आताशा मला प्रेमकाव्य
मनातून स्फुरत नाही
कारण सखे त्यात तू कुठच
उगवताना दिसत नाही...
पहिला पाऊस आता
हवाहवासा वाटत नाही
कारण त्याचा मृदगंध
श्वासात माझ्या शिरत नाही
रिमझिमणारा पाऊसही सखे
मन माझे भिजवीत नाही
कारण पावसात मनसोक्त
भिजताना तू दिसत नाही...
झुळझुळणार्या वार्याचा
आवाज कानी येत नाही
कारण तूझ्या असण्याची
चाहूल मज लागत नाही...
उमलणारी असंख्य फुले
सुगंध मला देत नाही
कारण तुझ्या अस्तित्वाचा
गंध त्यात मिसळत नाही
रात्री आकाशात चंद्र तारे
मी आवर्जून पाहत नाही
कारण त्या चंद्रात तुझा
चेहरा मला दिसत नाही...
आठवात तुला शोधतांना
पापणी कोरडी राहत नाही
कितीही प्रयत्न केला तरी
तुझ्यावाचून मी काहीच उरत नाही...
काहीच उरत नाही...
सौ. जयश्री अविनाश जगताप
सातारा