आज प्रत्येकाला वाटतं आपलेला जे येतं, ते इतरांना येऊ नये. प्रत्येक माणूस आपल्या क्षेत्रात आपल्यापेक्षा पुढे कोणीच जाऊ नये, याची पूर्णपणे खबरदारी घेत असतो. परंतू बाबा चन्ने त्याला पूर्णपणे अपवाद ठरले. वैजापूर तालुक्यातील धोंदलगावसारख्या विकासापासून कोसो दूर असलेल्या भागात राहूनही, बाबा चन्ने यांनी ग्रामीण साहित्याची मशाल पेटवली. स्वतः लेखणी हातात घेतली, आणि इतरांच्याही हातात लेखणी दिली! आज शेकडो कवयित्री, कवी, लेखक, लेखिका, स्तंभलेखक, स्तंभलेखिका त्यांच्या प्रोत्साहनामुळे साहित्याच्या मंचावर झळकत आहेत.
एका सामान्य चेहऱ्यात असामान्य कार्य सामावलेलं असावं, तर ते बाबासाहेब चन्ने यांचं! त्यांनी नवोदित लेखकांचं केवळ लेखन वाचलं नाही, तर त्यांच्या शब्दांना ओळख दिली, व्यासपीठ दिले आणि मोठमोठ्या मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार देखील घडवून आणला. ते इथेच थांबले नाहीत, जेव्हा कोणी अडचणीत आलं, बाबासाहेबांनी त्याचा हात धरला. जेव्हा कोणी थांबलं, त्यांनी पुन्हा चालायला शिकवलं. अनेकांना नोकरी, शिक्षण, वैयक्तिक प्रश्नांमध्ये मदत करून, "माणूसकीची जपणूक कशी करावी" हे बाबासाहेबांनी कृतीतून शिकवलं आहे.
आजच्या भौतिक युगात जिथे लोक झाडं तोडतात, तिथे बाबासाहेबांनी अनेक झाडं लावली. पर्यावरणाची जबाबदारी त्यांनी केवळ बोलून नाही, तर करून दाखवली. त्यांचाच सांगण्यावरून यावर्षी अनेकांनी वड, पिंपळ, लिंब, उंबर असे जिवनोपयोगी झाडे लावली.
आज बाबासाहेबांचा जन्मदिवस… हा फक्त एक उत्सव नाही, तर जगण्याच्या एका मूल्यमापनाचा दिवस आहे. ते केवळ एक व्यक्तिमत्त्व नाहीत, तर एक चळवळ आहेत... जिथे त्यांनी पाय टाकला, तिथं आशेचा अंकुर फुटला. ते कुठंही गेले, तिथं माणूसपण जपलं गेलं,
आणि निखळ प्रेमाच्या भाषेत संवाद घडला.
त्यांनी उभ्या केलेल्या व्यासपीठांवरून शेकडो नवोदितांनी आपल्या अस्तित्वाचा उद्घोष केला, कधी शब्दांनी, कधी स्वप्नांनी… त्या प्रत्येक स्वप्नात त्यांची सावली होती. कारण त्यांच्या शब्दांमागं अनुभव असतो, तळमळ असते, समाजासाठी झिजलेलं मन असतं. ते लिहितात, तर काळजाच्या कप्प्यातून लिहितात. जिथं अभाव आहे, तिथं ते आधार बनले, जिथं गोंधळ आहे, तिथं दिशा दाखवणारे दीपस्तंभ झाले. त्यांनी दिलेलं प्रोत्साहन हे केवळ क्षणिक नव्हतं, तर आयुष्यभर पुरेल असा आत्मविश्वास होतं.
एका गावात राहूनही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला,
कारण त्यांचं सातत्य, प्रेम, सेवा, आणि माणूसकी यांना सीमारेषा नव्हती. त्यांनी केवळ साहित्यिकच घडविले नाहीत, तर माणसांची मनं जोडणारे पूल उभारले. बालकवीपासून ते आजच्या तरुण लेखकांपर्यंत, सर्वांचेच
ते मार्गदर्शक आहेत. ते प्रेमळ पण स्पष्टवक्ते देखील आहेत. त्यांच्या हस्ताक्षरात असते आश्वासक शक्ती,
आणि त्यांच्या हसण्यात असते आधाराची ऊब. ते स्वतः मागे उभे राहून, इतरांना पुढं करतात. स्वतःच्या यशाचा गवगवा ते कधीच करत नाहीत. कुणीही त्यांना भेटलं
तरी मनात त्यांच्या असामान्यतेचा ठसा घेऊनच परततं.
त्यांची ओळख म्हणजे, 'आपल्यामुळे कोणाचं जीवन थोडंसं उजळेल का?' हा सततचा प्रश्न. त्यांनी दिलेलं प्रत्येक शब्दप्रेम, एक आयुष्य उभं करू शकतं, एवढं ते प्रभावी असतं.
आज त्यांचा जन्मदिवस, फुलांनी नव्हे, तर त्यांच्या कर्मगंधाने सजतोय. ते इतके समृद्ध आहेत की,
त्यांचं कौतुक करतानाही शब्द अपुरे पडतात. बाबासाहेब, तुमच्यासारख्या व्यक्तीमुळेच खऱ्या अर्थाने समाज घडतो. तुमचं कार्य हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. अशा प्रेरणादायी व्यक्तीमत्वाला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!

द्वारकाकन्या ॲड. वैष्णवी विठ्ठल मनाळ,
वाहेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर
