणार येथे रमेशच्या बाजूला सुनंदा नावाची नर्स राहत होती. सुनंदा विवाहीत होती. ती आपल्या आजीला घेऊन राहत होती. सुनंदा व रमेश रहायला जवळजवळ असल्यामुळे त्यांचे बोलणे चालणे वाढले. हळूहळू खानपान देखील सोबत व्हायला लागले. या सगळ्यात रमेश व सुनंदाचे प्रेम जुळले. दोघही जणू विसरून गेले की आपण विवाहीत आहोत. रमेश आशाला अधूनमधून भेटायला यायचा. याच कालावधीत आशा गरोदर राहिली.
इकडे मात्र रमेश आणि सुनंदाचे नाते वाढतच चालले होते. आशाला या गोष्टीची काहीही खबर नव्हती. इकडे मात्र रमेश आणि सुनंदाने लग्न करायचे ठरवले. आशा गरोदर असतांना रमेशने असा विचार का केला असेल देव जाणे. सुनंदा आणि रमेश लग्न करणार ही बातमी आशाच्या कानावर पडली, तेव्हा आशाच्या पायाखालची जमीनच सरकली, ती खुप खचली. तरीही रमेशचा परिवार सुनंदाला घरी आणण्यासाठी त्याला मदत करत होता. रमेशची आई हे विसरून गेली की, आशा आपल्याच भावाची मुलगी आहे. रमेशच्या मामाची मुलगी आहे. रक्ताच्या नात्यातील मुलगी आहे. रमेश सगळं विसरला होता. आशाला पाचवा महिना सुरू झाला होता. रमेश आशाला मारहाण करायचा, माहेरहून पैसे आण म्हणायला पण आशा माहेरी जाण्यास स्पष्टपणे नकार द्यायची.
एक दिवस रमेश आशाचा गर्भपात करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी सांगितले पाचवा महिना सुरू असल्यामुळे खर्च खुप जास्त येईल. रमेशजवळ इतका पैसा नव्हता, त्यामुळे तो हाॅस्पिटलच्या बाहेर आला. त्यावेळी आशाची मनस्थिती कशी असेल हे फक्त परमेश्वरालाच माहीत. घरी आल्यानंतर आशाच्या छोट्या नंदेने आशाचे कपडे एका पिशवीत भरले, आणि रमेशने आशाला उलट्या पावलाने माहेरी म्हणजे मामाच्या घरी आणून सोडले. आशाने रमेशला खुप विनंत्या केल्या, कळकळीने समजावले पण रमेश आशाच्या भावना समजू शकला नाही. किंवा पोटातील बाळाची देखील कीव त्याला आली नाही. रमेश आल्या पावलाने निघून गेला.
आशाचे वडील तीला म्हणाले, तू जशी आली तशी निघून जा. एखाद्या विहिरीत जीव दे. आता बिचारी आशा कासावीस झाली. तीची दुनियाच संपली होती. त्यामुळे ती जीव देण्यासाठी बाहेर पडली, तोच आशाची काकू तिच्यामागे धावत पळत जाऊन तिचा जीव वाचविला. आशाला परत घरी आणले. आशाचे वडील सेवानिवृत्त सैनिक असल्यामुळे त्यांचा स्वभाव कडक होता. त्यांना नातेवाईकांनी व काकूंनी शांत केले. त्या म्हटल्या यात बिचाऱ्या आशाची काय चुक आपण रमेशसोबत बोलूया. आशाचे वडील रमेशला बोलले. तू आशाला ही सांभाळ आणि सुनंदालाही सांभाळ माझी काहीच हरकत नाही. फक्त माझ्या आशाला सोडू नको. पण रमेश हे मान्य करायला तयारच नव्हता. आता मात्र आशाला आयुष्यात कोणतीच आशा उरली नव्हती. पोटात पाच महिन्याचे बाळ. तीने आता काय करावे? अनेक वेळा आशाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण देवाने नशीबात काय लिहून ठेवले होते काय माहीत, तीचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.
आशा वडीलांच्या शेतात शेतीकाम करू लागली. मनात वनवा पेटला होता. पोटात गोळा फिरत होता. जगणं ही सोपं नव्हतं आणि मरणं ही सोपं नव्हतं. असं करत करत नऊ महिने पूर्ण झाले. आता परत एकदा आशाची निराशा झाली. तिच्या पोटी मुलगी जन्माला आली. आशाच्या वडिलांना मनस्ताप झाला. जावई मुलीला सोडून गेला आणि तिच्या पोटी परत कारटीच झाली. त्या निष्पाप कारटीचा जन्माला आल्यामुळे काय दोष? हे कोणीच समजून घेत नव्हते. त्या बाळाचा जन्मापासूनच कंठाला सुरू झाला. बाळंतपणात आशाची प्रकृती खुपच खालावली होती. आशा आणि बाळ मरेल असेच सर्वांना वाटतं होते. पण देवाने इतक्या सहजासहजी नशीबात मरण लिहलं नव्हतं.
मुलगी मोठी होऊ लागली. तीचे नाव पूजा ठेवण्यात आले. तरिही बाप तिचे तोंड पाहायला देखील आला नाही. तो सुनंदाला घरी घेऊन गेला, आणि तिच्यातच रमला. शेतात काबाडकष्ट करून, मोलमजूरी करून आशा पूजाचा आजोळी सांभाळ करू लागली.
आशाने रमेशकडे तिचा हक्क मागितला, ती आपलेला आणि मुलीला न्याय मिळावा म्हणून न्यायालयात गेली. पण हातात निराशाच उरली, आज बघता बघता पूजा पंचवीस वर्षाची झाली. आणि पूजाची मुलगी श्रेया सहा वर्षाची झाली. रमेशने पंचवीस वर्षात पूजाला व आशाला भेटण्याचा साधा प्रयत्न देखील केला नाही. पूजाच्या लग्नात कन्यादान करायला देखील रमेश आला नाही. बाप असूनही पूजा विनाबापाची राहिली. आशाने आपले संपूर्ण तरूणपण आपल्या मुलीकडे बघून काढले.
या पंचवीस वर्षात आशाचा न्याय, ना न्यायालयाने केला, ना नातेवाईकांनी केला, ना रमेशने केला. रमेश सध्या सरकारी बांधकाम व्यावसायिक आहे. त्याला आणि सुनंदाला तीन अपत्ये देखील आहे. पण आशाची काहीही चुक नसतांना आशाला व तीच्या मुलीच्या वाट्याला दुःख आले. मग खरच वाटायला लागते काळ सोकावतोय.
संजिवनी इंगळे, औरंगाबाद