स्री अजूनही उपेक्षित का...?

आजची स्री पुरूषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करत आहे. अगदी गावच्या गल्लीपासून तर विश्वपातळीवर अंतराळापर्यत तीने घेतलेली झेप तिच्या स्व:त्वाची प्रचिती देते. तरी आजही तिची अवहेलना होत आहे.

स्री अजूनही उपेक्षित का...?

८ मार्च हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. स्रियांप्रती आदर, प्रेम व स्नेहाची भावना दाखवणारा हा दिवस. ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये वस्रोद्योगातील हजारो स्री कामगारांनी दहा तासांचा दिवस व कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्यांसाठी न्यूयॉर्कमधील रूटगर्स चौकात जमून, प्रचंड मोठे ऐतिहासिक आंदोलन केले. अमेरिकन कामगार स्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाल्या. त्यांनी १९०९ साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी स्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या सन्मानार्थ ८ मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून स्विकारावा असा ठराव क्लाराने मांडला व तो पास झाला. तेव्हापासून ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.  भारतात मुंबईमध्ये पहिला महिला दिन ८ मार्च १९४३ साली साजरा करण्यात आला.

आदिशक्ती तू
प्रभूची भक्ती तू
मावळ्यांची भवानी तू
क्रांतीज्योती तू
कर्तुत्वशालिनी तू
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू
आजच्या युगाची प्रगती तू... 

भारतीय संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून स्री वंदनीय आहे. स्रीला देवी, माता, जीवनदायी... म्हणून पुजले जाते. उपनिषदांमध्ये अर्धनारी नटेश्वराच्या रूपात तिला पुजले आहे. सती युगात मैत्रेयी, गार्गीसारख्या स्रीयांचे तत्वज्ञान अतिशय प्रखर आणि प्रभावी मानले जायचे. त्यांना मानाचे स्थान होते. त्यात दक्षिण भारत म्हणजे संतांची भूमी. मुक्ताबाई, जनाबाई, सखुबाई, कान्होपात्रा , बहिणाबाई आदी स्री संत होवून गेल्या. त्यांनी आपल्या भजन, अभंग, ओवी, किर्तनांमधून भक्तिमार्गाचा प्रचार व प्रसार केला. एक स्री साहित्यनिर्मिती करू शकते हे त्यांनी त्या काळात दाखवून दिले व आपल्या कार्याची महती जनमनात रुजवली. 

स्वराज्य प्रेरिका जिजामाता, झांशीची राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई, अहिल्याबाई होळकर, महाराणी ताराबाई... आदी वीरांगनांनी धैर्य व शौर्याच्या बळावर आपल्या कर्तुत्वाचा ठसा इतिहासात युगानयुगासाठी कोरून ठेवला. वर्तमानकाळातील क्रांतीकारी घटना जेव्हा भुतकाळाला प्रेरणादायी करतात, तेव्हा इतिहास घडतो. अशा स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात तीने जीवन वाहिले. एक स्री समाजासाठी आणि राष्ट्रासाठी अतिशय धैर्याने कसा त्याग करू शकते. याचे चित्रण स्वातंत्र्य लढ्यातील महिलांच्या सहभागातून व त्यागातून दिसून येते. पुराणकाळामध्ये स्रीयांना मानाचे स्थान होते. बौद्ध काळातही स्रीयांना समान अधिकार होते. मात्र त्यानंतर मध्ययुग आले. हा काळ स्रीयांसाठी अतिशय कठीण काळ होता. त्या काळात सतीप्रथा, बालविवाह, राजस्थानमध्ये जौहर नंतर मुघल साम्राज्यात पडदा पध्दत अशा विविध प्रथा-परंपरा व अनिष्ट रूढींच्या माध्यमातून स्रीयांवर बंधने लादण्यात आली. आजही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ही बंधने समाजात जीवंत आहेत. 
         
स्रीच्या औदार्याने अवघं आयुष्य सुंदर होते. एक स्री शिकली तर संपूर्ण पिढी सुशिक्षित होते. ती आई, बहीण, पत्नी, मुलगी, आजी, मैत्रीण अशा विविध रूपांमध्ये एक प्रेरक- मार्गदर्शक म्हणून सर्वांगसुंदर असते. आजची स्री पुरूषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करत आहे. अगदी गावच्या गल्लीपासून तर विश्वपातळीवर अंतराळापर्यत तीने घेतलेली झेप तिच्या स्व:त्वाची प्रचिती देते. तरी आजही तिची अवहेलना होत आहे. समाज अजूनही तिचं पुर्णत्व मान्य करत नाही. पुरूषांची प्रतिस्पर्धी म्हणून नाही. तर तिचंही एक स्वतंत्र मत आहे. तिही एक व्यक्ती आहे. म्हणून ती तिच्या मर्यादेत राहून, स्वत:ला सिद्ध करित आहे. तेव्हा तिच्या गुणांना प्रोत्साहन देवून, तिचं अस्तित्व मान्य करणं गरजेचं आहे. आजही स्रीच्या जन्माआधी तिचा नकारात्मक विचार केला जातो. स्री अर्भक असेल तर आजही स्री भ्रूणहत्येसारखे पातक समाजात घडत आहेत. स्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्रीशिक्षणासाठी संघर्ष केला व आयुष्य वेचले त्या सावित्रीच्या लेकींना अजुनही उच्च शिक्षणासाठी मर्यादा येतात. अनेक उच्चशिक्षित तरूणी अडचणींचे स्पीडब्रेकर्स ओलांडत आपले शिक्षण पूर्ण करतात. घरात स्री आणि पुरूष दोघेही शिक्षित तथा कमावते असतात तरीही स्रीचं मत फारसं विचारात घेतले जात नाही. 

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतामध्ये ग्रामीण भागातील ७५% टक्के महिला कृषी क्षेत्रामध्ये काम करतात. परंतु केवळ १२% च स्रियांकडे त्यांच्या मालकीची शेतजमीन आहे. स्री शेतामध्ये राबते, कष्टते, नवं कल्पना, नवनिर्मित योजना आखते. मग तिच्याकडे शेतीचा मालकी हक्क का नाही? आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगामध्ये ती शिकली, तीला कायद्याने सर्व अधिकार व हक्क मिळाले म्हणजे तिची प्रगती झाली असं जर समाज समजत असेल तर ते पूर्णतः चूकीचे आहे.आजही स्रीला अबला समजून लैगिक शोषण, बलात्कारासारख्या घटना घडत आहेत. मीटूसारखी चळवळ स्रीयांना उभी करावी लागते. जोपर्यंत स्रीला एक परिपूर्ण व्यक्तीमत्व म्हणून स्विकारत नाही. तिचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करत नाही. तिच्या मतांचा, भावनेचा आदर होत नाही. तोपर्यंत स्री उपेक्षितच राहील. हे जर बदलायचे असेल... समाजात समानता आणायची असेल तर स्रीला समसमान माणून तिच्या अस्तित्वाचा व पूर्णत्वाचा स्विकार करण्याची मानसिकता आधी तयार करावी लागेल. स्री सबलीकरणाच्या अनेक योजना राबविल्या गेल्या व राबविण्यात येतात. मात्र समाजातील स्री अवहेलना अजूनही संपलेली नाही. युगानुयुगाचा काळ लोटला. यश-अपयशाची अनेक स्थित्यंतरे या समाजाने बघितली. स्री क्षमतांची, त्याग व समर्पणाची, योगदानाची, स्री इतिहासाची जाण समाजाला असूनही स्री अजूनही उपेक्षित का..? प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

asha-kove-gedam

सौ. आशा कोवे-गेडाम,
वणी, जि. यवतमाळ