आज सहजच मनात विचार झाला, की, मनातल्या प्रश्नांना जरा फिरवून आणा आणि जो प्रश्न माझ्या मनात होता तो अनेकांच्या मनात असेलच असे वाटलं. कारण मी एक 'स्त्री' आहे. स्त्री कोणतीही असो ही अगदी मोठ्या पदावर अधिकारी असो. पोलिस, कलेक्टर, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका व साधी गृहिणी सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न असतो. तो म्हणजे मी कधी थोडीशी रिलॅक्स होईल, कधी एकदाचा, मोकळा श्वास घेईल. ही वेळ तिच्या जीवनात कधीच येत नाही. ही स्त्रीच्या आयुष्यातील मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
तिचा दिवस सुरू होतो तो, सगळ्यांच्या झोपीतून उठण्याअगोदर आणि रात्र सगळ्यांच्या झोपल्यानंतर सकाळी उठल्यापासून अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. मग ती नोकरीसाठी बाहेर जाणारी असो किंवा घरी राहणारी असो, जशी ती सगळ्यांसाठी नोकरदारीणच असते. रुमाल सापडला नाही की बोलणे खावे लागतात. शर्ट सापडला नाही तरी बोलणेच, अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी रोजच काहीतरी ऐकायला मिळते, तरीही तीला राग येत नाही. कसा येईल कारण तीचे सर्वच प्रिय व्यक्ती असतात. फक्त तिच्या भावना, मन, विचारांचा कोणीच आदर करत नसतं. याचे खरच एक स्त्री म्हणून वाईट वाटते.
सतत काम करूनही काय मिळते, फक्त सगळ्यांचे बोलणे, रुसवा याव्यतिरिक्त काहीच नाही. कधी-कधी शरीरासारखे मन ही थकून जाते, आणि वाटते, खरच आपलं आयुष्य कसं आहे. आयुष्यभर त्या घरातल्या कामाबाबत दोन हात केलेले असून सुद्धा शेवटी प्रत्येक गोष्टीसाठी स्त्रीलाच जबाबदार ठरवले जाते.
मुलांना कमी मार्क्स आले तर तुच लक्ष दिल नसेल म्हणून कमी मार्क्स मिळाले. घरात स्वच्छता दिसली नाही की काय बाई आहे. असे उद्गार तोंडातून लगेच निघतात. सासू सासऱ्यांना जीव लावत नाही. सारखी माहेरी जाते. मुलांकडे लक्ष देत नाही. पतीला काही समजत नाही. असे अनेक आरोप तीच्यावर होतात.
या सगळ्यांमध्ये एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीविषयी अनेक विषयांवरती टोचून बोलत असते. जर आपण स्त्रीयांनीच एकमेकींचा आदर करण्याचे ठरवले तर हा प्रश्नच निर्माण होणार नाही. समाजाकडून स्त्रियांना नेहमीच विरोध झालेला दिसतो. सावित्रीबाई फुलेंना देखील शिक्षणासाठी किती त्रास सहन केला. अक्षर: शेणाचे गोळे सुद्धा अलगद झेलून घेतले. म्हणून आज हे शब्द या पानावर उतरु शकले.
अशीच एक 'सावित्री' पुन्हा 'सिंधू'च्या रूपात जन्माला आली. फक्त एकाच शब्दामुळे अनाथ झाली. स्त्रीयांना त्या परमेश्वराने इतके सहनशील, मजबूत, सर्वसमावेशक बनवले, पण एका गोष्टीमुळे तीला बांधून पण ठेवले गेले. त्याला माहित आहे. हिच्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद आहे, ही काहीही करू शकते. म्हणून मर्याद्याचे साखळदंड स्त्रीयांच्या पायात बांधून दिले. अब्रू इज्जत त्याचे नाव. माईच्याविषयी असा एकच शब्द त्या पाप्याने माईच्या पतीला सांगितला. हिच्या गर्भातील बाळ तुझं नसून माझं आहे. आणि त्याच क्षणाला माई अनाथ झाल्या. सगळ्यांच्या गोष्टीवर बोलण्यावरती विचार केला जातो, पण आजही आपण बघतो. एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर जर कोणी शिंतोडा उडवला तर त्याला पुसण्याचा प्रयत्न केला जात नाही. पूर्णपणे तिला चिखलात ढकलून दिले जाते. कोर्टात सुद्धा न्याय देताना न्यायाधीश अनेक पुराव्याचा आधार घेऊन न्याय देतात. परंतू स्वत:चा पती एक क्षणाचाही विचार न करता त्या स्त्रीला पायाखाची तुडवतो. आणि मरण्यासाठी जनावरांच्या गोठ्यात नेऊन सोडतो. आणि जनावरे मोकळे करून देतो, पण चिखलात कमळाचा जन्म होतो, म्हणतात ना. म्हणून एका नवीन सिंधू आईचा जन्म होतो. सिंधूआई अनाथ असूनही लाखो अनाथांची आई बनते.
अशा महान स्त्रीयांना देखील किती संघर्ष करावा लागला. आपण तर सर्वसाधारण आहोत. आपलेला प्रत्येक पावलावर संघर्ष करावा लागतो. काहीतरी करावसं वाटलं तरी तू सर्व जबादाऱ्या पार पाडून ते करावे लागते. पण संघर्षातूनच नवनर्मिती होते, हे ही तितकेच सत्य आहे. स्त्रीयांशिवाय काहीही होऊ शकत नाही. पण सहनही त्यांनाच करावं लागतं. आज सहज मनात आले म्हणून हा लेखनप्रपंच. कित्येक स्त्रिया संघर्ष करून पूढे खूप मोठं स्वतःच अस्तित्व निर्माण करतात. त्यांच्या सहकार्यासाठी जरी कोणी मागे उभे असेल तरीही अनेक जबाबदाऱ्या सुद्धा तिलाच पार पाडाव्या लागतात. हे ही तितकेच सत्य आहे.
ओसंडून वाहणारी नदी प्रवाहासोबत झाडांची फुले-फळे आणि कचरासुद्धा सोबत वाहून नेते, तो कुणाला बाजूला करत नाही. तसेच स्त्रीचे जीवन आहे. सगळ्यांना घेऊन चालण्यातच तीचे स्त्रीत्व सामावलेले आहे. त्याशिवाय तीला शोभा येत नाही. ते ती करत आहेत आणि ते ती करतच आलेली आहे तीला हे सर्व करत असताना अग्नीच्या दिव्यातून जावे लागले, तरीही ती विचार करत नाही. म्हणूनच कदाचित संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणाले असतील, 'सोन्याला सोनेत्व प्राप्त करण्यासाठी अग्नितून जावं लागत.' स्वतःच्या त्यागाची मूर्ती ही आई, बहीण, मुलगी, पत्नी या सगळ्या रुपांमधून झळकत असते. म्हणून 'स्त्री' ही 'स्त्रीच' असते.
सौ. मनीषा संदिप बैनाडे-महेर,
परसोडा, ता. वैजापूर