मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात आईने व भावाने मुलीचे मुंडके छाटले. आतंरजातीय प्रेमविवाहामुळे अशा घटना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या आपण बघतो. परंतु वैजापूरची घटना ही तर दोघंही एकाच उच्च जातीचे होते. मग प्रेमविवाहाला अडचण काय होती? तर अडचण म्हणजे समाजात असलेली आपली प्रतिष्ठा. या प्रतिष्ठेपायी आईने नऊ महिने उदरात वाढविलेल्या आणि भावाच्या मनगटावर राखी बांधणाऱ्या भावाने व जन्मदात्या आईने आपल्याच मुलीचे निर्दयीपणे मुंडकं छाटून हत्या केली. त्यामुळे माझ्या ओठांवर आपोआपच दोन ओळी आल्या त्या म्हणजे,
फार भीती वाटते आता
आपल्याच प्रियजनांची
खोट्या प्रतिष्ठेची कुऱ्हाड
केव्हा आपल्या मानेवर पडेल
अजिबात शाश्वती नाही त्याची
आपल्या रक्ताची, आपल्या प्रेमाची किंमत इतकी कमी लेखावी की, लोकांचा विचार, खोटी प्रतिष्ठा, खोटा मोठेपणा यासाठी आपल्याच पोटच्या गोळ्याची हत्या करावी. हे जेव्हा आपण पाहतो, ऐकतो तेव्हा कळते की, नात्याची किंमत किती कमी झालेली आहे.
अशीच एक वेदनादायी कहाणी अंजली नावाच्या तरूणीची देखील आहे. एका खेडेगावात अंजली नावाची मुलगी तिच्या आईसोबत राहत होती. अंजलीला वडील व भाऊ नाही. त्यामुळे त्या दोघी मायलेकी राहत होत्या. तशी त्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. आई लोकांच्या शेतात मजूरी करून आपला आणि लेकीचा उदरनिर्वाह व शिक्षण करत असे. अशा हलाकिच्या परिस्थितीत अंजलीचे बारावीपर्यंतचे शिक्षण आईने चांगल्या विद्यालयातून पूर्ण केले. बारावीचे शिक्षण सुरू असतांनाच अंजलीच्या मामाने तीचे लग्न करायचे सुचविले. आईदेखील अंजलीचे लग्न करायला तयार झाली. अंजलीला पाहायला पाहुणे आले. पाहुण्यांना अंजली आवडली. अंजलीचे वय तसे कमीच होते. त्यामुळे तिला माणसं पारखण्याची कला अवगत नव्हती. त्यामुळे ती मामाच्या निर्णयावर ठाम होती. अशाप्रकारे अंजलीचे लग्न जमले. आणि पुढील चार महिन्यात मामाने आणि आईने अंजलीचे लग्न लावून दिले. अंजलीच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली.
पुढील एका वर्षांच्या काळात अंजलीचा नवरा व्यसनी आहे. हे तीला कळाल्यानंतर तीने त्याच्या व्यसनाला खूप विरोध केला. पण तीच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. घरचे सगळे तीलाच गप्प करण्याचा प्रयत्न करत असत. सहा वर्षे निघून गेले पण अंजलीच्या नवऱ्याची सवय कमी होण्याऐवजी वाढतच गेली. अंजलीच्या आईला मुलीचे हाल पाहवेना, अंजलीला बऱ्याच वेळा आत्महत्या करण्याचा विचार मनात आला. पण काय करणार ती बिचारी तीच्या संसारवेलीवर मुलीच्या रूपाने एक सुंदर असे फुल उमलले होते.
अंजली आईला खुप वेळा बोलली. मी त्या घरात राहत नाही. पण आईने व नातेवाईकांनी तीला समजावलं. आपल्यामागे कोणी नाही. जे झालं ते सर्व तुझ्या नशीबाचे दोष समजून तू संसार कर. असं म्हणून सर्वांनी विषय टाळला. अंजलीची समजूत काढून तीची पाठवणी करायचे. पण अंजली मात्र खुप त्रस्त झाली होती.
अंजलीला घरून कोणीच पाठींबा देत नव्हते. समाजाचा धाक दाखवून लोक काय बोलतील याचा विचार कर. असं बोलून तीला गप्प केलं जायचं. घरून पाठींबा नसल्यामुळे अंजली बिचारी व्याकुळ झाली होती. सर्व काही असूनदेखील अंजली स्वतःला एकटी समजू लागली. फक्त कर्तव्य म्हणून ती जीवन जगू लागली. समाजात अनेक अंजली फक्त कर्तव्य म्हणून जीवन जगत आहेत. जीवनात ना कुठला रस आहे. ना कुठला रंग. फक्त जगायचं म्हणून जगायचं, अशा अनेक अंजली पाऊलोपावली आपलेला बघायला मिळतात.
समाजाची खोटी प्रतिष्ठा, खोटा मोठेपणा, खोटा बडेजाव, रीतिरिवाज हे आईवडीलांना, नातेवाईकांना महत्वाचा वाटतो. त्यामुळे आज मुलगी कुठच सुरक्षित दिसत नाही. ना आईवडीलांच्या घरी, ना सासरी, ना नोकरीच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तीला दुसऱ्याच्या स्वप्नासाठी जगावं लागतं. तीचे स्वप्न, इच्छा, भावना सर्व पणाला लावावं लागतं. प्रत्येकवेळी तिलाच अग्नीपरिक्षा द्यावी लागते. ही समाजाची मोठी शोकांतिका आहे.
संजिवनी इंगळे, औरंगाबाद