महिला दिनाच्या शुभेच्छा देताना

प्रत्येक वर्षी एका विशेष थीम सोबत 8 मार्च हा दिवस संपूर्ण विश्वात महिला दिवस म्हणून साजरा केला जातो.

महिला दिनाच्या शुभेच्छा देताना

28 फरवरी 1908 एकाच वेळी पंधरा हजार महिला कामगारांनी स्त्री पुरुष वेतन समानतेसाठी तसेच स्वतःच्या हक्काकरिता अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात पहिल्या वेळेस आंदोलन केले आणि त्याचाच परिणाम अमेरिकेतील सरकारला कामगार स्त्रियांच्या मागण्या स्वीकाराव्या लागल्या. आणि त्यानंतर 8मार्च 1910 पासून महिलांच्या सन्मानासाठी प्रत्येक वर्षी महिला दिवस साजरा केला जाईल असे  घोषित करण्यात आले. अशा पद्धतीने सुरू झालेले हे महिला दिवस प्रत्येक वर्षी एका विशेष थीम सोबत संपूर्ण विश्वात साजरा करावा याची  1975 रोजी संयुक्त राष्ट्राने संमती दिल्यानंतर प्रत्येक वर्षी एका विशेष थीम सोबत 8 मार्च हा दिवस संपूर्ण विश्वात महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. 2024 महिला दिनाची थीम आहे inspire inclusion म्हणजेच सर्व क्षेत्रांमध्ये महिलांच्या समावेशास प्रेरणा देणे.

जागतिक स्तरावर महिला दिनाच्या इतक्या सर्व तयारी होत असताना आजही आपल्याकडे अनेक खेड्या गावांमध्ये तसेच शहरांमध्ये देखील हजारो वर्षांपासून जी पुरुषप्रधान संस्कृती चालत आली आहे ती महिलांचे स्वतंत्र स्वीकारण्यास आजही सहज तयार होत नाही.. अनेक ठिकाणी आजही अशा घटना घडतात ज्यामुळे जे चित्र डोळ्यापुढे उभे राहते ते म्हणजे आजही आपल्या हक्कासाठी लढा देणाऱ्या अनेक स्त्रियांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे कित्येक घरात आजही स्त्रियांना दिली जाणारी वागणूक ही पूर्वीपेक्षा वेगळी नाही याचे एक न हजार उदाहरण रोज आपल्यासमोर आपण पहात असतो समाजातील शंभर-दोनशे स्त्रियांना सगळ्या बाबतीत स्वतंत्रता मिळाली आणि त्या शिक्षणाने आर्थिक दृष्टीने तसेच मानसिक दृष्टीने देखील सदृढ झाल्या याचा अर्थ संपूर्ण स्त्रिया देखील ही पुरुषांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्या आहे असा गैरसमज समाजाने अजिबात करून घेऊ नये.

अगदी त्याचप्रमाणे सुशिक्षित झालेल्या स्त्रियांनी देखील आपण आर्थिक दृष्ट्या तसेच शैक्षणिक दृष्टीने परिपूर्ण झालो आहोत आणि तरी देखील आपल्या आसपास राहणाऱ्या स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपल्याच जवळच्या कोणाला आवडत नाही म्हणून एक शब्द  बोलू शकत नसेल तर अशा स्त्रिया देखील सुशिक्षित असून शेवटी गुलामच आहेत. स्त्रियांचे सुशिक्षित होणे म्हणजे तिला तिच्या हक्काबद्दल कळणे आणि ज्या स्त्रीला स्वतःच्या हक्काची स्वतःच्या आत्मसन्मानाची जेव्हा खरी जाणीव होते तेव्हा ती आपल्यासमोर इतर स्त्रियांचा देखील अपमान सहन करू शकत नाही मग ती स्वतः दुसऱ्या स्त्रियांचा अपमान कसे काय करणार म्हणूनच सुशिक्षित स्त्रियांना स्वतःला तोपर्यंत सुशिक्षित म्हणण्याचा अधिकार नाही जोपर्यंत त्या स्वतः समोर त्रास होत असलेल्या स्त्रियांच्या अधिकारासाठी प्रयत्न करणार नाही.बदलत्या काळाबरोबर स्त्रियांवरील होणारे अत्याचार थांबले असून 'आधुनिक स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आनंदाने जगत आहे' ही गोष्टी फक्त भाषणासाठी आणि समाजातील दहा टक्के पेक्षाही कमी स्त्रियांसाठी सत्य असू शकते. 

एक अक्षराची ओळख नसताना जो अन्याय अत्याचार स्त्रियांनी सहन केला तोच अन्याय आजही अनेक ठिकाणी स्त्रियांवरती केला जात आहे. एकीकडे सासर आणि दुसरीकडे माहेर या दोन कुटुंबाच्या मर्यादेचा विचार करत करत आजही हजारो स्त्रिया चार भिंतीच्या आड कितीतरी त्रास सहन करत आहे. उच्चशिक्षित आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः पार पाडणाऱ्या स्त्रियांना देखील अनेक ठिकाणी कुटुंबाची जबाबदारी सर्वप्रथम म्हणून मागे ओढण्याचे अनेक प्रकार आपण रोज पाहत आहोत शांतपणे तिने जर हे मान्य केले तर सगळं व्यवस्थित आहे आणि जिथे कुठे तिने थोडासा नकार दिला तर तिचीही परिस्थिती इतर स्त्रियांपेक्षा वेगळी नाही. कितीही काही झाले तरी प्रत्येक वेळेस मर्यादित राहण्याची अपेक्षा स्त्रियांकडूनच केली जाते.

जन्मापासूनच नदीसारखी मुक्त असलेली स्त्री खऱ्या अर्थाने प्रेमाची आणि वासल्येची मूर्ती असते. ज्याप्रमाणे डोंगरात जन्मलेली नदी आपले सर्वस्व अर्पण करून सागरात विलीन होते आणि स्वतःची ओळख विसरून जाते अगदी त्याचप्रमाणे माहेरात जिचा जन्म होतो आणि आयुष्यभर सर्वांची सेवा करत सासरच्या प्रत्येक माणसांमध्ये माहेरच्या प्रेमाची ऊब शोधत, आपल्या जोडीदाराचा विश्वास आयुष्यभर आपल्यावर राहावा या एकाच अपेक्षेत स्वतःची ओळख विसरते तरी तिला तिच्या हक्काचे प्रेम देखील जर सहजासहजी मिळत नसेल तर  ज्या दिवशी ती आत्मविश्वासाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध करेल ज्या दिवशी तिला तिच्या अधिकाराची खरी ओळख होईल ज्या दिवशी चुकीचे पाऊल न उचलता तिच्यावर अन्याय करणाऱ्या आणि बाहेरच्या लोकांसमोर चांगलेपणाचा मुखवटा मिरवणाऱ्या पुरुषाचा खरा चेहरा समाजापुढे आणण्याचे धाडस एका स्त्रीमध्ये निर्माण होईल. त्यादिवशी आपल्या भारतामध्ये खऱ्या अर्थाने आपण महिला दिवस साजरा केल्याचे सार्थक होईल प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी देखील महिला दिनाच्या शुभेच्छा प्रत्येकाने इतर स्त्रियांना देण्यापूर्वी आपल्या कुटुंबातील स्त्रियांच्या हक्काबद्दल आपण किती जागृत आहोत ह्या गोष्टीचा नक्कीच विचार कराल.

Poonam Sulane

पूनम सुलाने-सिंगल